- अनघा पाठक
(अनघा लोकमत टाइम्समध्ये सहायक उपसंपादक/वार्ताहर आहे.)
anaghapathak25@gmail.com
पूर्वी कॉलेजला गेल्यावर किंवा नोकरी लागल्यावर कुणी आवडलं म्हणून किंवा मुद्दाम हेरून पटवणं, पटणं, प्रेमात पडणं, जमानेसे दुश्मनी, खानदान की इज्जत असं सारं सुरू व्हायचं. त्यातून प्रेम वाचलंच तर बोहल्यावर चढणं नाहीतर मग आई-बाप म्हणतील त्याच्या/तिच्या गळ्यात माळ घालून मोकळं होणं. या सा-याला प्रेमप्रकरण, लफडं, अफेअर इत्यादि म्हणत! मग काळ पुढे सरकला. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपण एकमेकांचे गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड आहोत हे उघड मान्य करणं सुरू झालं.
पण समजा प्रेमात पडल्यावर लक्षात आलं की, प्रेमबिम वाटलं होतं पण नवरा-बायको म्हणून आपलं काही जमू शकत नाही. तेव्हा सरळ लग्नापूर्वीच वेगळ्या वाटा निवडण्याइतपत प्रॅक्टिकलही झालंच हे हवं!आता तर अनेक शहरी मुलंमुली खुलेआम सांगतात,आपला डेटिंग पिरीअड सुरू आहे, जमलं तर बघू करूही लग्नमात्र हे सारं ‘माहितीतल्या चाकोरीतलं’ मोडून काढत विदेशातले लोकप्रिय डेटिंग अॅप्स भारतात दाखल झालेत आणि प्रेमात पडण्याबिडण्यातल्या उरलासुरला शहरी रोमॅण्टिसिझम संपवून ते अनेकांना फक्त ऑनलाइन ऑप्शन्स देत सुटलेत!
सकाळ झालेली असते, रात्री दोन वाजता कसाबसा बाजूला ठेवलेला त्याचा/तिचा स्मार्टफोन टय़ॅह टय़ॅह वाजायला लागलेला असतो. त्याला जवळ घेतलं की एक फडफडतं नोटिफिकेशन दिसतं. 'You have got a new match. बरोबर वाचताय तुम्ही, मेसेज नाही मॅचच!!
जे सिंगल आहेत, ज्यांना शहरात राहण्याचं भाग्य लाभलंय आणि जे एका विशिष्ट आर्थिक आणि बौद्धिक वर्गात मोडतात त्यापैकी ब:याच तरुण मुलामुलींच्या लव्ह लाइफची ही कहाणी आहे.
फार पूर्वी बरं होतं. कॉलेजला गेल्यावर किंवा नोकरी लागल्यावर दोनचार नवे चेहरे दिसायचे. त्यातला एखादा हेरायचा किंवा आवडायचा आणि मग प्रयत्न सुरू करायचे. त्या चेह:यानेसुद्धा आपल्याला हेरलं की ‘प्यार का सिलसिला’ सुरू! पटवणं, पटणं, प्रेमात पडणं (निदान तसं वाटणं), आणाभाका घेणं, जमानेसे दुश्मनी, खानदान की इज्जत का सवाल, ते प्रेम वाचलंच तर बोहल्यावर चढणं नाहीतर मग आई-बाप म्हणतील त्याच्या/तिच्या गळ्यात माळ घालून मोकळं होणं या सा:याला प्रेमप्रकरण, लफडं, अफेअर इत्यादि म्हणत! साधारण इतपतच एकेकाळच्या तरुण मुलांचं ‘डेटिंग लाइफ’ मर्यादित होतं.
फार पूर्वीनंतर थोडय़ा पूर्वीचा काळ आला तेव्हाही सगळं असंच होतं. पण त्यात एक बदल झाला. म्हणजे काय तर प्रेमात पडताना किंवा पडल्यानंतरही जातीपातीसह अन्य कारणांमुळे आपलं लग्न होऊ शकत नाही हे मान्य करण्याइतपत पाऊल पुढं सरकलं. पण तरीही आपण एकमेकांना आवडतो, आपलं परस्परांवर प्रेम आहे हे मान्य करत जमेल तिथवर हे प्रकरण नेऊन सोडून दिलं जायचं.
त्यानंतर मग अगदी अलीकडचा काळ आला. आपलं प्रेम आहे, आपण एकमेकांचे गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड आहोत हे उघड मान्य करणं सुरू झालं. पण समजा प्रेमात पडल्यावर लक्षात आलं की, प्रेमबिम वाटलं होतं पण नवरा-बायको म्हणून आपलं काही जमू शकत नाही. म्हणून मग जिंदगी में सच्च प्यार सिर्फ एकबार होता है, असले डायलॉग न मारता सरळपणो जमत नाही हे मान्य करून वेगळ्या वाटा निवडण्याइतपत स्वत:विषयी खात्री वाटण्याचाही काळ आला. मात्र या टप्प्यावर आणखी एक गोष्ट घडली. आपण ज्याला प्रेम-लफडं-भानगड वगैरे वगैरे म्हणतो त्याला ‘डेटिंग’ हे एक साधं सरळ नाव आहे ही जाणीव तरुण मुलामुलींना झाली. आणि आपला डेटिंग पिरीअड सुरू आहे, अमुकतमुक आपली जीएफ किंवा बीएफ आहे इतपत खुलेआम सांगण्याचाही टप्पा आला.
