- श्रुती साठे
उन्हाळा आला की जसे स्पायसी पदार्थ नको वाटतात, तसेच स्पायसी रंगसुद्धा अंगावर नको वाटतात.आपल्या कळत नकळत पदार्थांची आणि कपड्याच्या रंगसंगतीची ही कमाल साधली जाते. शेवटी सगळा नजरेचा खेळ आहे. रखरखीत उन्हाळ्यात नजरेला आणि त्याबरोबरच पोटाला थंड करणाऱ्या गोष्टींकडे आपला कल असतो. पांढरीशुभ्र लस्सी, रसरशीत पिवळ्या धमक लिंबाचं सरबत, आवळ्याची तुकतुकीत कांती हे सगळंच मोहून टाकणारं आहे. हे नजरेला आणि पोटाला सुखावणारे कूल कलर्स अगदी हवेहवेसे वाटतात. मग यंदाच्या उन्हाळ्यात आपण जे कपडे घालणार त्यांचे रंगही ‘कूल’ हवेतच.
इन काय? - व्हाइटउन्हाळ्यात वर्षानुवर्षे आपण पांढरेच कपडे घालतो. फार तर आॅफ व्हाइट, पिवळा , हिरवा, गुलाबी अशा रंगाचा चढता क्रम लागतो. मात्र तरीही उन्हाळ्यावर राज्य करतो तो पांढराच रंग. त्यामुळे या उन्हाळ्यातही ट्रेण्डी काय असं विचाराल तर उत्तर तेच, गो व्हाइट! पांढºया रंगाचे कपडे ते चपला असं सारंच यंदा हिट आहे. त्यामुळे शुभ्र जे जे आवडेल ते ते उन्हाळ्यात घालून घेणं उत्तम..
लॅव्हेंडर? या उन्हाळ्याचा रंगयंदा मात्र पांढºयाच्या या साम्राज्यावर लॅव्हेंडर म्हणजेच फिकट जांभळा तसेच गुलाबीसर जांभळा रंग आपला दावा सांगतोय. लॅव्हेंडरने समर २०१८ च्या फॅशन रनवेवर राज्य केलंय. शिफॉन, कॉटन जॉर्जेट, सिल्क यासारख्या सुळसुळीत कापडात लॅव्हेंडर रंग सुरेख दिसतो, तर लिनन कॉटनसारख्या कापडांवर हा रंग मॅच्युअर दिसतो. तेव्हा उन्हाळ्यात एकदम ट्रेण्डी दिसायचं असेल तर लॅव्हेंडर हा या उन्हाळ्याचा रंग आहे हे नक्की.
ऐश्वर्याची जांभळी लिपस्टिक
मध्यंतरी ऐश्वर्या रायनं ओठांना लॅव्हेंडर लिपस्टिक लावल्याचं आठवतंय का? लाल आणि गुलाबी लिपस्टिक अंगवळणी पडलेल्या अनेकांनी ऐश्वर्याच्या त्या जांभळ्या लिपस्टिक प्रयोगाला नाकं मुरडली हे खरं, पण तिनं तो रंग खूप प्रभावीपणे पेलला हेसुद्धा तितकंच खरंय! हा रंग हवाहवासा वाटला तरी तोच कॅरी करणं तितकं सोप्पं नाहीये. अति वापरल्यानं लॅव्हेंडर खूप भडक दिसू शकतो किंवा योग्य ती शेड ना वापरल्यानं अगदी बोअरिंग आणि डल दिसू शकतो. तेव्हा लॅव्हेंडरबरोबर आॅफ व्हाइट, पांढºया रंगाचा मिलाफ साधणं उत्तम.काहीच नाही तर या उन्हाळ्यात केसांवर लॅव्हेंडर स्ट्रीक खूप बोल्ड दिसतील. केसांच्या बनमधून किंवा पोनीतून मधेच दिसणारी लॅव्हेंडर शेड मस्त हटके लूक देते.
sa.shruti@gmail.com