- गौरी पटवर्धनभारद्वाज सुंदर आणि नरेश नील. जाहिरात एजन्सी चालवतात. आपल्यासारखेच केव्हातरी निवांत गप्पा मारत बसलेले असताना विषय निघाला त्वचेच्या रंगावरून. भारतासारख्या देशात, जिथं बव्हंशी माणसं सावळी ते काळी या वर्णगटात मोडतात, तिथे सगळ्यांना मॉडेल, बायको, नवरा, फ्रण्ट आॅफिसमधले कर्मचारी हे मात्र ‘गोरेच’ पाहिजे असतात. असं का?इतकंच नाही तर आपल्याला आपले देवी-देवतासुद्धा गोरेपान आहेत अशा मूर्ती असतात. ज्याचं वर्णन सावळा, घनश्याम म्हणून केलेलं आहे तो कृष्णसुद्धा गोºया रूपात समोर येतो. असं का? अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली.सिनेमा-नाटकात, सिरीअलमध्येही देवाच्या किंवा देवीच्या भूमिकेसाठी किंवा फोटोसाठी घ्यायची व्यक्ती ही गोरी का असावी? सावळी देवी किंवा काळासावळा देव का असू नये? सावळ्या किंवा काळ्या वर्णाच्या लोकांना घेऊन उत्तम फोटो काढले तर लोक ते स्वीकारतील का? त्यामुळे त्यांच्या मनातली काळ्या रंगाची अढी कमी होईल का? अशा विचारांनी या दोघांनी कामाला सुरु वात केली आणि आकाराला आला डार्क इज डिव्हाइन हा प्रोजेक्ट.चर्चा करणं सोपं, काम सुरू केलं आणि पहिली अडचण आली. त्यांनी हे फोटोशूट करायचं ठरवलं आणि पहिलीच अडचण आली ती मॉडेल्स मिळण्याची. सावळ्या आणि काळ्या रंगाची मॉडेल स्वत:च्या वर्णाबद्दल अतिशय कॉन्शस होती. त्यांनी आधी ओळखीतल्याच मॉडेल्स शोधायचा प्रयत्न केला; पण काही जमेना म्हणून शेवटी ‘डस्की आणि डार्क’ मॉडेल्स हवे आहेत अशी जाहिरात दिली. त्या जाहिरातीला मात्र अनपेक्षितरीत्या सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांना मॉडेल तर मिळालीच, पण त्याचबरोबर काही गोºया आणि उजळ वर्णाच्या मॉडेल्सनीही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना प्रोजेक्टचं स्वरूप समजल्यावर त्यांनी या विषयाला आणि विचारला पाठिंबा दिला.मॉडेल्स सापडणं ही पहिली परीक्षा होती. पुढची परीक्षा होती ती हे फोटो उत्तम काढण्याची. कारण त्यात जरा काही कमी-जास्त झालं असतं तर देव-देवतांचे वाईट फोटो काढल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या. मग मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला असता. मुळात त्या दोघांचा उद्देश हा आपले देव गोरेच असले पाहिजेत हा आग्रह नाही एवढाच विचार मांडण्याचा होता. त्यामुळेच एखाद्या प्रोफेशनल असाइन्मेंटच्या किंवा त्याहूनही काकणभर जास्त काळजीपूर्वक तयारी या फोटोशूटची करण्यात आली. अतिशय सोज्वळ आणि पवित्र; परंतु सावळ्या आणि काळ्या वर्णाच्या देव-देवतांच्या प्रतिमा एकामागे एक कॅमेºयात कैद होऊ लागल्या. जसजसं फोटोशूट आकार घेऊ लागलं तसं या दोघांना लक्षात आलं की त्यांनी केलेला विचार अगदी योग्य होता. जिथे भावना आणि श्रद्धा असते तिथे त्वचेच्या रंगानं काहीही फरक पडत नाही.सावळ्या किंवा काळ्या रंगाची सीता आणि लव-कुश, कृष्ण, शंकर, दुर्गा, बाळ मुरु गन असे फोटो त्यांनी काढले. ते लोकांना दाखवले. केवळ लोकांच्या मनातील काळ्या रंगाबद्दलची अढी कमी व्हावी यासाठी ते ‘डार्क इज डिव्हाइन’ या नावानं सोशल मीडियावर टाकले. हा हा म्हणता ते व्हायरल झाले. त्या फोटोंची खूप चर्चा झाली. त्यातली बहुतेक सगळी चर्चा ही सकारात्मक होती. हे काय फोटो आहेत, त्यामागे काय विचार आहे यातलं काहीही न वाचता टीका करणारेही काही महाभाग होतेच; पण त्यांची संख्या तुलनेने अगदीच नगण्य म्हणावी अशी.नरेश सांगतो की, आम्हाला अनेक जणांनी/जणींनी विचारलं की ‘या इमेजेस मोठ्या करून घरात लावण्यासाठी मिळतील का?’ अर्थात ही अॅक्टिव्हिटी मुळात कमर्शियल विचारांनी केलेली नसल्यामुळे सध्या तरी अशा प्रकारे त्या फोटोंचा वापर करण्याचा त्या दोघांचा विचार नाही. पण लोकांनी आपणहून अशी चौकशी करणं हीच त्यांना मोठीच सकारात्मक प्रतिक्रि या वाटते आहे. अनेक लोकांनी सांगितलं की फोटोशूटमधून त्यांच्याच मनातल्या भावना व्यक्त होताहेत. आपल्यासारख्या वर्णाचे आपले देव-देवता लोकांना आपल्याशा वाटताहेत. असं वाटणं हा आपल्या काळ्या/ सावळ्या रंगाला स्वीकारण्याच्याप्रक्रि येतला एक महत्त्वाचा टप्पा आहे.नरेश सांगतो, या फोटोंमध्ये मॉडेल्स म्हणून काम केलेल्या कलाकारांना त्यांचे फोटो बघून ‘यू लूक सो डिव्हाईन’ अशा स्वरूपाच्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या, जे त्यांच्या आयुष्यात आजवर कधीच घडलेलं नव्हतं.‘माझा रंग ही आजवर माझी सगळ्यात मोठी कमजोरी होती, पण आता मात्र मी त्याकडे माझी सगळ्यात मोठी ताकद म्हणून बघेन’ असंही या दोघांना काही लोकांनी कळवलं.भारतासारख्या देशात, जिथे बव्हंशी लोक काळ्या-सावळ्या वर्णाचे आहेत, इथे ज्यांना गोरे म्हणतात तेही बाहेरच्या देशात ब्राउनच समजले जातात, तिथे हे गोरेपणाचं खूळ आपल्या सगळ्यांना विळखा घालून बसलेलं आहे. या वेडेपणावर मात करण्यासाठी नरेश नील आणि भारद्वाज सुंदर या दोन मित्रांनी उचललं इतकंच. आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारायला हवं कारण आपण जसे आहोत तसे छानच आहोत! patwardhan.gauri@gmail.com