शर्मिष्ठा भोसले / मयूर देवकर
१७ वर्षांच्या नायजेरियन मुलाला गेल्या आठवड्यात दिल्लीत काही शे लोकांनी एका मॉलमध्ये बदडून काढले..
एका तरुणाचा ड्रग ओव्हरडोसनं मृत्यू झाला आणि त्याचा जीव घेणाऱ्या ड्रगविक्रीच्या रॅकेटमध्ये परिसरात राहणारी ही नायजेरियन मुलंच आहेत असा स्थानिकांचा संशय होता..
त्यातून या तरुण मुलाला बेदम मारझोड तर झुंडीनं केलीच, पण अनेकांनी त्याचे व्हिडीओ काढले ते सोशल साइट्सवर टाकले आणि ते व्हिडीओही व्हायरल झाले..
दुसरीकडे अजून काही आफ्रिकन मुलांना गर्दीनं बेदम मारलं आणि त्याचेही व्हिडीओ व्हायरल झाले..
दक्षिण आफ्रिकन मुलांनी एकत्र येऊन त्यानंतर दिल्लीत मोर्चे काढले, परराष्ट्र मंत्रालयाला दक्षिण आफ्रिकन वकिलातींना उत्तरं द्यावी लागली आणि पोलिसांनी तपास करून काहीजणांना अटकही केली..
आणि यानिमित्तानं पुन्हा तोच प्रश्न धारदार होत उभा राहिला की,
आपण भारतीय वंशवादी आहोत का?
आपण कातडीच्या रंगावरून माणसांमध्ये भेदभाव करतो का?
गोऱ्या रंगाच्या विदेशी माणसांचं आपल्याला कौतुक आणि काळ्या रंगाच्या माणसांचं?
की त्यांच्याविषयी आपली मतं पूर्वग्रहदूषितच असतात?
थोडंसं मागं पाहिलं तरी आफ्रिकन मुलांच्या संदर्भात होणाऱ्या दुजाभावाची कहाणी आकडेवारीही सांगते..
२०१६ मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी एकट्या दिल्लीत डझनभर आफ्रिकी मुलांवर हल्ले झाले. तेही झुंडीनंच आलेल्या लोकांनी केले. ज्या भागात ही मुलं राहत होती त्याच भागातल्या लोकांनी हे हल्ले केले आणि त्याचं कारण काय? तर या मुलांची ‘फ्री लाइफस्टाइल’ अवतीभोवतीच्या लोकांना त्रासदायक वाटत होती. २०१४-१५ मध्येही राजधानीत अशा घटना वारंवार घडल्या.
वंशद्वेषी टिप्पण्या, काळ्या रंगावरून चिडवणं, खिल्ली उडवणं, टिंगल करणं तर सर्रास होतं अशा तक्रारी आफ्रिकन मुलं सर्रास करतात..
खरंतर अत्यंत गरीब, अविकसित अशा आफ्रिका खंडातल्या अनेक लहानमोठ्या देशांतून ही तरुण मुलं शिक्षणासाठी भारतात येतात.
त्यातल्या अनेकांनी भारत नावाचा हा देश येण्यापूर्वी फक्त सिनेमांत पाहिलेला असतो, आणि प्रत्यक्षातही हा देश असाच कलरफूल, चिअरफूल असेल अशी अनेकांची समजूत असते. ‘लॅण्ड आॅफ ड्रीम्स आणि अपॉर्च्युनिटी’ म्हणून त्यातले अनेकजण भारताकडे पाहतात..
आणि म्हणूनच दिल्ली-मुंबई-पुण्यातच नाही, तर औरंगाबाद, बरेली, शिलॉँग, पटणा या शहरांतही आफ्रिकन मुलं शिक्षणासाठी येतात.
मात्र इथं आल्यावर त्यांच्या वाट्याला काय येतं?
भारतातलं आतिथ्य? की कृष्णवर्णीय म्हणून हेटाळणी, अपमान?
ड्रग पेडलर असतील अशा संशयित नजरा आणि अविश्वास?