पिढय़ा बदलल्या, काळ बदलला आणि डेटिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला तरीही या सगळ्यात एक गोष्ट कॉमन होती. त्याला भेटणारी ती किंवा तिला भेटणारा तो. हे एकमेकांना आपल्याच रोजमर्राकी जिंदगीच्या चाकोरीतच भेटायचे. कुणाचं कॉलेज एक असायचं, क्लास एक, ऑफिस एक, रोजची बस एक किंवा सरांची भाची, मैत्रिणीचा भाऊ असं कुणी कुणी ना कुणी रोजच्या जगण्याशी संबंधित, भेटणारं, दिसणारं असायचं!
आत्ताचा काळ मात्र वेगळा आहे.
सिरीयस कमिटेड रिलेशनशिप हीच गोष्ट अनेक तरुणतरुणींना महाकठीण वाटतेय. त्यामुळे प्रेमात पडलोच आहोत म्हणजे लग्न कम्पलसरी असं वाटणंही एका वर्गातील मुलामुलींसाठी सक्तीचं राहिलेलं नाही. त्यात टेक्नॉलॉजीच्या कृपेनं जग जवळ आलं. प्रत्यक्ष ना सही, व्हच्यरुअल सही असं म्हणत आयुष्यात नवीन लोकांना भेटणं सुरू झालं. त्यातून आवडणं-नावडणं सुरू झालं.
आणि आता त्यांच्या आयुष्यात धडक मारली आहे ती डेटिंग अॅप्सनी!
‘डेट करणं’ स्मार्टफोनच्या क्लिकवर आलंय. शहरी तरुण मुलामुलींच्या मोबाइलमध्ये आता सर्रास हे डेटिंग अॅप्स डाउनलोड होत कामाला लागले आहेत. ‘डेटिंग अॅप्स’ नावाच्या एका भलत्याच गोष्टीचा भारतीय तरुण जीवनात प्रवेश झाला आहे. उणीपुरी दीड-दोन वर्षे झाली हे डेटिंग अॅप्स भारतीय बाजारात येऊन! मात्र आता त्याचे बडे चर्चे आहेत. टिंडर हे जगभरात पॉप्युलर असणारं डेटिंग अॅप जेव्हा आपल्याकडे लॉन्च झालं तेव्हा असली ‘भेट’ भारतात चालणार नाही असं भाकीत दिग्गजांनी वर्तवलं होतं म्हणो. भारतासारख्या पारंपरिक चौकटींमधे राहणा:या समाजात, जिथे एकमेकांशी साधं बोलायलासुद्धा काहीएक ओळख वा संदर्भ असावा लागतो तिथं आयुष्यात एकमेकांना कधीही न भेटलेली, अगदी एकमेकांचं नावही माहीत नसणारी दोन माणसं एकमेकांना भेटूच शकत नाहीत, असं जाणकारांचं मत पडलं.
मात्र तमाम जाणकारांचे तमाम अंदाज मोडून काढत भारतीय तरुणाईनं डेटिंग अॅप्सचं भरभरून स्वागत केलं. कारण हे अॅप्स यायच्या आधी तरुण पिढी डेटिंग करत नव्हती असं नाही; फक्त या अॅप्सनी तरुण मुलामुलींचे ‘ऑप्शन्स’ वाढवले. आपण जे करतोय ते डेटिंग आहे आणि त्यात काही गैर नाही या भावनेचा स्वीकार मुलांना मनोमन आधी झाला आणि मगच डेटिंग अॅप्स आले. गंमत म्हणजे हे अॅप्स भारतात भरभरून वाढत असताना, त्यांच्या वेबसाइट्सकडे मात्र कंपन्या विशेष लक्ष देत नाहीयेत. याचाच अर्थ मेट्रो शहरात राहणारं भारतीय तारुण्य हेच आमचे टार्गेट आहे असं म्हणता म्हणता दहा रुपयाचा नेटपॅक मारून फेसबुकात तोंड घालून बसणा:या ग्रामीण नाही पण निदान निमशहरी तारुण्यावर तरी या कंपन्यांचा डोळा आहे.
