-माधव भट
तुम्ही नवखे असाल, पहिल्यांदा ट्रेकला या कोरोना काळात जाणार असाल तर काही गोष्टी माहिती हव्याच आणि मुख्य म्हणजे त्यांचं पालनही करायलाच हवं. एकतर शासनाने दिलेले नियम पाळावेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुख्य म्हणजे पहिल्यांदा ट्रेकला जाणार असाल तर अनुभवी ग्रुपबरोबर जा. ग्रुपची नीट चौकशी करा. दहा वर्षांपेक्षा लहान आणि ज्येष्ठांना ट्रेकला नेऊ नका. स्वतः जाणार असाल तर आधी त्या गडाची माहिती करून घ्या, इंटरनेटवर बऱ्याच किल्ल्यांची माहिती उपलब्ध आहे. तेथील लोकल माणसाचा नंबर मिळवा. त्यांच्याशी बोलून तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन मग तारीख ठरवा. सोबत वाटाड्या घेऊन जा, त्यामुळे वाट चुकायचा, हरवण्याचा प्रश्न येत नाही आणि त्या लोकांना रोजगार मिळतो. खायचं काय, हा महत्वाचा प्रश्न असतो.
त्यावर उत्तर म्हणजे न्याहारी शक्यतो घरूनच न्या. बाहेरचे खाणे टाळा. भरपूर पाणी घेऊन जा. सोबत प्रथमोपचाराचे गोष्टी जसे पेन किलर, बँडेज क्रेप इत्यादी
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शूज. शक्यतो ट्रेकिंगचे शूज घ्यावेत. आपल्याला काही विकार असतील तर प्रथम डॉक्टरचा सल्ला घ्या.
नुसतं ट्रेकिंग नाही तर हल्ली अनेक रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग करायला जातात. पण ते करण्यापूर्वी संयोजक कोण आहे ते नीट तपासून पाहा.
सर्व सेफ्टी इक्वीपमेण्ट त्यांच्याकडे आहेत, ते उत्तम प्रशिक्षित आहेत याची खात्री करून घ्या. मुख्य म्हणजे आपण फिजिकली फिट असू, तसा डॉक्टरांनीही सांगितलं असेल तरच हे प्रकार करावेत. अन्यथा नाही.
सध्या अनेक किल्यांवर गर्दी दिसते. तुम्ही गडावर गेलात आणि खालीच कळलं की खूप गर्दी आहे तर काय कराल?
ट्रेकला गर्दी असेल तर खाली गावात थांबून राहावे; पण अजून गर्दी करू नये. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. रात्री ट्रेकिंग, गडावर मुक्काम करणं योग्य आहे का, याची गावकऱ्यांकडे चौकशी करावी, ते देतील तो सल्ला ऐकावा. गडावर राहण्याची काय सोय आहे, हवामान कसे आहे, त्याप्रमाणे कपडे झोपण्यासाठी लागणारे साहित्य न्यावे लागते. त्यामुळे त्याचे नियोजन पुरेसे आधीच करायला हवे. गडावर शेकोटी करणार असाल तर हवेचा अंदाज घेऊन योग्य जागा पाहून करावी. गडावर जाताना, राहताना गाणी, मोबाइल किंवा ब्लू टूथवर अजिबात वाजवू नयेत. त्यामुळे आपले लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतो.
तेथील पक्षी दूर जाऊन आपल्यालाच निसर्गाची मजा घेता येत नाही. शांतता ऐकायलाही आपण शिकू. तेच मद्य प्राशनाचं. ते करून ट्रेकला जाऊ नये. गडावर जाऊनही पिऊ नये. त्यानं अपघाताची शक्यता फार मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे मद्य प्राशन करू नये. छोट्या गावात प्राथमिक उपचार केंद्रही नसतात हे लक्षात ठेवावे. आपण समरसून शांततेत ट्रेक करावा. सेल्फी घेणे टाळावे. तोल जाऊन आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपला जीव गमावला आहे. तेव्हा फोटो काढतानाही योग्य काळजी घ्यावी. तेच सापांविषयी. माहिती नसताना सापांचे फोटो काढणं, त्यांना पकडणं टाळाआणि माहिती असली तरी ते करणं टाळावंच कारण बरेच अपघात त्यामुळे झालेले आहेत.
मद्यप्राशन, सर्पदंश, सेल्फी, आततायीपणा, सेफ्टी गेअर्स न वापरणं यामुळे बहुतांश अपघात होतात.
मुख्य म्हणजे कुणी माहितगार व्यक्ती सोबत असल्याशिवाय ट्रेकला जाऊ नये. आपला ग्रुप सोडून एकटं कुठं जाऊ नये. आपण ट्रेक करतोय, ही रेस नाही हे सदैव ध्यानात ठेवावे.
मुख्य म्हणजे मोबाइलला रेंज असेल तर आपल्या लोकेशनची माहिती घरच्यांना अथवा मित्रांना देत राहावी. संपर्क कायम ठेवावा.
( माधव ट्रेकर आहे.)