याच प्रश्नांची उकल शोधत आफ्रिकन मुलांशी मारलेल्या गप्पांचा, त्यांच्या जगात शिरून त्यांच्या बाजूनं पाहिलेल्या आपल्या देशाचा एक चेहरा -
‘आम्ही भारतात आलो. काही लोक आम्हाला ‘काळे’ म्हणून हिणवतात. पण त्यांच्या भारतीय असण्याचा अर्थ त्यांना उमगला नसेल कदाचित. ते तरी भारतीय म्हणून कुठे सगळेच्या सगळे गोरे आहेत? त्यांच्यातले काही लोक आम्हाला समजून घेतात... मग एक धागा जुळतो. संवाद सुरू होतो.’ - औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांचं हे म्हणणं एका समंजसपणातून आलंय. अब्दुल अली अलसइदी गेल्या वर्षभरापासून औरंगाबादला राहतो. तो मूळचा येमेनचा. इथं विद्यापीठात तो वाणिज्य शाखेत मास्टर्स करतोय. इथं येऊन राहण्याच्या अनुभवाबाबत तो म्हणतो, ‘मी भारतात पहिल्यांदाच आलोय. सुरुवाती सुरुवातीला मला इथं करमायचं नाही.’’ औरंगाबाद कसं वाटतं या प्रश्नावर अब्दुल हसून उत्तर देतो, ‘छोटंसं खेडंच आहे ना हे!! एक सुंदरसं गाव!! पण इथले लोक प्रेमळ आहेत. मी इथं भाड्यानं खोली घेऊन राहतो. आमचे घरमालक मला परकं वाटू नये याची काळजी घेतात. हवं-नको विचारतात. आता स्वत:चा देश सोडून आलो म्हणल्यावर थोडा त्रास तर होणारच ना! पण माझ्या रंगावरून कुणी हिणवल्याचा प्रकार अजून तरी माझ्या वाट्याला आलेला नाही. लोकांच्या नजरा तसं बरंच काही बोलणाऱ्या असतात. इथल्या बदललेल्या हवामानाचा मात्र त्रास होतो.’ हुसेन युसुफ मोहम्मद. मूळचा सुदानचा. गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबादला राहतो. सध्या मौलाना आझाद कॉलेजात बीबीए करतोय. तो सांगतो, ‘इथं येण्याआधी मी कधी भारतात आलोच नव्हतो. माझा मोठा भाऊ इथं केमिस्ट्रीत मास्टर्स करायचा. त्याच्या मदतीने मी इथं आलो. मला फक्त अरेबिक भाषा यायची. मग क्लासेस लावून इंग्रजी शिकलो. सुरुवातीला खूप अवघड गेलं. इथल्या लोकांच्या चालीरीती, परंपरा, धारणा याबाबत काही माहीत नव्हतं. मग काही मित्र झाले. दुसऱ्या वर्षी थोडंबहुत हिंदीही शिकलो. मित्र खूप मदत करतात. मी त्यांच्यासोबत बाजारात जातो. इथले सण-उत्सव, हिंदू-मुस्लिमांची एकत्र संस्कृती समजून घेतो. मला औरंगाबाद आवडतं. का माहीत नाही, पण मुंबई, दिल्ली, हैदराबादपेक्षा इथं जास्त ‘होमली’ वाटतं. माझे घरमालक खूप चांगले आहेत. अगदी वडिलांसारखे वागतात. जगात काही लोकांसाठी त्वचेचा रंग महत्त्वाचा असतो. तुम्ही अगदी कुठेही जा, असे लोक असतातच. ते खूप साऱ्या अंधश्रद्धा, गैरसमजुती घेऊन जगतात. पण माझ्या चांगल्या वागणुकीतून मी त्यांना चुकीचं ठरवतो. त्यांच्याशी बोलतोही. औरंगाबादचं जेवण मला आवडतं. आता तर मी घरीही जेवण बनवायला शिकलोय.’ मायकेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समाजशास्त्रात एम. ए. करतोय. मूळचा नायजेरियाचा. गेल्या पाच वर्षांपासून इथं राहतोय. आजूबाजूच्या सामाजिक वास्तवाकडे खुल्या मना-मेंदूनं पाहणं मायकेलला आवडतं. तो सांगतो, ‘मी पुण्यात आलो होतो, ते बॅचलर्स डिग्री करायला. पण इतका रमलो, की मास्टर्सही इथंच करतो आहे. सुरुवातीच्या काळात मला एकटंच राहायला आवडायचं. पण हळूहळू मित्र बनत गेले. अनेकांना माझ्याशी बोलायचं कुतूहल असतं. पण भाषेचा अडसर येतो. अर्थात, काही विचित्र मुलंही भेटली. मला ‘कालिया’, ‘वेस्ट इंडीज’ म्हणून चिडवत असायची. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचंच धोरण ठेवलं. जगात कुठंही जा, ‘स्किन कलर मॅटर्स’ हे नक्की कळलंय मला. शब्द आणि देहबोली अशा दोन्ही माध्यमातून वांशिक भेदाभेद ठळक केला जातो. काही लोक विचित्र प्रश्नही विचारतात. कुणीतरी एकदा मला विचारलं होतं, ‘तुम्ही तुमच्या देशात खरंच झाडांवर राहता का?’ पण यातून मला लोकांची मानसिकता समजून घेण्याची संधी मिळते. इथली माती मला खूप काही शिकवते आहे. मी पूर्वी होतो त्याहून खूप ‘मॅच्युअर’ झालोय. मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्याही. सामाजिकदृष्ट्या भारत मला शांत, सहनशील लोकांचा देश वाटतो. मला इथं राहणं आर्थिकदृष्ट्या परवडतं.’ भाड्याने राहण्याच्या बाबतीत मायकेलला काही वाईट अनुभवही आले आहेत. तो सांगत होता, ‘एका खोलीत आम्ही मित्र भाड्याने राहत होतो. तिथल्या विजेच्या मीटरचा अचानक स्फोट झाला. आमची त्यात काहीच चूक नसताना घरमालकांनी आजूबाजूच्या लोकांना गोळा करत आम्हाला शिवीगाळ सुरू केली. आणि हो, भारतात भांडणं असू देत की रस्त्यावरचे अपघात, माझं निरीक्षण आहे की लोक फक्त पाहत राहतात. हस्तक्षेप अजिबातच करत नाहीत. अर्थात खूप चांगली माणसंही भेटली मला. मागे नोटाबंदीच्या काळात अनेक मित्रांनी मला चलन बदलून घेण्यासाठी उत्स्फूर्तपणे मदत केली. इद्रीस मूळचा सुदानचा आहे. सध्या औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेजमध्ये शिकतोय. तो सांगतो, ‘माझे काही सिनियर इथे औरंगाबादला शिकत होते. काहींनी तर इथं लग्नंही केली. माझं बी. कॉम. झालंय. आता मी बीबीए करतोय. इथे बारा वर्षांपासून आहे. मी माझ्या देशातून आलो तेव्हा नातेवाईक आणि मित्रांची खूप आठवण यायची. आमच्याकडे जगणं खूप महाग आहे. शिक्षणाचंही तेच. इथले लोक चांगले आहेत. आम्हा लोकांच्या जगण्यात जास्त नाक खुपसत नाहीत. माझे घरमालक चांगले आहेत. फक्त भाडं घ्यायला येतात. पोलीसही कधी विनाकारण त्रास देत नाहीत. रिक्षावाला खूप वाईट वागलेला एकदा. पण चांगले रिक्षावालेही भेटलेच. मला लोकांना समजून घ्यायला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आवडतं. पण एक मात्र नक्की! आमचं लाइफकल्चर थोडंसं वेगळं आहे. आम्ही सिगार पिताना दिसलो तरी लोक संशयाने बघायला लागतात. आम्ही ड्रग्जसुद्धा घेतो असे समज लगोलग पसरवतात आमच्याबाबत. हे मात्र खूप अंगावर येणारं असतं. असले गैरसमज दूर करणंही फार कठीण असतं.’
(शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.)
मनं खुली करण्याचा मार्ग!
