- नीता पाटील
‘नंबर मिळवायलाच मला लई रावण्या करायला लागल्या होत्या. तिच्या मैत्रिणीच्या, पण नंबर भेटल्यावर काम सोपं झालं!’
- महेश सांगत होता. तो नाशिकजवळच्या छोट्या खेड्यात राहतो. ती त्याच्या शेजारच्याच गावात राहते. दोघं तालुक्याच्या गावी शिकतात. तशी ओळख आहेच. पण ती नंबर देत नव्हती, भीत होती की हा केव्हाही फोन करायचा आणि आपला फोन आणि शिक्षण बंद व्हायचं. घरचे फार लक्ष ठेवून असतात.
महेश सांगत होता, गेल्यावर्षी जानेवारीत ती मला हो म्हणाली आणि लॉकडाऊन झालं दोनच महिन्यात. मग फोन हीच माझी जिंदगी झाली.
महेश सांगतो, तो अनुभव गावोगावी-खेडोपाडी राहणाऱ्या अनेकांचा. प्रेमात पडणं, विचारणं, नाही म्हणणं, मागे लागणं, हे सारं कोरोनाकाळात आणि आता नंतरही सुरूच राहिलं. मात्र त्याला साथ दिली ती हातातल्या स्मार्टफोनने. एरव्ही लॅण्डलाईनवर फोन करणंच शक्य नव्हतं. मात्र कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या निमि्त्ताने का होईना, गुगल-झूम सुरू झाले. त्यामुळे घरचेही व्हीडीओ कॉलकडे कानाडोळा करू लागले. बऱ्याच प्रेमीजीवांना या व्हीडीओ कॉलने साथ दिली.
मात्र सगळ्यांच्याच कहाणीत असा सुखकर ट्विस्ट आला का?
रोहित सांगतो, ‘ती मला सांगायची की, व्हीडीओ कॉल कर, मला व्हॉट्सॲप कॉल करत जाऊ नकोस. पण मी नाही केला कधीच व्हीडीओ कॉल. कारण एक-दोनदा केला, तर माझं लहानसं अंधारं घर, मी लांब कुठं शेतात, बांधावर जाऊन बोलणं, माझी आर्थिक परिस्थिती, माझ्या घरातल्या माणसांचं राहणीमान हे सारं तिला आवडेनासं झालं. भांडणं होऊ लागली. शहरात राहणारा मी आणि गावात राहणारा मी वेगळाच होताे, तिला हा गावठी मी आवडत नव्हतो आणि तिनं दिवाळीच्या तोंडावरच ब्रेकअप केलं!’
- ही कहाणी फार अपवाद नाही. लॉकडाऊन झालं आणि खेडोपाडी राहणारे अनेकजण गावी परतले. त्यांची शहरी जीवनशैली त्यांना गावी गेल्यावर बाजूला ठेवावीच लागली. लॉकडाऊनमुळे घरात आलेली चणचण, शेतातली कामं, घरातले प्रश्न. शिक्षणाचं भवितव्य असे अनेक प्रश्न समोर होते. त्याकाळात प्यार से भी जरुरी कई काम है म्हणत अनेकांनी आपल्या प्रेमाची गाडी सायडिंगला लावली. शहरात प्रेमात पडणं आणि गावात राहूनच, ते लाँग डिस्टन्स प्रेम निभावणं हे अनेकांना जड गेलं. त्याला अपवाद मुलीही नव्हत्या. शहरी वातावरणात घरापासून दूर राहणाऱ्या मुली एरव्ही स्वतंंत्र वाटत असल्या तरी, गावात, घराच्या शिस्तीत, घरकाम, ते पाणी भरणं, ते गावात समाजात वावरणं यासाऱ्यात त्यांनी बाकी जगापासून दूर राहणं, ‘कॉण्टॅक्ट’ कमी करणं असंही केलंच, असं स्मिता सांगते. ती मुंबईत एमबीए करत होती, लॉकडाऊन काळात गावी परत आली. म्हणाली, माझ्या किती मैत्रिणींना घरी मोबाईलवर ऑनलाईन शिकायचं, तर वडिलांकडे पैसे मागणं जीवावर यायचं. कारण परिस्थिती भयंकर होती. डेटा पॅक संपला चटकन तर काय होईल, याची भीती होती.
मात्र जे अनेकजण प्रेमात होतेच, त्यांनी मात्र मोबाईलवरचे डेटा पॅक पुरवून पुरवून वापरले. संपले डेटा पॅक की मित्र-मैत्रिणींना मस्का मारुन, त्यांना पॅक मारायला लावून, उधार उसनवारी करून कसंबसं निभावून नेलं ऑनलाईन भेटणं. मार पॅक की कर व्हीडीओ कॉल, एवढंच अनेकांचं लक्ष होतं. त्यासाठी जे काही जोडतोड करायचे ते त्यांनी केलेच.
महेश सांगतोच, सोपं नव्हतं कोरोनाकाळात प्रेम करणं, पण निभावलं. आता पुढेही निभलं घरच्यांसमोर सांगणं की जिंकलोच आम्ही!
- कोरोनावालं लव्ह हे, ते क्वारण्टीनच्या नियमांसारखंच कठोर होतं!
( नीता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकते.)