इंटरनेटच्या महाजालात कुणी आवडतंय का हे शोधणं नवीन नाही. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किग साइटवरही डेटिंगचे प्रयत्न झाले; पण ते मर्यादितच राहिले, कारण एकतर फेसबुकवर आख्खं गाव असतं. काका, मामी, मावशी, शाळेतले दोस्त, ऑफिसचे सहकारी इथपासून आत्याच्या मैत्रिणीच्या जावेची भाचीपण आपल्या फ्रेंडलिस्टमधे असते. बरं तिचं आत्याच्या मैत्रिणीच्या जावेची भाची आवडली तरी तिला डेटवर येते का असं विचारणं म्हणजे आपल्याच पायावर कु:हाड मारण्यासारखं आहे. पण हीच भाची डेटिंग अॅपवर भेटली तर मग खुल्लमखुल्ला डेटची ऑफर देता येते, तिला पटलं तर ती हो म्हणणार, नाही तर नाही. त्यात रागलोभ मानण्याचंही इथे काही कारण नाही.
डेटिंग अॅप्स वापरणा:या तरुण मुलामुलींशी बोललं तर जे कळलं, त्यावरून लक्षात येईल की, आता या डेटिंग अॅप्सनेही अनेक तरुणांच्या मोबाइलसह आयुष्यात स्पेस निर्माण केली आहे.
मुंबईत राहणा:या वैभवच्या मते, ‘‘डेटिंग अॅप्स वापरताना तुम्ही तिथे काय करता त्याचे प्रत्येकाचे फंडे क्लीअर असतात. मी तुला माझा फक्त मित्रच समजत होते किंवा मी सोशल नेटवर्किगवर फक्त प्रोफेशनल रिलेशन्ससाठी आहे असला ड्रामा तिथं नाही. तुम्ही ते अॅप्स वापरता म्हणजे तिथं रजिस्टर असणा:या कुणालाही तुम्ही डेटसाठी विचारू शकता किंवा तुम्हालाही कुणी अप्रोच घेऊ शकतं. आवडलं तर हो म्हणा, नाही तर शोधत रहा. उगाच ताकाला जाऊन भांड लपवायचं काम इथं नाही.’’
वैभवसारखे दोस्त म्हणतात ते खरं असलं आणि तरुण मुलामुलींसाठी हे एक नवीन हॅपनिंग जग असलं तरीही या डेटिंगच्या जगात सगळंच आलबेल आहे असं नाही.
पुण्याचा सागर सांगतो, ‘‘खूप काही आणि एक्सपिरिअन्स नाहीये या ऑनलाइन डेटिंगचा, बोअर होतं कधी कधी! खूप वेळ जातो ह्या अॅप्सवर. तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसत असतात अॅण्ड यू कीप ऑन स्टॉकिंग पीपल. रिकामे आहात तर बघत बसा. आणि मग हे बघणं कुठंही सुरू होतं. रांगेत उभे आहात, करा स्वाईप. हॉस्पिटलमधे बोअर होत आहात पाठवा चॅट इन्व्हिटेशन्स. ही न थांबणारी प्रोसेस आहे. त्यातून कुणी चांगलं भेटतंच असंही नाही. तिथंही आपल्या नशिबावर सारं अवलंबून आहे. तरीही हे डेटिंग अॅप्स खूप टेम्पटिंग वाटतात. कारण तेच. खूप सारे ऑप्शन्स! ऑनलाइन शॉपिंगसारखं सतत तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स दिसत असतात आणि तुम्ही ब्राऊज करत राहता. ब:याचदा असं होतं की जी गोष्ट तुम्हाला आवडते ती परवडणारी नसते आणि जी परवडणारी असते ती आवडत नाही. सो, यू कीप ऑन ट्राईंग लक!
मात्र या नव्यानं तरुण मुलांच्या भाग झालेल्या डेटिंग अॅप्समुळे अनेक ‘ऑप्शन्स’ उपलब्ध झालेले असले तरी त्यामुळे तरुणाईची अवस्था ‘एक ना धड..’ अशी होऊ पाहते आहे. उद्या यापेक्षा चांगलं कुणीतरी भेटेल, त्यामुळे आत्ताच काही कमिट नको करायला, सध्या सारेच ऑप्शन्स ओपन ठेवू अशा मानसिकतेमुळे अॅप्स वापरणारे तरुणही कमिट करताना बिचकत आहेत. त्यामुळे ज्या सिरीयस रिलेशनशिप्सचं, स्वत:च्या चॉईस, मनमर्जी निर्णयाचं कारण पुढे करून या अॅप्सचं मार्केटिंग केलं जातंय त्याच्या मूळ उद्देशालाच सुरुंग लागल्याचं दिसतंय. बाकी राहता राहिला प्रश्न त्याच्या/तिच्या प्रेमाचा. खरं तर एखाद्याला पाच मिनिटांच्या भेटीतही जन्मजन्मांतरीची खूण पटते म्हणो. अन् बाकीचे ना डेटिंग अॅप्सवर सिरीयस असतात, ना मॅट्रिमोनी साइट्सवर!