आफ्रिकन देशातले विद्यार्थी अगदी ऐंशीच्या दशकापासून औरंगाबादमध्ये शिकायला येताहेत. इथलं कल्चर त्यांना ओळखीचं वाटतं. हे विद्यार्थी कृष्णवर्णीय असतात. बाबासाहेबांचं नाव दिलेलं हे विद्यापीठ दलित चळवळीचं केंद्र आहे. कृष्णवर्णीय म्हणून जगताना त्यांच्या वाट्याला येणाऱ्या संघर्षावेळी त्यांना बाबासाहेब आणि दलित चळवळीत त्यांच्या स्वत:च्या अनुभवांना, आयुष्याला जोडणारे काही समान धागे सापडतात, हे निश्चित.
औरंगाबादमधल्या कनिष्ठवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये हे विद्यार्थी राहतात. कारण या वस्त्यांमधली घरं, लोकांचं जीवनमान यांचं त्यांच्या देशातल्या वातावरणाशी साम्य असतं. हे सगळे भाषिक वेगळेपणामुळे घरमालकांशी अगदीच कमी बोलतात. त्यांना कुठला त्रास देत नाहीत. एकदा भाडेकरार झाला, की अकरा महिन्यांचे पैसे एकदाच देऊन टाकतात. ही मुलं अगदी इथल्याच स्थानिक लोकांकडून सेकंडहॅँड बाईक, कार विकत घेतात. इथल्या लहान-लहान हॉटेल्समध्ये खातात. यांना हवं तसं मांसाहारी जेवण इथं मिळतं.
या विद्यार्थ्यांना औरंगाबादेत सुरक्षित वाटावं यासाठी येत्या काळात अनेक प्रयोग करण्याचा मानस आहे. म्हणजे, आम्ही ठरवलंय की येत्या काळात शहरातल्या निवडक लोकांना बोलावून त्यांच्यासमोर हे विद्यार्थी त्यांच्या देशी पेहरावात रॉक कॉन्सर्ट आणि नृत्य-नाट्य सादर करणार आहेत. त्यातून एक अनौपचारिक ‘कल्चरल एक्स्चेंज’ होईल.
या विद्यार्थ्यांनी इथं यायला पाहिजे. येत राहायला पाहिजे. सतत वैविध्य अनुभवण्यातूनच विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांची मानसिकता खुली, स्वागतशील बनेल. भारताचा सामाजिक, सांस्कृतिक माहोल दूषित होण्यापासून रोखण्याचा हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे, असं मला खात्रीने वाटतं!
- प्रा. डॉ. मुस्तजिब खान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टुडंट्स सेलचे संचालक
...केनियाला परत जाईन, तेव्हा भारताची आठवण येईल!
नोएडाची घटना तशी नवीन नाही. आफ्रिका खंडातून आलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्टिरिओटायपिंग’मुळे त्रास होतोच. मी जेव्हा आलो तेव्हाही अनेक अडचणी सोसाव्या लागल्या. पण त्या अडचणी म्हणजे समस्या नव्हत्या. नवीन जागा, नवीन लोक, नवीन संस्कृती, वागण्या-बोलण्याची नवी रीत. रुळायला जरा वेळ लागतोच ना! इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची ती प्रक्रिया होती. थोडा ‘रेसिजम्’चा सामानाही करावा लागला. परंतु तो हेतुपूर्वक नसावा. कोणत्याही नव्या नात्याला, नव्या संबंधांना निर्माण होण्यासाठी थोडा वेळ लागतोच. तसंच कहीसं ते होतं. पण आज तसं नाही. २००८ साली मी आलो. तेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया प्रचलित नव्हता. त्यावेळी माझ्यासारखा विदेशी विद्यार्थी आणि त्यातल्या त्यात ‘कृष्णवर्णीय’ माणूस लोकांच्या कुतूहलाचा म्हणा किंवा हेटाळणीचा विषय होता. भिन्न संस्कृती आणि दृष्टीकोन जुळत नसल्यामुळे कदाचित असं होत असावं. पण आता बदलते आहे परिस्थिती. एक गोष्ट मात्र नक्कीच सांगावी वाटते की, औरंगाबादमध्ये