- भक्ती सोमण‘स्वयंपाकघरात काय लुडबुड करतोस, मुलांची कामं आहेत का ही? बाहेर जाऊन बस..’‘स्वयंपाक ही काय पुरुषांची कामं आहेत का? जरा पुरुषासारखं वाग..’- अशी दिव्य वचनं घरोघर उधळली जाण्याचा एक काळ होता. आजही अशी मुक्ताफळं घरोघरचे पुरुषच नाही तर आयाही उधळतातच.पण जे जे टीव्हीवर दिसतं त्याला ग्लॅमर येतं अशा एका काळात आपण जगायला येऊन पोहचलो आणि ‘कुकिंग’ या शब्दालाही अनेकांच्या जगण्यात ग्लॅमर आलं.मात्र तरीही टीव्हीवरचे कुकिंग शो पाहणाऱ्या मुली-महिलांना ‘कुकिंग शो’चं पब्लिक म्हणवून हिणवणं काही थांबलं नव्हतंच. त्याउलट मुलगे ते काय पाहणार तर स्पोर्ट्स, डिस्कव्हरी नाही तर बातम्या!त्यांची बरोबरी साधायची म्हणून अनेक मुलींनीही मग किचनची वाट नाकारलीच. सोबत असे कुकरी शो पाहणंही त्यांना उगीच जुनाट वाटू लागलं.पण काळच तो बदलतोच.आणि त्यासोबत तरुण होणाऱ्यांच्या, जगणं नव्या नजरेनं जगणाऱ्यांच्या पिढ्याही बदलतात.काही वर्षांपूर्वी टीव्हीवरच्या ‘कुकरी शो’चा चेहरामोहराच बदलत साऱ्या जुन्या कल्पनांना छेद देण्याचं पहिलं काम शेफ संजीव कपूर यांनी केलं.टीव्हीवर ते दाखवत असलेले विविध पदार्थ ‘करताना’ पाहणं त्यावेळी पुरुषांनाही आवडू लागलं. विविध पदार्थ करण्याचा तो आनंद आपल्याला मिळावा म्हणून मग काही तरुण तुर्क स्वयंपाकघरात ये-जाही करू लागले. अर्थात त्यांची संख्या अत्यल्पच होती. आहे.खरं सांगायचं तर घरचा स्वयंपाक हा बाईनं आणि हॉटेलमधला तामझामवाला स्वयंपाक पुरुषांनी म्हणजेच 'शेफ'नी करायचा असं एक गृहीतकच आपल्याकडे आपोआप निर्माण झाल्यासारखं आहे. त्यात करिअरबिरिअरच्या महाकाय संकल्पनेत तर स्वयंपाकात करिअर हा शब्दही तरुण मुलांच्या कानावर पडणं दुरापास्त.मुलांनीच काय मुलींनीही म्हटलं असतं ना की, कुकिंगमध्ये करिअर तरी घरच्यांनी हेच म्हटलं असतं की, एवढं शिकवलं तुला ते काय अशा पोळ्या लाटायला? मुलग्यांची तर बातच सोडा!मात्र गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलू लागली आणि कुकिंगमध्ये करिअर ही संकल्पना हळूहळू तरुण मुलामुलींच्या आयुष्यात स्थिरावायला लागली. पण सोपी कशी असेल ही वाट?ज्यांना मनापासून ही स्वयंपाक- कला आवडते, त्यांना सुरुवातीला स्वयंपाकी म्हणून चिडवलंही गेलं. या क्षेत्रात करिअर होऊ शकतं, यावर कुणी विश्वास ठेवत नव्हतं. रंगगंधचवीच्या या दुनियेतली सृजनशीलता न दिसण्याचेच ते दिवस होते. पण आपण ‘शेफ’ व्हायचं असं ठरवून या कलेत स्वत:ला झोकून देणाऱ्यांनी कशाचीही पर्वा न करता मेहनतीच्या जोरावर आपलं अस्तित्व ठामपणे सिद्ध केलं.संजीव कपूर यांनी तर शेफ्सला ग्लॅमरस आयाम दिला. पण त्यापाठोपाठ शेफ मच्छिंद्र कस्तुरे, सुधीर पै, सलील फडणीस, विवेक ताम्हणे, मिलिंद सोवनी, नीलेश लिमये, देवव्रत जातेगावकर, परिमल सावंत अशा अनेकांनी, त्यातही मुख्यत्वे मराठी शेफनी आपल्या मेहनतीनं हॉटेल इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला, विविध चॅनल्स आले. त्यांनी कात टाकायला सुरुवात केली. चोवीस तास चालणाऱ्या या चॅनल्सवरचे कुकिंग शो लोकप्रिय होऊ लागले. कुकिंग स्पर्धांमध्ये तर तरुणीच नाही तर तरुणही सहभागी होऊ लागले आणि काही तर फक्त खाण्यापिण्याला वाहिलेले चॅनल्सही याचकाळात सुरू झाले. खाना-खिलाना या साऱ्याला ग्लॅमर येण्याचा हा काळ आहे.