काय सांगता, घरातून निघालात आणि फोन घरीच राहिला?
देवा, आता कसं होणार?
व्हॉट्सअॅप बंद, फेसबुकवर काय चाललंय कळणार नाही, फिटनेससाठी डाउनलोड केलेले अॅप्स, आता कसं कळणार की आजचा चालण्याचा काउण्ट पूर्ण झाला की नाही? आणि फोनमध्ये लावलेले अनेक कामांचे रिमाईण्डर? त्याचं काय? टू डू लिस्ट नाही, वाढदिवस, अॅनिव्हर्सरीचे कुणाकुणाला करायचे फोन, अमुकतमुक दिवसाचं विशेष महत्त्व ते कसं काय मॅनेज करणार? आणि गेमचं काय?
टाइमपास कसा काय करणार?
आजचा दिवसच वाया जाणार, काही खरं नाही आज.
- असं वाटतं ना हल्ली अनेकांना! एक फोन बरोबर नाही तर शरीराचा एखादा अवयव नसल्यासारखं वाटतं, चुकचुकल्यासारखंच कशाला वेडंपिसं होतं, चिडचिड तर कमालीची वाढतेच!
एकवेळ, खिशात पैसे नसतील तरी चालेल पण हातात स्मार्ट फोन पाहिजेच. कारण आपला फोन आपला टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, फिटनेस गॅजेट आहे, आपली बँक आहे, आपलं सामाजिक आयुष्य म्हणजे सोशल लाइफ आहे आणि जे जे म्हणून काही शक्य आहे ते सगळं आहे..
त्याच्याशिवाय कुणाला जगता येणार?
प्रश्न बरोबर आहे.
पण उत्तर शोधण्याआधी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ.
थोडं मागे, फार नाही. फक्त दहा-पंधरा र्वष. जेव्हा नुकतेच मोबाइल फोन आपल्या आयुष्यात आले होते. मोबाइलवर इंटरनेटची भानगडच नव्हती. मिस कॉल देण्याचा तो जमाना होता. इनकमिंग फ्री नव्हतं. तरीही खिशाला ताण देऊन आपण मोबाइल वापरत होतो आणि बघता बघता चित्र पालटलं. इंटरनेट स्पीडचा 48 केबीपीएसपासून सुरू झालेला प्रवास जेव्हा 56 केबीपीएसवर आला कधी ते आपल्यालाही कळलं नाही. पण अचानक नेटला वेग आला. पतंग झरझर ओढून जवळ घ्यावा तसं जग जवळ आल्यासारखं अचानक वाटायला लागलं. हे कमी नव्हतं म्हणून की काय काहीही कळण्या-समजण्याआधीच आपल्या मोबाइलवर फोरजी नेटवर्क कनेक्शन येऊ लागलं. स्पीड साधारण एक दशलक्ष केबीपीएस.
वाटलं, वॉव! हे भारी आहे. जग आता जवळ नाही तर शेजारी येऊन बसलंय.
पण ते जग शेजारी नाही डायरेक्ट मांडीवरच येऊन बसलं, हे लक्षात आता कुठं येतंय!
फ्लॅशबॅकमधून वर्तमानात या आता परत.
बघा काय दिसतंय?
आपण, आपले आई-बाबा, आपले आजी- आजोबा सगळे स्मार्ट झाले आहेत. कॅण्डी क्र श खेळायला वयाचं बंधन राहिलेलं नाही. एफबीवर नातवंडं असतात आणि त्यांचे आजी-आजोबा त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असतात. आणि असं असणं इट्स कूल असंही म्हणणं सुरू झालं.
आपल्या जगण्याचा वेग फोर जी होण्याच्या नादात आणि स्मार्ट फोनने आयुष्याचा जमा-खर्च मांडण्याच्या जीवनशैलीचे बरे वाईट परिणाम आपल्या जगण्यावर, नीतिमूल्यांवर आणि नात्यांवर होताना दिसूही लागले.
त्यासाठीचे अभ्यास जगभर सुरू झाले.
