पावभाजी. दोन मिळून एकच झालेला हा शब्द. उच्चारला तरी तो घमघमाट जाणवायला लागतो. सिमला मिरची, फ्लॉवर, मटार, बटाटा या भाज्या एकत्र करून त्यात मसाला, तिखट, मीठ घालून रटरट शिजणारी गरमागरम पावभाजी आॅल सिझन हीट असते. पावभाजीची ही भाजी म्हटलं तर करायला अत्यंत साधी. पण त्याच्या तिखटाचं आणि लालभडक रंगाचं गणित मात्र पक्क जमावं लागतं. सोबत लिंबू आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर.. बेत फक्कड जमतोच.ही पावभाजी तशी पब्लिकवाली. आम जनतेला परवडणारी. रस्त्यावरही सहज मिळते. ठेल्यांपासून हॉटेल्सपर्यंत कुठंही सहज रमते. पावभाजीला कोणत्याही आर्थिक सीमारेषा नाहीत. चारचाकी गाडीवाला असो की सर्वसामान्य माणूस, प्रत्येकजण तेवढ्याच जिहाळ्याने पावभाजी खातो. त्या कॉलेजच्या तरुण जगात तर पावभाजीचा मामला खास असतो. अनेकदा ती दोघं एक प्लेट पावभाजी, दोन एक्स्ट्रा पाव, थोडं एक्स्ट्रा चीज आणि बटर लावलं की पावभाजीला इश्काचा रंगही चढतोच.अशा कित्येक आठवणीही पावभाजीशी जोडलेल्या असतात. कॉलेज कट्टा ते नेहमीचा अड्डा, ते गणपतीत सगळ्यांनी मिळून केलेली, रंगपंचमीची, बर्थडे पार्टीची, आणि गेटटुगेदरची. प्रत्येक पावभाजी एकच, पण चव मात्र खास. ती चव काळासोबत तशीच राहते. पण पावभाजी, ती मात्र सध्याच्या काळात मॉडर्न होऊ घातली आहे. तिचं रंगरूप बदलतं आहे. आणि ती जेनेरिक होती, ती आता ब्रॅण्ड बनत चालली आहे. म्हणून तर आता लाल रंगाची पावभाजी तर मिळतेच, पण हिरव्या रंगाची, कार्बन, पावभाजी फोण्ड्यू, पावभाजी शॉट्स, हाय प्रोटिन पावभाजी असे एकसोएक प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून मिळायला लागले आहेत. त्यामुळे या पावभाजींची चव असते कशी ते खाऊन पाहिल्याशिवाय कळणार नव्हते. म्हणून मित्र-मैत्रिणींबरोबर बेतच आखला अशी पावभाजी खाण्याचा. वेगळ्या ढंगातली भाजी खाताना मात्र एक जाणवलं, नेहमीची पावभाजी करण्याची ही पद्धत मात्र वेगळी आणि हटके आहे. पाव-भाजीत झालेला हा बदल कदाचित पाव-भाजीत मुरलेल्या, जुनीच चव आवडणाऱ्या अनेकांना रुचणार, पचणार आणि आवडणारही नाही. पण नव्या पिढीला मात्र तो आवडतोय. चवीत बदल करून पाहण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना ही पावभाजी एक वेगळा अनुभव देत राहते. अर्थात सध्या हे प्रकार फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित असले, तरी प्रयोग पटकन पोहचतात सर्वदूर. काही दिवसांत सर्वत्र अशा विविध पावभाज्या मिळायला लागल्या तर नवल वाटायला नको. - भक्ती सोमण -(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.) हरियाली पावभाजीपावभाजी लाल रंगाची हेच आजवर माहीत होतं. पण ही भाजी खाताना जाम मजा आली. कारण चवीत फार बदल झाला नव्हता. या भाजीत नेहमीच्या वापरल्या जाणाऱ्या भाज्यांबरोबर पालक, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट तसेच लाल टोमॅटोऐवजी हिरव्या टोमॅटोचा वापर केला होता. त्यामुळे हिरव्या रंगाचा पुरेपूर वापर करत त्यांचा मूळ रंग तसाच राखण्याचा प्रयत्न या पावभाजीत दिसत होता. मिरचीमुळे एक वेगळा ठसकाही भाजीत जाणवत होता. ही पावभाजी आपण घरीही करू शकतो. कार्बन पावभाजीकाळ्या रंगाची पावभाजी पेश झाली. या पावभाजीला ’ पावभाजी असेही म्हणतात. सध्या मोस्ट पॉप्युलर असलेल्या मोलिक्युलर स्टाइलमध्ये केलेल्या या पावभाजीत कार्बनचा खाण्यायोग्य उपयोग केलेला होता. आता कार्बन कसा खायचा, हा प्रश्न पडला असेलच. पण कार्बनवर प्रक्रिया करून त्याला खाण्यायोग्य केलं जातं. शरीरावर त्यामुळे कोणताही अपाय होत नाही, तर समोर होता काळा पाव आणि तशीच काळी भाजी. पावाला कार्बनचा स्मोक देऊन त्याचा रंग काळा केला होता, तर बटाटा, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर उकडून ते खाण्यायोग्य कार्बनमध्ये एकत्र केले होते. फक्त दिसायला काळी असणारी ही पावभाजी चवीला मात्र अस्सल लाल पावभाजीच्या चवीप्रमाणे लागत होती. तर, नेहमीच्या भाज्या त्याच ठेवून काही मसाल्यांचा वापर करत केलेली "ब्लॅक पावभाजी" ही आता मुंबईत काही गाड्यांवर मिळत असल्याचं नुकतंच समजलं. या भाजीच्याही चवीत बदल नाही. फक्त करण्याची पद्धत बदललेली आहे.पावभाजी फोण्ड्यूछोट्या ट्रायपॉडवर चिज सॉसमध्ये क्रुटोन्स डिप करून खायचा प्रकार म्हणजे चीज फोण्ड्यू. पण यात बदल म्हणजे पावभाजी फोण्ड्यू करताना नेहमीप्रमाणे भाजी केली होती, मात्र भाजी झाल्यावर ती चक्क मिक्सरमधून काढली होती. त्यात वर यथेच्छ चीज घातलं होतं. ही भाजी त्या फोण्ड्यू पात्रात ठेवली होती. त्याच्या खाली मेणबत्ती जळत होती. या भाजीबरोबर पावाऐवजी क्रुटोन्स (ब्रेडचे तुकडे) हे हाताने न खाता दोन पॉइंटर असलेल्या फोर्कने खावे लागतात. एक फोण्ड्यू चार जणांना आरामात पुरतो. मुख्य म्हणजे हा पावभाजी फोण्ड्यू घरीही सहज करता येतो. साधारण ४५० ते ८०० रुपयांपर्यंत फोण्ड्यू पात्र बाजारात मिळतं. त्या फोण्ड्यू पात्राच्या खाली लावलेली मेणबत्ती चार तास सहज टिकते. त्यामुळे पार्टीसाठी पाव-भाजी फोण्ड्यू हा मस्त पर्याय आहे.पावभाजी बाइट्सभाजी नेहमीसारखी करून ती प्लेटमध्ये न देता चक्क मीडियम ग्लासात सर्व्ह केली. मीडियम ग्लासात अर्ध्या ग्लासात ती भाजी घातली. त्यात ग्लासच्या कोपऱ्याला अर्धा पाव आणि लिंबू खोचले. एक किंवा दोन घासात खाऊन संपत असल्याने स्टार्टर म्हणून हा एक वेगळा प्रकार नक्कीच होऊ शकतो.हायप्रोटिन पावभाजी
रंग बदलती पावभाजी
By admin | Published: May 04, 2017 6:46 AM