खाद्यपदार्थांबरोबरच शेफ्स म्हणून नव्यानं टीव्हीवर झळकलेल्या अनेकांचा एकदम नूरच पालटून गेला. रणवीर ब्रार कसला यंग आहे? किती मस्त दाखवतो तो अमुक अमुक रेसिपी...तो विकास खन्ना काय मस्त प्लेट सजवतो. कसला किलर हसतो..अशा चर्चा या वाहिन्या पाहून तरुण कट्ट्यावर आणि सोशल मीडियातही सुरूझाल्या. ग्लॅमरचं आलं, पैसा आला आणि हे क्षेत्र अनेकांच्या करिअर लिस्टमध्येही दाखल झालं. आपल्या हाताला पण चव आहे, आपल्यालाही आवडतं चांगलंचुंगलं करून इतरांना खाऊ घालायला. असं ज्यांना वाटू लागलं ते केटरिंग कॉलेज, हॉटेल मॅनेजमेण्ट संस्था शोधू लागले. प्रसंगी इंजिनिअरिंगपेक्षा जास्त पैसा आणि प्रसिद्धी देणारं 'शेफ' हे क्षेत्र तरुणींनाच नाही तर तरुणांनाही खुणावू लागलं. इंजिनिअरिंग, डॉक्टर या क्षेत्राकडे जेवढ्या जिद्दीने मुलं बघायची तशीच आता अनेक मुलं शेफ होण्याकडे वळत आहेत. अनेकांना यातलं ग्लॅमर, पैसा आकर्षित करतोय हे सत्य आहे. पण तरीही आपल्या समाजातला हा एक महत्त्वाचा बदल आहे.तरुण मुलांना कुकिंगमध्ये करिअर करावंसं वाटतंय, स्वयंपाक या कलेच्या प्रेमात पडून त्यात प्रयोग करावेसे वाटताहेत. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक हे बायकी काम, ते आपण का करायचं, असा जुनाट विचार तोडूनमोडून टाकत आपल्या जगण्याला रंगगंधचवीवाल्या एका खास करिअरची झणझणीत फोडणी अनेकजण देऊन टाकताहेत.या क्षेत्रात तग धरायचा प्रचंड मेहनत करावी लागेल. तिला कल्पकतेची जोड द्यावी लागेल हे त्यांनाही कळतं. आणि म्हणूनच तरुण मुलांनी निवडलेली ही नव्या करिअरची वाट जास्त भन्नाट आहे.कसं वाटतं, त्या वाटेवर चालताना? किचनमध्ये केलेले प्रयोग अनेकांना खाऊ घालताना, आणि ‘शेफ’ म्हणून करिअर करताना?या मुलांचे अनुभव पाहता एक लक्षात येतं की, शेफ या क्षेत्राला चांगलंच ग्लॅमर आहे. त्या ग्लॅमरपोटीच काहीजण या क्षेत्रात काहीतरी करू पाहत आहेत. पण ज्यांच्यांमध्ये उपजतच स्वयंपाकाची आवड आहे त्यांना तर स्वबळावर शेफ म्हणून मोठं होण्याची इच्छा आहे, संधीही आहे. अनेक तरुण शेफ्सशी गप्पा मारल्या..त्यातून सजलेल्या गप्पांची ही एक खास खमंग प्लेट..ग्लॅमर आहे, कष्टही आहेतच! हे क्षेत्र ग्लॅमरस आहे याची पूर्वीपासूनच जाणीव होती. पण ग्लॅमर दिसत असलं तरी या क्षेत्रात तग धरण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते; तरच तुम्ही टिकू शकतात. मी सध्या परदेशात हॉटेल मॅनेजमेण्टचं उच्च शिक्षण घेतोय, ट्रेनिंगही घेतोय. ते करतानाही खूप शिकायला मिळतं. आपण याच क्षेत्रात करिअर करायचं हे ठरवलं होतं. इथल्या मेहनतीची कल्पना होती. त्यामुळे अवघड गेलं नाही. अगदी भांडी घासण्यापासून सर्व कामं आम्हाला शिकताना करावी लागतात. पण त्याबद्दल मला अजिबात लाज वाटत नाही. उलट आपण केलेला पदार्थ जेव्हा समोरचा आनंदाने खातो तेव्हा समाधान मिळतं. ग्लॅमर आणि मेहनतीच्या जोरावरच मला यात खूप मोठं नाव कमवायचं आहे. कारण आपण पदार्थ बनवून लोकांना खिलवण्यासारखा दुसरा आनंदच नाही. - अभिषेक कामत किचनमधली क्रिएटिव्ह धडपड शेफ म्हणून करिअर करायचं हे मी आठवीपासूनच ठरवलं होतं. पण माझ्या आईबाबांना मात्र मी या क्षेत्राबाबत गंभीर आहे असं तेव्हा वाटलं नव्हतं. मी तेव्हा घरी पदार्थ करायचो ते सगळ्यांना आवडायचे. दहावीनंतर नाईलाजानं सायन्सला प्रवेश घेतला पण माझी आवड बघून मग आईबाबांनीच तू या क्षेत्रात जा असं सांगितलं आणि बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करताना कुकिंगमध्ये जास्त रस घेतला. सध्या मी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये ट्रेनी शेफ म्हणून काम करतोय. पण यात अगदी बेसिक बेसिक गोष्टींपासून सारं शिकतोय. भाज्या चिरण्यापासून सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत. इथं तुम्हाला पूर्ण वेळ सजग राहून काम करावे लागते. चमचमत्या हॉटेलच्या पाठीमागचा किचनचा चेहरा मात्र तुम्हाला खरी धडपड शिकवतो. त्या धडपडीत तुमच्या इच्छेने तुम्ही तग धरलात, कष्ट घेतलेत तरच यशस्वी होता येतं. कष्ट घेऊन केलेल्या या कामाचं मोल मला जास्त आकर्षित करतं. - अजिंक्य रानडे इंजिनिअरिंग ते शेफ मी रोबोटिक इंजिनिअरिंग केलं आहे. पण घरच्या केटरिंगच्या व्यवसायामुळे हे क्षेत्र सुरुवातीपासूनच आवडत होतं. आवड म्हणून कोर्स केला. त्यावेळी ग्लॅमरच्याबरोबरीने या क्षेत्रातल्या मेहनतीची चांगलीच जाणीव झाली. पदार्थांची रचना कशी असावी याचीही माहिती मिळाली. प्रथमदर्शनी ती कठीण वाटत असली तरी सरावानं सगळ्या गोष्टी जमायला लागल्या. लोकांना खिलवणं आता मला खूपच आवडायला लागलंय. त्यामुळे आवडीला मेहनतीची जोड देऊन स्वत:च्या हॉटेलमध्ये काम करताना खूप मजा येतेय. - आशिष जाधव ग्लॅमर आहेच इथं.. मी मूळचा बुलडाण्याचा. ग्लॅमर म्हणूनच हे क्षेत्र निवडलं. त्यासाठी औरंगाबादमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कॉर्स केला. वेगळा पर्याय म्हणून पुण्यात बेकरीचा कोर्स केला. शिकता शिकता या क्षेत्रातल्या मेहनतीची चांगलीच जाणीव झाली. त्यामुळे आता मेहनत घेऊनच काम करणार आहे. सध्या जॉबही बघतोय. - गोपाळ इंगोलेआवड होती, करिअर बदललं.. मी पुण्यात डेरी मॅनेजर म्हणून काम करत होतो. त्यादरम्यान आपलंही हॉटेल असावं, आपणही लोकांना चांगलंचुंगलं खायला घालावं असं वाटत होतं. हॉटेल व्यवसाय कसा असतो ते माहिती असलं तरी त्याचं प्रॅक्टिकल शिक्षण घेण्यासाठी छोटासा हॉटेल मॅनेजमेंटचा कॉर्स केला. वयाच्या ३७व्या वर्षी करिअर बदलण्याचा निर्णय घेणं धाडसाचं होतं. पण ग्लॅमरपेक्षा आवडीला जास्त महत्त्व दिलं आणि कॉर्स केल्यावर या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. हॉटेलमध्ये जेवायला आल्यावर साधारण एक प्लेट तयार करताना पदार्थांचं प्रमाण किती असावं याचा अंदाज आला. पदार्थांचे मापदंड लक्षात आले. त्याचा उपयोग माझ्या हॉटेलमध्ये झाला. यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तुम्ही उत्तम शेफ जरी झालात तरी तुमच्या हॉटेलचं वा तुमचं यश हे डस्टबीनवर अवलंबून असतं. कारण डस्टबीनमध्ये