- मनीषा म्हात्रे
हौसेमौजेसाठी चोऱ्या करणारेतरुण गुन्हेगार यंदा पोलिसी तडाख्यात सापडलेच,पण डाटा पॅक मारून आधी सायबर अॅडिक्ट झालेले काही पुढे थेट ब्लॅकमेलिंग ते बलात्कारापर्यंतचे गुन्हे करत गजाआड गेले..मोबाइल दिला नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्त्या...सेल्फीच्या नादात दोघांचा बळी.. अश्लील व्हिडीओ पाहून अल्पवयीन तरुणाचे विकृत कृत्य... फेसबुक मैत्री महागात पडली..- अशा कितीतरी बातम्या यंदा आपण सर्रास वाचल्या. गुन्हेगारीच्या वाटेवर चालणारं तारुण्य तसं बातम्यांत नेहमी दिसतं. पण २०१६ या वर्षानं त्या वाटचालीत एक बदल आणला. अवघ्या १४-१५ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांपासून ते तरुणांपर्यंत सायबर अॅडीक्ट होत असल्याच्या तारुण्याचं एक चित्र यंदा समोर आलं. सायबर क्र ाइम, बलात्कार, प्राणघातक हल्ला, आत्महत्त्या, हत्त्या हे गुन्हे तर तरुणांकडून घडलेच; पण कानात इअरफोन अडकवून मोबाइलच्या धुंदीत रस्त्यावर वावरणाऱ्या, रस्ता आलांडताना, रेल्वेतून प्रवास करताना जीव गमवावा लागणाऱ्या तरुण मुलांच्या बातम्याही याच काळात झळकल्या. तरुण गुन्ह्यांचं चित्र कसं दिसलं?* मोबाइलमध्ये नेटपॅक मारला की सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप, फेसबुक, हाईक, इन्स्टाग्रामनी सारं जग जवळ येतं. नवनवीन ओळखी वाढवून, ग्रुप तयार करून हे तरुण-तरुणी एकमेकांच्या जवळ येतात. आणि हाच प्रवास पुढे अनेकांच्या संदर्भात दारू, ड्रग्जच्या पार्ट्यांपर्यंत पोहचलेला दिसतो. पोर्नोग्राफिक अॅडिक्शनची चिंता वाढीस लागली तीही याच काळात.* जबरी संभोगासोबतच अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराकडे तरुणाईचा विकृत कल वाढलेला दिसून आला आहे. लहान मुली नराधमांच्या वासनेला बळी पडल्या आहेत, तर अनोळखी मित्रासोबत केलेल्या मैत्रीतून फसवणूक, ब्लॅकमेलिंगला ही मंडळी फसत गेली. मुंबईत तर एका अभियंता तरुणाला सोशल साइटवर चक्क मुलीचे फेक खाते उघडून लाखोंचा गंडा घातला. चॅटिंगदरम्यान शेअर केलेल्या न्यूड फोटोतूनच तरु णाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. पोलिसांच्या दप्तरी अशा अनेक केसेस या वर्षभरात नोंदवल्या गेल्या.* यावर्षीच्या सुरुवातीच्या काळात सेल्फीने सर्वांनाच नादी लावले होते. स्वत:चा हटके सेल्फी काढण्यासाठी ही तरुणाई नवनवीत स्पॉट शोधू लागली. त्यातील काही स्पॉटवर सेल्फी काढताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तरीसुद्धा अशा स्पॉटवर सेल्फी काढण्याची क्र ेझ काही कमी होत नव्हती. अखेर अनेक शहरांत पोलिसांना नो सेल्फी स्पॉट जाहीर करावे लागले.* मॉडर्न राहणीमानाचा सिम्बॉल म्हणून तरुणाईनं नशेला जवळ केले. यातच शाळा, कॉलेज, हॉस्टेलच्या आवारात सहज उपलब्ध होणाऱ्या या तस्करांच्या विळख्यात ही मंडळी गुरफटली. * चरस, हेरॉईन, कोकेन या प्रचलित अमली पदार्थांसह एलएसडी, एक्सटीसी, मेफेड्रीन, एमडी, म्याऊ म्याऊ यासोबतच आता एक नवे नाव या यादीत आले आहे ते म्हणजे एन-बॉम्ब. आणि ते मुंबईतही पोहोचल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. ब्राझील, आॅस्ट्रेलिया, युरोप यांसारख्या देशांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता एन बॉम्ब हे ड्रग्जच्या नशिल्या दुनियेतलं नवीन आणि सर्वाधिक खतरनाक नाव भारताच्या सीमेमध्ये दाखल झालं. * नारकोटिक्स ब्युरोने गोवा आणि बेंगळुरूमध्ये धडक कारवाई करत काही ड्रग्जमाफियांना अटक केली. त्यांच्याकडून एन-बॉम्ब हे ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर याची ओळख सर्वांसमोर आली. * सुपरहिरोचा आभास निर्माण करणाऱ्या या ड्रग्सला पिंक सुपर मॅन, ब्ल्यू -बॅटमॅन, ब्लॅक-स्पाईडरमॅन, आ-२५ (क-२५) अशा अनेक नावाने ओळखले जाते. भारतात हे ड्रग्ज फक्त २५० ते ३०० रुपयांत उपलब्ध होते. ही किंमत इतर ड्रग्जच्या तुलनेत तशी कमी आहे. त्यामुळे तरुण यात अडकण्याचं भय आहे. * हौस, मौजमजेसाठी तरुणाई वाट्टेल ते करताना दिसते आहे. यात हत्त्या, चोरी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन गुन्हेगारही वाढले आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागतेय.