हल्ली बाळाचा जन्म झाला आणि काही वेळाने हॉस्पिटलमधील नर्सने बाळ आणून नातेवाइकांच्या हातात दिलं की, त्याचे स्मार्ट मावशी, काका, मामात्या नवजात बाळासमोर स्मार्टफोन धरून त्याचा फोटो काढतात. सेल्फी काढतात आणि इतरांना तत्काळ व्हॉट्सअॅप करतात. पूर्वी बाळाला झोप यावी म्हणून आई किंवा आजी अंगाई गीत गाऊन बाळाला थोपटायची, आता काही तरुण आईबाबा बाळाला स्मार्टफोनवर गाणी ऐकवतात नाहीतर व्हिडीओ दाखवतात.
मुलंही मोठी होताना त्या स्मार्टफोनशी खेळतात. गाणी पाहतात, मग गेम खेळतात. त्यांना ते मोबाइल वाढत्या वयासह उत्तम हाताळताही येतात. त्यात मामाचा, मावशीचा, काकाचा मोबाइल म्हणजे तर हमखास खेळण्याची वस्तू! पण त्यामुळे अनेकांच्या फोनवरून इतरांना परत परत कॉल जातात, काहीबाही मेसेजही जातात. मग फोन करून सांगावं लागतं की, चुकून झालं. फोन आमच्या बाळाच्या हातात होतात. अनेकदा तर काही जणांची सगळी फोन लिस्ट, फोटो असं काहीबाही डिलीटही होऊन जातं. भाचा/भाची, पुतणो कितीही लाडाकोडाचे असो, असं काही झालं की चिडचिड होते आणि मग त्या मुलाचा राग यायला लागतो. पण त्यांच्या हातात स्मार्टफोन दिला नाही की ते बाळ रडून दंगा करतं. कारण त्याला त्या फोनची सवय आपणच लावलेली असते.
यावर उपाय म्हणून हे एक अॅप वापरून पाहा. तुमची भाचरं असतील, शेजारपाजारची लाडाची लेकरं तुमच्या मोबाइलशी खेळत असतील तर हे अॅप कामाचं ठरेल!
किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल
किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अॅप जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधे असेल तर चुकून कॉल होणं, मेसेज जाणं, नको ते डाऊनलोड होणं हे सारं तुम्हाला थांबवता येऊ शकेल. हे अॅप सध्या काही फिचर्ससह मोफत उपलब्ध आहे.
त्यात आहे काय?
1. किड्स प्लेस-पॅरेंटल कंट्रोल हे अॅप चालू केल्यानंतर स्क्रीनवर फ़क्त पालकांनी मुलांसाठी परवानगी दिलेले अॅपच दिसतात.त्यामुळे मुलांना या अॅपव्यतिरिक्त दुसरे काही करता येत नाही.
2. यामध्ये इंटरनेट डिसेबल करण्याची सुविधा असल्यामुळे चुकून काही ऑनलाइन खरेदी किंवा काही डाऊनलोड होत नाही.
3. यामध्ये टायमर हे आणखी एक चांगले फीचर असल्यामुळे हे अॅप काही वेळानंतर आपोआप लॉक होते.
4. हे अॅप चालू असताना इनकमिंग कॉल ब्लॉक करण्याची सुविधासुद्धा यामध्ये आहे. सर्व वायरलेस सिग्नलपण डिसेबल होतात.
5. या अॅपमधून बाहेर यायचे असल्यास पासवर्ड द्यावा लागतो जो फक्त ज्याचा मोबाइल त्याच्याकडे असतो. त्यामुळे मुलं हे अॅप स्वत: बंद करू शकत नाहीत. हे एवढं केलंत तरी स्मार्टफोन मुलांच्या हातात आहे म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही!
Kids Place - Parental Control
हे अॅप गूगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे.
- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com