जेवढं कमी अन्न जातं तेवढा पैसा जास्त मिळतो. मात्र त्यासाठी मेहनत लागतेच. - संतोष तेली ग्लॅमर नाही, कला महत्त्वाची! मी केटरिंग कॉलेजला शिकत असताना माझ्या बॅचला आम्ही ३० जण होतो. त्यापैकी आम्ही पाचजण आज शेफ म्हणून काम करतोय. पण आज जेव्हा मी मुलांना शिकवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे टीव्हीवर दिसणाऱ्या शेफ्सचा, वाहिन्यांचा प्रचंड प्रभाव या मुलांवर आहे. किंबहुना टीव्हीमुळेच शेफ्सना ग्लॅमर मिळायला लागलेले आहे. सध्या ९० टक्के मुलं ही ग्लॅमर म्हणून या क्षेत्राकडे येतात, तर १० टक्के मुलं ही जिद्दीने, मेहनतीने या क्षेत्रात तग धरतात. कारण इथे पैसा जरी खूप असला तरी १२-१३ तास किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ उभं राहून काम करावं लागतं. वेळ खूप द्यावा लागतो. तुम्हाला जो भलामोठा वा छोटा कोणताही मेन्यू येईल तो बनवून झाल्याशिवाय तुम्हाला त्या जागेवरून हलताच येत नाही. शेफ होण्याला किती कंगोरे आहेत याची जाणीव मुलांना प्रशिक्षणात होते. त्यामुळे नुस्ते ग्लॅमरला भुलून जे इकडे येतात ते टिकत नाहीत, जे या कलेवरच्या प्रेमापोटी येतात. ते टिकतात. यशस्वी होतात.- शेफ प्रसाद कुलकर्णी
शेफ होताना कराव्या लागणाऱ्या कष्टाच्या कामाची एक झलक
१) कोर्स केल्यानंतर ट्रेनी शेफ सुरुवातीच्या काळात मोठमोठ्या हॉटेल्समध्ये काम करण्याची, प्रशिक्षणार्थी म्हणून शिकायला जाण्याची संधी मिळते. पण गेलो नि लगेच पदार्थ तयार करायला उभं राहिलो असं अजिबात होत नाही.
२) सुरुवातीला तर आपल्या वरिष्ठांना मदत म्हणून कित्येक किलो कांदे, मिरच्या इतर भाज्या सोलून, ठरलेल्या आकारात काटेकोर चिरून देणं, कित्येक किलोचे बटाटे सोलणं, चिरणं अशी महत्त्वाची कामे करावी लागतात. त्यातून चिरण्यावरचा हात तयार होतो.
३) हॉटेलमध्ये कार्यक्रम असेल तर ६० ते ७० किलो फळांच्या साली सोलव्या लागतात.
४) मोठमोठी भांडीही कधीकधी घासावीच लागतात.
५) या सगळ्या गोष्टी करता करता हळूहळू तुम्ही पदार्थ तयार करण्यासाठी वरिष्ठांना मदत करायला लागता. त्यानंतर तुमची कामाप्रतिची निष्ठा आणि आवड पाहून तुम्हीही पदार्थ तयार करायला लागता.
६) १५ ते १६ तास उभं राहून काम करण्याची तयारी असावी लागते.
७) लोकांच्या सुट्टीचे दिवस आणि सणावाराप्रसंगी काम जास्त असतं. त्यामुळे त्यासाठी तुम्ही कामावर हजर राहणं गरजेचचं असतं. असे खूप मुद्दे सांगता येतील.
..अर्थात मुलीही आघाडीवर
शेफ होणं आता मुलींसाठीही करिअर आहेच. पूर्वी हॉटेलमध्ये मेहनतीची कामं जास्त असायची, कामाचे तास खूप असतात. त्यामुळे मुलींना अशा हॉटेल्समध्ये काम करणं कठीण जायचं. आता मात्र परिस्थिती खूप बदललेली आहे. अनेक मुली या क्षेत्रात येऊन धडपड करत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीनं कामाचा भारही हलका झाला आहे. त्यामुळे मुली या क्षेत्राकडे वळत आहेत. जर हॉटेलमध्ये काम करणं शक्य नसेल तर स्वत:चं केटरिंग हाउस किंवा बेकरीही सुरू करण्याकडे मुलींचा कल दिसतो आहे.
( लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
bhaktisoman@gmail.com