- ओंकार करंबेळकर
मुंबईतली अरुंधती कॉर्पोरेटची नोकरी सोडून छंदालाच आपलं काम बनवते तेव्हा..अरे आता काय आपलं शिकण्याचं वय आहे का? शिकलो ना एवढं, नोकरीबिकरी लागली, आता काय नी कधी शिकणार.. असं किती सहज म्हणतो आपण. चारचौघांसारखं जगण्याच्या नादात आपल्या आवडीनिवडीच विसरून जातो. आणि मग कधीकधी हळहळतो की, वेळात वेळ काढून मनासारखं काम केलं असतं तर बरं झालं असतं. आता पैसे आहेत पण वेळ नाही..बहुतांश माणसांची हीच कहाणी. पण मुंबईत राहणाºया अरुंधती म्हात्रे यांनी मात्र आपला छंद जगायचं ठरवलं.अरुंधतीचं निसर्गाशी नातंही अगदी अपघातानं जोडलं गेलं. मुंबई-ठाण्यात राहणाºया लोकांचं आयुष्य फ्लॅटमध्येच जातं. घर, लोकल, आॅफिस आणि विकेंडला आराम यापलीकडे फारसं काहीच सहसा घडत नाही. पण अरुंधतीनं एकदा सहजच चिमण्यांसाठी एक शेल्टर बॉक्स बाल्कनीमध्ये टांगला. काही दिवसांतच चिमणा-चिमणी जोडप्यानं तिथं घरटं केलं. नव्या पाहुण्यांचा दिनक्रम पाहत बसण्याचा चाळाच अरुंधतीला लागला. मग त्यांच्या लक्षात आलं आपल्या आजूबाजूला अनेक पक्षी आहेत. त्यांचंही निरीक्षण सुरु झालं. नंतर येऊर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायला सुरुवात केली. पक्ष्यांचे, फुलपाखरांचे निरीक्षण करणं, त्यांचे फोटो काढणं अशाप्रकारे ही दोस्ती वाढत गेली.या नव्या छंदाला थोडा आणखी वेळ आणि अभ्यासाची जोड द्यायचं तिनं ठरवलं. अरुंधती संगणक अभियंता असल्यामुळे नोकरीही कॉर्पोरेट क्षेत्रातच. वन्यजीव आणि निसर्गाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी तिने पुण्यामध्ये इकॉलॉजी सोसायटीमध्ये सस्टेनेबल मॅनेजमेंट आॅफ नॅचरल रिसोर्सेस अँड नेचर कॉन्झर्वेशनचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी पुण्यात जाऊन तासाला बसायचं आणि आठवडाभर नोकरी करायची असं चक्र सुरु झालं. त्यानंतर त्यांनी ठाणे फर्न संस्थेचा फिल्ड बॉटनीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. हे सगळं सुरु असताना त्यांची भ्रमंतीही सुरु झाली. नव्या फुलांचं, झाडांचं, फुलपाखरांचं, पक्ष्यांचं निरीक्षण कर, त्यांची माहिती गोळा कर अशा सवयींमुळे त्यांचं स्वत:चं ज्ञानही बºयापैकी वाढलं होतं. त्यांच्या सात-आठ वर्षांच्या अनुभवाला आता निसर्गशिक्षणाची जोड लाभली होती.त्यानंतर अरुंधतीनं पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रातच काम करायचं निश्चित केलं. सलग १३ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात केलेली नोकरी सहजासहजी सोडणं शक्य नव्हतंच. पण निसर्गाची ओढ शांत बसू देत नव्हती. चार वर्षांपूर्वी तिनं स्वत:ची 'अरण्या' नावाची संस्था स्थापन केली. लहान मुलांना निसर्ग अभ्यासाची ओढ लागावी यासाठी त्या संस्थेद्वारे विशेष प्रयत्न केले जातात. पक्ष्यांचं खाद्य ठेवायची फीडर्स वेगवेगळ्या वस्तूंपासून कशी बनवायची हे लहान मुलांना शिकवणं, करवंट्या, माती, बांबू अशा विविध वस्तूंपासून त्या बर्डफीडर्स बनवणं सुरु झालं. ताडदेवच्या एका शाळेत आठवड्यातून तीनदा निसर्ग अभ्यासाचे धडेही मुलांना गिरवणं सुरु झालं.अरुंधती म्हणते, ‘मी जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा शहरात वाढलेल्या लोकांशी बोलते तेव्हा निसर्गाचा आणि आपला संबंध तुटत चाललाय हे लक्षात येतं. पैसे असले की काहीही विकत घेता येतं असं लोकांना वाटायला लागतं. शहरात राहणारी माणसं आपल्या विचित्र जीवनशैलीमुळं अनेक आजारांना, ताणाला आमंत्रण देतात हे उघड दिसतंय. खरंतर एखादं फुलपाखरू फुलावर बसलंय, घरट्यातून आत-बाहेर करत पिलांना भरवणारी चिमणी, कुंडीतल्या फुलांना येणारी रोपं नुस्ती पाहिली तरी यातला निम्मा ताण जाऊ शकतो. यासाठीच आपण सर्वांनी निसर्गाशी 'कनेक्ट' वाढवायला हवा.'हा कनेक्ट वाढवायला अरुंधती यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी निसर्गात फुकट मिळणाºया बिया आपल्या कशा उपयोगाच्या हे तरुण मुलींना तोंडी सांगण्याच्या ऐवजी त्यांनी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये त्या या बियांचा वापर करून 'इअरिंग्ज' बनवायला सुरुवात केली. ही नव्या प्रकारच्या इअरिंग्जची कल्पना पोरींना भारी आवडली. त्यांच्या वर्कशॉपला प्रतिसादही मिळाला.बियांचे दागिने शिकवताना ही अमुक झाडाची बी, त्यामुळे पोटदुखी बरी होऊ शकते. ही बी तमुक आजारावर इलाज म्हणून आयुर्वेदात वापरली जाते अशी माहितीही त्या देतात. पारंपरिक पद्धतीने मुलांना सांगण्याऐवजी अशा गमतीदार पद्धतीने आवडेल अशा, समजेल अशा भाषेत शिकवलं तर वन्यजीव आणि पर्यावरणाची तरुणांना चांगली गोडी लागते, असं त्या म्हणतात.(लेखक लोकमत आॅनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)