आम्हाला उत्तर भारताप्रमाणे त्रास होत नाही. त्यामुळे आम्हाला इथं भीती वाटत नाही. मुख्य अडथळा असतो तो ‘संवादा’चा! सांस्कृतिक, वैचारिक भिन्नता तर आहेच; परंतु दोन वेगळ्या प्रवृत्तींना एकत्र आणण्यासाठी जो संवाद लागतो तो कमी पडतो. त्यामुळे गैरसमज दूर करता येत नाहीत. आपला विचार मांडण्यात अडचणी येतात. भाषेचा प्रॉब्लेम थोडा सैल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सरमिसळण्याची ही प्रक्रिया वेग धरू शकते. माझ्या बाबतीत तेच झालं. आफ्रिकन लोकांविषयी भारतीयांच्या मनात अनेक गैरसमज घर करून असतात. सर्वात मोठा स्टेरिओटाईप म्हणजे प्रत्येक आफ्रिकन तरुणाकडे ड्रग्ज असतात. हा गैरसमज सिनेमातून अधिक पसरतो. त्यामुळे आमच्याकडै पाहाणारी नजर मुळातच संशयाची, काहीशी भीतीचीही असते. हा संशय पुसून काढून विश्वास कमवायला आम्हाला खूप वेळ लागतो. - पण त्याबद्दल माझी तक्रार नाही. एवढी वर्षे इथं राहून मी स्वत:ला परिस्थितीशी ‘अॅडॅप्ट’ करून घेण्याची कला शिकलो आहे. वाद, भांडण, मतभेद सामंजस्याने सोडविण्याकडे माझा कल असतो. भारताने मला खूप काही दिलं आहे. माझी पी. एचडी पूर्ण झाल्यावर मी परत केनियाला जाणार आहे.इथे जे शिकलो ते माझ्या देशातल्या लोकांसाठी वापरता येईल, त्या त्या प्रत्येक वेळी मला भारताची आठवण येईल!...
- जॉन पॉल
गेली आठ वर्षं औरंगाबादमध्ये मुक्कामाला असलेला जॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कायद्याच्या विषयात पी. एचडी करतो आहे.
अजून रुळलो नाही इथे, पण जमेल मला!
मला भारतात येऊन अजून वर्षही नाही झालेलं. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अनेक आफ्रिकन विद्यार्थी शिकत असल्यामुळे इतरांच्या तुलनेत मला इथं स्थिरावणं थोडं सोपं गेलं. सिनियर्स तर मदत करतातच, परंतु कॅम्पस प्रशासनही सकारात्मक आहे. रोजच्या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण येते ती भाषेची. नीट ‘कम्युनिकेट’ होत नाही. त्यातून थोडंसं अंतर राहतंच. ‘काले’ म्हणून चिडवण्याचा अनुभवही मी घेतला आहे. वाईट वाटायचं सुरुवातीला, पण मग सवय झाली. मी जेव्हा केनियाहून येथे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. इटस् पार्ट आॅफ द गेम! ‘केनियन एम्बसी’कडूनही (दूतावास) मदत मिळते. कोणत्याही अडचणीमध्ये आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो. पण शक्यतो आमच्या स्तरावरच प्रॉब्लेम सोडविण्यावर आम्ही भर देतो. ‘आफ्रिकन स्टुडंट असोसिएशन इन इंडिया’सारख्या संघटनेच्या मार्फत आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. शिवाय व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ग्रुप्स आहेतच. संपूर्ण देशातील आफ्रिकन विद्यार्थी या ना त्या माध्यमाने जोडलेले आहेत. मी तसा नवीन आहे इथे. भारतीय संस्कृती ‘एक्सप्लोअर’ करतोय. अनेक नवे अनुभव, मग ते चांगले-वाईट दोन्ही, माझ्या वाट्याला येतील, त्यासाठी मी तयार आहे...
- फ्रान्सिस कमाऊ
गेल्या जूनमध्ये केनियाहून भारतात आलेला १९ वर्षांचा फ्रान्सिस जर्नालिझम विभागात बी.ए.च्या पहिल्या वर्गात शिकतो.
(मुलाखती आणि शब्दांकन - मयूर देवकर)