- प्राची पाठक वा, काय मस्त कडक ऊन पडलंय..काय उबदार वाटतं आहे..- अशी कौतुकाची थाप उन्हाळ्याला क्वचितच मिळते. गुलाबी थंडी आणि पावसाळ्यातल्या हिरवाईचे कोण कौतुक असते जिकडे तिकडे. उन्हाळा म्हणजे एकतर परीक्षा किंवा सुट्या आणि रटाळ रखरखीत दुपार. उन्हाचा त्रास नको म्हणून संध्याकाळी उशिरा बाहेर पडणं, एरवी डांबणं स्वत:ला पंख्याखाली...कुरकुर, उकडतंय, कसला घाम येतोय अशी तक्रारच उन्हाळ्याच्या वाट्याला जास्त येते..पण खरंतर उन्हाळ्याचीही आपली अशी खास मजा आहे..‘वाऱ्यावरती गंध पसरला..’ म्हणजे काय याचा पुरेपूर आस्वाद घ्यायला उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे. कितीतरी झाडांना मोहर आलेला असतो या काळात. पानांची पडझड होऊन नवीन पालवी फुटत असते. केवढ्या छटा असतात त्या पालवीच्या. आपण जशी रंगांची होळी साजरी करतो, तसाच होलिकोत्सव निसर्गदेखील त्याच्यापरीने साजरा करत असतो. आपल्याला तो होलिकोत्सव बघायला आहे का जरा तरी वेळ आणि नजर, हा खरा प्रश्न आहे.कडुनिंबाचे झाडच बघा ना.. सदा हिरवेगार, डौलदार गुणी बाळ. पण त्याला ‘ग्लॅमर’ नाही. सुगंधी फुलं म्हटले की गुलाब, मोगरा, जाई, जुई अशीच फुलं आघाडीवर असतात. कडुनिंब सुगंधी असतो असं कुणी म्हणत नाही. मात्र त्याच्या नावात ‘कडू’ असलं तरी त्याच्या मोहराचा वास अक्षरश: वेडावून टाकणारा असतो. कधी बघितलंय हे झाड मन भरून?उन्हाळ्यातच कडुनिंबाचा सुगंध भरभरून अनुभवता येतो. जांभूळ, आंबा अशाही झाडांना मोहर आलेला असतो. अंगणात, परिसरात बेलाचं झाड असेल तर त्याचा दरवळकाय सांगायचा. हे झाड तर कायमस्वरूपी अंगणात मंद सुगंधाची उदबत्ती लावून ठेवते. वेडावून टाकणारा बेलाचा सुगंध वारा जपून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. बेलफळाचं सरबत चाखले आहे कधी? अरे, हाच तर सिझन आहे. नेहमीची कोल्ड्रिंक्स काय पिता? बेलफळाचं सरबत पिऊन बघा. रंग आणि गंध एकाचवेळी भेटतील.कुठं वाºयावर गंध वाहून येतो, त्यावर गाणी लिहिली जातात; पण उन्हाचा प्रचंड वणवा असणाºया प्रदेशात भगभगीत ऊन भाजून काढतंच. तिथं असा वारा अनुभवता येत नाही. झाडाच्या जवळ जाऊन उभं राहिलं तरी वास, गंध वाºयानं येईल असं नाही. ही पण तशी निसर्गाचीच किमया. उन्हाळ्यातले सगळेच सुगंध सगळ्याच परिसरात वाºयावर पसरत नाहीत.ही निसर्गविषयक निरीक्षणं टिपायला आपण दोन क्षण एखाद्या झाडाच्या सावलीत तरी बसतो का, हा खरा मुद्दा!‘उन्हाचं बाहेर हिंडू नकोस’ ही भीती लहानपणापासून मनात घातली जाते. काही अंशी ती बरोबरच आहे. पण शंभरातल्या पाच वेळी तरी किमान भर दुपारचं ऊन उपभोगून बघावं. रणरणत्या उन्हात चालून बघावं. आपलं शरीर, मन त्या ऋतूबद्दल काय सांगतं ते शांतपणे, ऐकत, त्यात डोकावून बघावं...मग दूरवरच्या एखाद्याच झाडाच्या दाट सावलीचं महत्त्व कळतं. सूर्याच्या ऊर्जेचा आवाका कळतो. निसर्ग किती खुलतो या काळात, पक्षी काय लगबग करत असतात ते कळतं. आपलं शरीर बदलत्या ऋतूत आपल्याशी बोलू बघत असतं. त्याची साद ऐकता येते.निसर्गालासुद्धा आपल्याशी काहीतरी चॅटिंग करायचं असतं. आपल्या शरीराचंदेखील काहीतरी चॅटिंग आजूबाजूच्या वातावरणाशी सतत सुरू असतं. आपल्या रोजच्या रगाड्यातून दोन क्षण बाहेर फक्त पडायला हवं. मोबाइलमध्ये खुपसलेलं डोकं काही क्षण जरी निसर्गावर रोखलं तरी हा लाइव्ह शो बघता येईल.किती ते ऊन, किती ते ऊन ही कुरकुर न करता, त्या उन्हाचे रंग तेवढे आपण ‘पाहायला’ हवेत..त्या रंगांचा गंधही मग हाका मारायला लागतो..
गुलमोहर, पळस-पांगिरा लालेलालउन्हाळ्यात रंगांची रेलचेल असते. रस्त्यानं बाइक सुसाट दामटताना आजूबाजूला फुललेले गुलमोहोर बघायला थांबलात कधी? कधी लक्ष तरी गेलंय त्याच्याकडे? अगदी पळस, पांगारा, बहावा शोधायला जाऊ नका. पण गुलमोहोर तर सहजच दिसणारा आहे. त्याला तरी मन भरून अनुभवा. त्याच्या छटा बघा. कुठे शोसाठी टॅब्युबिया लावलेले असतात. त्यांच्या विविध छटा बघा. काशिदाच्या पिवळ्या छटा अनुभवा. दसऱ्याला आपटा समजून ज्याची पाने बहुतेक करून तोडली जातात तो कांचन या काळात विविध रंगांनी बहरलेला असतो, तो शोधून काढा.सप्तपर्णी मोहरलेली असते. तिच्या खोडावरच्या टिकल्या रात्री प्रकाशात कशा चमकतात, ते बघायला बाहेर पडा एकदा. आपण काही बॉर्न ‘बॉटनिस्ट’ नसतो. पण झाडांकडे डोळे भरून बघायला आणि खोल श्वास घेत त्यांचा सुवास अनुभवायला तर बाहेर पडता येतंच की.prachi333@hotmail.com