ते अभ्यास काय सांगतात, याची लिटमस टेस्ट आपल्याला अवतीभोवतीही दिसते आहेच. एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर हमखास दिसणारं चित्र म्हणजे, प्रेमीयुगुल जेवायला आलेलं असतं पण दोघं एकमेकांशी प्रेमसंवाद करण्याऐवजी आपापल्या फोनमध्ये मशगुल असतात. किंवा देशात कुठलीही घटना घडली की नक्की घडलं काय हे जाणून घेण्याची वाट अनेक जण बघतच नाहीत. व्हॉट्सअॅपवर येणारे मेसेज खरे मानून मतं बनवणारे आणि त्यानुसार अभिव्यक्त होण्याची घाई करणारे यांची संख्या कमी नाहीये. अनेक कपल्स तर हल्ली म्हणो प्रत्यक्ष भांडण्याऐवजी एसेमेसवर भांडणं करतात. प्रत्यक्ष एकमेकांशी बोलण्याची त्यांना सवय उरलेली नसल्याने व्हच्यरुअल भांडणं त्यांना अधिक सोयीची वाटतात. रात्री झोपण्याआधी आणि डोळे उघडल्या उघडल्या आधी मोबाइल चेक करणारा आपला हा आजचा समाज .
स्मार्टफोन हातात आल्याने नेमकं आपलं आयुष्य कसं बदललं आहे? आपल्या नात्यांची वीण घट्ट झालीये, सैल पडलीये, की खरंच त्यात अर्थपूर्ण बदल होतायेत? आपल्या स्वप्रतिमांचा घोळ वाढला आहे की कमी झाला आहे? आभासी जग आणि खरं जग यातलं अंतर धूसर होतंय की यातला फरकच कळेनासा झालाय?
आभासी जगातला आपला वावर आपण खरा मानायला लागलोय का? किंवा आपण स्वत:ला जसे हवे आहोत तसे मोडीफाय करून आभासी जगापुढे ठेवतोय आणि ती आभासी प्रतिमा म्हणजेच ‘खरे आपण’ असं मानून जगायला लागलो आहोत का? आपल्या परस्पर संवादामधली आवाज, देहबोलीची जागा मेसेजेस आणि चॅटिंगने, भावनांची जागा इमोटीकॉनने घेतली आहे हे तरी कुठं आपल्या लक्षात येतं आहे.
आपल्या आयुष्यात एवढे बदल होत असताना आपल्याला त्याचा अंदाज हवा आणि आपणच आपल्या बदलत्या जगण्यात डोकावून काही उत्तरंच नाही तर प्रश्नही शोधावीत म्हणून हा एक प्रयत्न! आपण खरंच कनेक्ट झालो आहोत का? खरंच जग जवळ आलं आहे का? आपल्याला मिळणा:या हजारो लाइक्समुळे आपल्याला खरंच बरं वाटतंय का? आनंद होतोय का? - हेच सगळं शोधण्याचा हा एक प्रयत्न.
या लेखमालेत आपण जिग सॉ पझल जोडून पाहावं, तसे तुकडे तुकडे जोडत एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत.
जो प्रश्न आज जगभरात गांभीर्यानं विचारला जातो आहे, ‘इज कनेक्टिव्हिटी किलिंग यू?’
काही वर्षापूर्वी मॅट्रिक्स नावाचा सिनेमा आला होता. त्यात एक वेगळीच संकल्पना मांडली होती. आपल्याला जे खरं जग वाटतंय ते खरंतर आभासी जग आहे आणि हे जग एका कम्प्युटर प्रोग्रामने चालवलं जात आहे. आपण जे काही करतो तो खरंतर एक कम्प्युटर प्रोग्राम आहे. आपलं आयुष्यही आता या मॅट्रिक्ससारखंच झालंय का? होतंय का?
प्रत्यक्षात वेगळं, पण आभासी दुनियेत वेगळंच. आणि तेच खरं असं वाटू लागणं, हा त्याचा पुढचा टप्पा आहे.
स्मार्टनेसच्या अनेक दुष्परिणामांना सामोरं जाण्याच्या तयारीत आहे. हे परिणाम वैयक्तिक नात्यांवर होणारे आहेत, सामाजिक व्यवहारांवर होणारे आहेत, वैचारिक आणि भावनिक प्रवासावर होणारे आहेत. एखादी गोष्ट समजून घेणं, त्यासाठी लागणा:या पेशन्स, अभिव्यक्तीतली सहजता आणि सद्सद्विवेक हे सारं झपाटय़ानं कमी होतंय का यावर जगभरात विविध संशोधनं चालू आहेत. सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्यातील वर्तनबदलांची निरीक्षणं त्याअंतर्गत नोंदवली जात आहेत.
- मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)