- भक्ती सोमण
कमावते नसताना आपण जेव्हा भावाला राखी बांधायचो तेव्हा ती राखी हमखास लाल, पिवळ्या किंवा निळ्या रंगाची गोंड्याची म्हणजे स्वस्तातली असायची. जरा चांगली राखी घेऊया की असं आईला सांगितलं की ती म्हणायची, कमवायला लागलात की घ्या महागडं.
म्हणजे या गोंड्याच्या राख्या स्वस्त असतात आणि त्यांना फारसं ग्लॅमर वगैरे अजिबात नसतं, असं समीकरण अनेकांच्या मनात नकळत तयार झालं. पण सध्या या गोंड्याने मुलींच्या कानावर जादू केलीय. स्वस्त असलं तरी काय झालं, त्याला मॉडर्न टच असलेले कानातले काय फंकी दिसतात म्हणून सांगू, असे डायलॉग हल्ली कॉलेजच्या नाक्यावर, ट्रेनमध्ये वगैरे ऐकायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून तर गोंड्यापासून तयार केलेले कानातले, गळ्यातले, ब्रेसलेट असे काय काय मिळायला लागलं आहे. या प्रकाराला म्हणतात tassel jewellery.
यात कानातले, गळ्यातलं, ब्रेसलेट असे एकसोएक प्रकार. त्यात फिरकी असलेले, फिरकी नसलेले असे मोठे मोठे गोंडे, त्याचबरोबर शंख असे कॉम्बिनेशन आहे. लोंबत्या कानातल्यात साधारण पाच सहा रंगीत मणी आणि खाली रंगीत गोंडा किंवा नुसतेच छोटे गोंडे अशी फॅशन आहे. गुगल केलंच तर खूप व्हरायटी बघायला मिळतात. त्यात पॉम पॉम या प्रकाराची चलती आहे. जर मोठं कानातलं असेल तर गळ्यातली माळ घालायचीही गरज राहत नाही. पण गळ्यातल्यांमध्येही विविधरंगी गोंडे लावलेल्या माळा किंवा एकच रंगाचा गोंडा असलेली माळ आणि तसेच ब्रेसलेट उपलब्ध आहे. हे प्रकार साधारण ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. फॅशनबाबतीत कधी काय घडेल ते सांगताच येत नाही. जुनं ते सोनं असं म्हणत आता अनेक जुन्या गोष्टींना आधुनिक टच देत लोकप्रिय करण्याचा जमाना आहे. त्यात ही गोंड्यांची फॅशन तर एकदम हटके. तुम्हीही ट्राय करा. -
(भक्ती लोकमत मुंबईमध्ये उपसंपादिका आहे.bhaktisoman@gmail.com )