चिन्मय लेले
इंटरनेटवर कॉपी करायला शिकता येण्याइतकी अक्कल आहे; अभ्यास करण्याची नाही; असं कसं ?
---------
भारतात कॉपीची प्रकरणं काही नवीन नाहीत. तुम्ही आम्ही फुशारकीनंच अनेकांच्या ‘कॉपी’च्या कथा सांगितल्या आहेत. बाकीच्यांनी कौतुकानं ऐकल्याही आहेत. बिहारचं एक उदाहरण आत्ता जगासमोर आलं आणि त्यानिमित्ताने चर्चेला सुरुवात झाली.
पण त्या कॉपी प्रकरणानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
कॉपीच केली ना, त्यात काय एवढं; सगळेच करतात!
आता दहावीला कोण विचारतो, डिग्रीचा कागद असला म्हणजे झालं!
राजकारणी जर लाच घेतात, घोटाळे करतात, तर विद्यार्थ्यांनी काय घोडं मारलंय?
- ही अशी मुक्ताफळं काहींनी उघड उधळली, काहींनी मनातल्या मनात एवढंच!
कारण आपल्याकडे जसं कुणाला चिरीमिरी देऊन काम करून घेण्याचं, त्याला स्पीड मनी म्हणण्याचं काही वाटेनासं झालं आहे, तसंच कॉपी करण्याचंही!
वर्षभर अभ्यास करून, विषय नीट समजून घेऊन, परीक्षा उत्तम देऊन मग उत्तीर्ण होण्याची इथं कुणाला गरजच वाटत नाही. ज्याला त्याला फक्त पास व्हायचं आहे, डिग्रीचा कागद हवा आहे, आपल्याला काही येवो ना येवो, वर्ष वाया जाता कामा नये!
त्यात आपल्या शिक्षणसंस्था; त्यांनी जणू वसाच घेतला आहे विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्याचा! कारण कॉलेजातले विद्यार्थी पास झाले नाहीत, तर पुढच्या वर्षीची जबर अँडमिशन फी कोण भरणार?
त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा प्रवेश घेतला की त्याला पास करण्याचं, डिग्री देण्याचं व्रत कॉलेजच घेतं!
म्हणून तर काही विद्यार्थी बेलाशक सांगतात की, ‘अरे, मी तर फक्त सिनेमाची स्टोरी लिहिली. सगळ्या पेपरभर ‘प्यार तो होना ही था’ची स्टोरी लिहिली. उत्तराच्या सुरुवातीच्या दोन ओळी फक्त शेजारच्याच्या पेपरातून कॉपी मारल्या. सप्लीमेण्टपण लावली. मार्क पडले ना ४५!’
हे असं सगळं आपल्या अवतीभोवती इतके दिवस चालू होतं. सर्रास कॉपी प्रकरणं सुरूच होती!
पण आता कॉपी प्रकरणाला टेक्नॉलॉजीचा नवा आयाम मिळाला आहे!
काही कॉपीबहाद्दर इतके हुशार की ते स्वत: अभ्यास न करता फक्त कॉपी करून पास होतात. आणि आपण कशी स्मार्ट कॉपी केली आणि पकडलो कसे गेलो नाही असं म्हणत इंटरनेटवर कॉपी कशी करावी असे व्हिडीओही टाकतात. फक्त भारतातले कशाला, जगभरातले तरुण त्यात आघाडीवर आहेत. अनेक कॉपीबहाद्दर तर आपापल्या टीप्स, आपापले फंडे, आयडिया एकमेकांशी शेअर करतात. त्यातून कॉपी करण्याचे वेगवेगळे प्रकार शिकतात.
भारताप्रमाणेच चीन, कोरिया, दक्षिण अमेरिकी देश इथं कॉपी करण्याचं प्रमाण जास्त आहे. पण तिथली पिढी टेकसॅव्ही. त्यामुळे ते इंटरनेटचा वापर कॉपी करणं शिकण्यासाठीही करू लागले आहेत. एखाद्या सराईत प्रोफेशनलसारखी कॉपी कशी करावी? पकडलं जाऊ नये म्हणून काय ट्रिक्स वापराव्यात आणि पकडलो गेलोच तर प्रसंगावधान जपत नामानिराळं कसं व्हावं याचं ऑनलाइन कोचिंग घेणारे काही कमी नाहीत!
जो वेळ अभ्यासासाठी घालवायचा तोच वेळ कॉपी करण्याच्या विचारासाठी सर्रास वापरला जातो आहे. त्यातून कॉपी करण्याचे जुने तरिके मागे पडून आता कॉपी करणारे एकसेएक टेकस्मार्ट फंडे वापरू लागले आहेत! नियम तोडून, चिटिंग करण्याचं तरुण मुलांचं बळ किती वाढतं आहे, निर्ढावलेपण किती सराईतपणे येतं आहे, याचंच हे उदाहरण म्हणायला हवं!
------------
हायटेक कॉपीचे काही अजब प्रकार
१) अनेक मुलं मोठ्ठं खोडरबर विकत घेतात. त्या खोडरबरवर बारीक अक्षरात मुद्दे लिहितात. विशेषत: पेन्सिलनं. काम झालं की घासून पुसून टाकतात.
२) मुली हाताला खोटी नखं लावतात. त्या नखांमधे बारीक पुंगळ्या केलेल्या कॉप्या लपवतात.
३) काही मुलं बारीक पुंगळ्या बॉलपेनच्या टोपणात लपवतात. काही हुशार तर बॉलपेनची नळी कापून, त्या नळीत पुंगळ्या घालतात.
४) काहीजण कॅलक्युलेटरचा वापर करतात, त्याच्या कीपॅडच्या खाली कॉप्या लपवतात. हल्ली काही कॅल्सींना मेमरी स्टोअरेज असतं, त्यात मेमरी फीड करून ठेवतात, कॉप्या!
५) काहीजण चक्क ऑनलाइन कॉपी करायचं शिकतात. त्यात आघाडीवर इंजिनिअरिंग करणारे!
६) इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी तर मोबाइल फोनचा मेकओव्हर करतात. मोबाइलच्या कीपॅडला कॅल्सीचं कीपॅड लावून कॅल्सीचा लूक देतात.