कुणाही प्राणिप्रेमीला किंवा निसर्गाबद्दल आत्मीयता वाटणाऱ्याला किंवा कोणत्याही ‘माणसा’ला दुसºया प्राण्याचं दु:ख बघवत नाही. त्याचं दु:ख आणि कष्ट बघून त्यांना मदत न करणं किंवा करू न शकणं हे तर त्याहूनही वाईट.पण नुकतंच नॅशनल जिओग्राफीकच्या गटाला प्राण्यांना मदत करावी की न करावी आणि करावी तर कशी, असा एक यक्षप्रश्न पडला होता.
पॉल निकलन आणि क्रिस्टिना मीटरमायर हे दोघे गेली अनेक वर्षं आर्टिक सर्कल (म्हणजे उत्तर ध्रुवाच्या बर्फाच्छादित क्षेत्रात) मध्ये जीवशास्त्रज्ञ या नात्याने काम करत होते. काही वर्षांपूर्वीपासून त्यांनी त्यांच्या ‘सी लीगसी’ या संस्थेतर्फेउत्तर ध्रुवावरच्या पोलर बेअर्सबद्दल संशोधन सुरू केले. त्यांच्या संशोधनाचा मुख्य हेतू हा समुद्राचा अभ्यास करणं आणि मानवानं पृथ्वीवर केलेल्या बदलांमुळे, पृथ्वीवरच्या समुद्री जीवनावर कसा परिणाम झाला आहे, हे पाहणं. त्यांच्या संशोधनानिमित्त त्यांनी घेतलेली छायाचित्रं अनेक प्रख्यात मासिकांमधून सतत छापून येत असतात. त्यांच्या या संशोधनाबद्दलची माहिती तुम्ही ‘सी लीगसी’ नावाच्या वेबसाइटवर वाचू शकता.
तर त्यांच्या या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील एक्सपीडिशनमध्ये त्यांनी एक खूपच दु:खद घटना अनुभवली. एक अतिशय कुपोषित पोलर बेअर अर्थात ध्रुवीय अस्वल त्यांना अन्नाच्या शोधात फिरताना दिसला. बराच काळ त्यांनी त्याचं चित्रीकरणही केलं; पण काही दिवसांनंतर ॠतुमान बदलल्यामुळे त्यांना त्यांचे बस्तान हलवावे लागले. त्यामुळे तो जगाला की वाचला याबद्दल ठोस माहिती त्यांना मिळाली नाही. पण त्याचं कुपोषण लक्षात घेता, पुढच्या काहीच दिवसांत तो मरण पावला असणार, असं ते म्हणतात.
हा व्हिडीओ एडिट करून, ती मिनिट-दोन मिनिटांची फिल्म त्यांनी नॅशनल जिओग्राफीकच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली. काहीच दिवसांमध्ये या क्लिपला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वातावरण बदल, त्यामध्ये मानवाचा सहभाग आणि त्यामुळे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीवर होणारा दुष्परिणाम या विषयावर चर्चा पुन्हा सुरू झाली. पण, या दोघांनी या पोलर बेअरला काहीही मदत कशी केली नाही, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी अशा प्राण्याची आहाराची गरज आणि कसं काहीही केलं तरी काही दिवसांनी नैसर्गिकरीत्या अन्न न मिळाल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं - असं सांगितलं.
पॉल आणि क्रिस्टिनाच्या अभ्यासानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फवितळत चालला आहे. त्यामुळे तशा बर्फाच्छादित वातावरणात सापडणाऱ्या जीवसृष्टीवर संकट ओढवले आहे. पोलर बेअर्सला त्यांचे नैसर्गिक अन्न, म्हणजे विविध प्रकारचं सील्स हे मिळेनासे झाले, त्यामुळे त्यांना अन्नाच्या शोधात भटकत राहावं लागतं. अनेक पोलर बेअर्स माणसांनी बोटींवरून टाकलेल्या प्लॅस्टिकच्या कचºयाचेही बळी ठरतात. गेल्या काही वर्षांत, या वातावरणातील बदलांमुळे अनेक प्राण्यांबरोबरच या ही प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.
अनेक शास्त्रज्ञांच्या मते, आता माणसाने पृथ्वीची, तिच्या जंगलांची, बर्फाची, समुद्राची कधीही भरून न येणारी अशी हानी केलेली आहे. त्यामुळे आता आपल्या हातात केवळ आत्ता जसं आहे तसं ते टिकवणं एवढंच उरलं आहे. आजही अनेक लोक वातावरणातील बदल हे ‘नैसर्गिक’ आहेत असंच म्हणतात. पण, सध्या आपण अनुभवत असलेला विचित्र पाऊस, वादळ, दुष्काळ याला बºयाचअंशी कारणीभूत आपणच आहोत, हेही अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नॅशनल जिओग्राफीक, नेचर, इकोलॉजिस्ट सारखी मासिके आणि पॉल आणि क्रिस्टिना सारखे असंख्य शास्त्रज्ञ हा विषय सतत लावून धरत असतात. स्टीफन हॉकिंग सारख्या शास्त्रज्ञाच्या मते, हे सर्व प्रयत्नही फोल आहेत. मानवजातीला जर अजून १०० वर्ष जिवंत राहायचंय असेल तर त्याला इतर ग्रहांवर वस्तीच उभारावी लागेल!
तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला हे सर्व सांगून घाबरवते आहे, तर हो! कारण हे सगळं घाबरण्यासारखंच आहे. हो, हा व्हिडिओ बघण्याच्या आधी हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला हे सर्व सांगण्याचा उद्देश दु:खाची जाहिरात करणं आणि तुम्हाला घाबरवून सोडणं हा नक्कीच नाही. पुढे जाऊन आपणच या पृथ्वीबद्दलचे निर्णय घेणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्वांनाच या विषयाबद्दल जागरूक आणि सतर्क असलेच पाहिजे. आपल्या प्रत्यक्ष पावलाचा विचार आपल्या एकमेव घराला, म्हणजे पृथ्वीला ध्यानात ठेऊनच करायला हवा.त्यामुळे ही गोष्ट काही त्या केवळ एका पोलर बेअरची नाहीये. ही गोष्ट आहे आपल्या पृथ्वीची, माणसाने तिच्यावर केलेल्या कधीही भरून न येणाऱ्या आघातांची.याआधी आपल्या झालेल्या चुकांमधून आपण शिकायला हवे. आणि त्यासाठी आज आपण या विषयाकडे जागरूकतेने पाहायला सुरुवात करायला हवी.
वाचा : ‘सी लीगसी’च्या आर्टिकलमधील संशोधनाबद्दल https://www.sealegacy.org/पाहा : त्या कुपोषित पोलर बेअरचा व्हिडीओ. आणि त्याबद्दल याच लिंकवर वाचा.https://news.nationalgeographic.com/2017/12/polar-bear-starving-arctic-sea-ice-melt-climate-change-spd/