- श्रुती साठे
दरवर्षी न्यू इअर पार्टीसाठी तरुण मुलामुलींचा थवा एका पार्टीमधून दुसर्या पार्टीसाठी जाताना आपल्याला दिसतोच दिसतो. मुली चक्क महिनाभर आधीपासून पार्टीसाठीच्या तयारीला लागतात. त्यात जर पार्टी तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही होस्ट असाल तर मग काय तयारीला अंतच नसतो. अशावेळी 2-3 ठिकाणी जायचं असल्यास तोच तोच एखादा ड्रेस नको वाटतो. हाय हिल्स घालायची हुक्की येतेच; पण मग पूर्णवेळ तेही नको वाटतात. पाय अगदी अवघडून जातात, मनाजोगं नाचता येत नाही. बरं हा प्रॉब्लेम फक्त आपलाच होतो असं नाहीये बरं का! खुद्द दीपिका पदुकोणसुद्धा याला अपवाद नाहीये. दीपिका आणि रणवीरचं लग्न, रिसेप्शन यांची जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर तर त्यांच्या फोटोज आणि व्हिडीओज्चा पूर आला. त्यांचे कपडे अर्थातच खूप विचार करून निवडलेले होते- त्यामुळेच दीपिकाने केली अशी आयडिया आपल्या सगळ्यांनाच न्यू इअर पार्टीसाठी उपयोगी ठरणार आहे.दीपिका-रणवीरच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शनमधला तिचा लाल रंगाचा ड्रेस अतिशय मोहक होता. झुहैर मुराद या सेलिब्रिटी डिझायनरची निर्मिती असलेला दीपिकाचा ड्रेस कुठल्याही मुलीसाठी ड्रीम ड्रेस नक्कीच असेल. या ड्रेसची खासियत म्हणजे त्याची डिटॅचेबल ट्रेन अर्थातच काढता येणारा घेर. दीपिका रिसेप्शनच्या सुरुवातीला या पायघोळ ड्रेसमध्ये सुरेख दिसली, या सोबत तिने मॅचिंग लाल रंगाच्या स्टिलेटोज म्हणजेच हाय हिल्सचा वापर केला. रिसेप्शननंतर डान्स फ्लोअरवर जाताना मात्न तिनं तोच डिटॅचेबल घेर काढून त्याचा शॉर्ट ड्रेस केला आणि चक्क पांढर्या रंगाचे स्नीकर्स घातले. ही डिटॅचेबल ड्रेसची कल्पना पार्टीसाठी नक्की वापरता येण्यासारखी आहे. एकाच ड्रेसमध्ये 2 वेगळे लूक्स तयार करा. आणि हो, डान्स फ्लोअरवर मनमोकळेपणानं नाचायचं असल्यास हिल्सला पर्याय म्हणून तुमच्या बरोबर फ्लॅट्स, सॅण्डल्स किंवा स्नीकर्स शूजची जोडी नक्की असूद्यात.डिटॅचेबल ड्रेस असं सर्च करा, भरपूर माहिती मिळेल. ते शिवूनही घेता येतात. त्यामुळे हवी तशी स्टाइल आपली आपण करूच शकतो.