-चिन्मय लेलेबायकांचं क्रिकेट म्हणजे भातुकली असं समजणारे आजही या देशात काही कमी नाहीत. (खरं तर बहुसंख्यांना अजूनही तसंच वाटतं की, क्रिकेट हा मुलींचा खेळच नाही; पण तसं उघड म्हणत नाही इतकंच !) मात्र या ‘सभ्य माणसांच्या खेळावर’ मुलींनी आपला हक्क सांगायला सुरुवात केली आहे..आज महिला क्रिकेटला पुुरुषांच्या क्रिकेटइतकं ग्लॅमर नसलं तरी ते महिला क्रिकेटही एका बदलत्या मानसिकतेची गोष्ट सांगतं आहे...ती गोष्ट नुस्ती क्रिकेटची नाही तर बदलत्या भारतीय समाजाचीही आहे..त्याचं उदाहरण म्हणजे दीप्ती शर्मा. नाव वाचल्यावर वाटूही शकतं की, कोण ही मुलगी?तर ही मुलगी आग्य्राची. १९ वर्षांची साधीसुधी. लाजरीबुजरी. अबोलही. हसरीशी. या मुलीत आग आहे असं पाहताक्षणी कुणाला वाटणारही नाही. पण मैदानात उतरू द्या, ही साधीशी मुलगी एकदम ‘आॅल राउण्डर’ खेळाडूचा आत्मविश्वास घेऊन खेळात प्राण फुंकते. नुकताच तिला विस्डेन क्रिकेटर आॅफ द इअरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विस्डेनच्या कव्हरवर ती (एल.के. राहुल) पुरुष खेळाडूसह झळकणार आहे. दीप्ती भारतीय महिला संघातली अष्टपैलू खेळाडू. डावखुरी फलंदाज आणि उजव्या हातानं स्पिन करणारी फिरकीपटू.भारतीय क्रिकेटमध्ये हाच एक परिवर्तनाचा पहिला टप्पा आहे, जो पुरुष खेळाडूसह विस्डेनच्या कव्हरवर महिला खेळाडूला स्थान देतो आहे.पण दीप्तीची गोष्ट या पुरस्काराच्या मोठेपणाची नाही. त्याहून वेगळी, मोठी आणि सकारात्मक आहे. आपल्या समाजात मुलीनं त्याग करणं, आपली स्वप्नं कुटुंबासाठी नाकारणं वगैरे ‘ताईच्या बांगड्या’ टाइप्स कथांची काही कमतरता नाही. त्याचं मोठं उदात्तीकरणही केलं जातं. मात्र दीप्तीचं घर त्याला अपवाद आहे.आपली बहीण उत्तम क्रिकेट खेळते, तिच्यात आपल्यापेक्षा जास्त चांगलं क्रिकेट आहे हे लक्षात येताच भावानं बहिणीच्या क्रिकेटसाठी तिच्या पाठीशी उभं रहायचं ठरवलं. एकेकाळी सचिनच्या पाठीशी अजित तेंडुलकर उभा राहिला होता तसंच. मुख्य म्हणजे अलीकडेच ट्विट करून सचिनने दीप्ती आणि तिच्या भावाचं कौतुकही केलंय.तर दीप्तीचा भाऊ, सुमित शर्मा. दीप्ती त्याला बाला भय्या म्हणते. त्यानं एमबीए केलंय. तोही क्रिकेट खेळायचा. सी.के. नायडू स्पर्धेत खेळलाय. आग्य्रात एकलव्य स्पोर्ट स्टेडिअमवर प्रॅक्टिसला जायचा. दीप्ती सात वर्षांची होती. मलाही तुझ्याबरोबर यायचं असा हट्ट तिनं केला. म्हणून तो तिला घेऊन गेला. मुलं खेळत होती, दीप्ती एका बाजूला बसली होती. बॅट्समनने मारलेला एक चेंडू तिच्याजवळ आला. तिनं उठून उभं राहत तो उचलला आणि विकेटकीपरच्या दिशेनं फेकला, डायरेक्ट थ्रो. दांड्या उडाल्याच. मुलं तर पाहतच राहिली; पण तिथं त्यावेळी महिला निवड समितीच्या अध्यक्ष हेमलता कला होत्या. त्यांनी दीप्तीला पाहिलं आणि सुमितला सांगितलं की, या मुलीत टॅलण्ट आहे, हिला क्रिकेट खेळायला आण.तो दिवस ते आज सुमित दीप्तीच्या क्रिकेटसाठी जिवाचं रान करतोय. बहिणीला साऱ्या सुविधा मिळाव्यात म्हणून राबतोय. आईवडिलांना त्यानंच समजावलं की, जे मला जमणार नाही, ते दीप्तीला जमेल, तिला क्रिकेट खेळू द्या.दीप्ती सांगते, ‘बाला भय्या बोले, तू खेल, बाकी मैं संभाल लुंगा. और उन्होने संभाला भी!’दीप्ती भारतीय संघापर्यंत पोहचली. तिनं नाव कमावलं. रेल्वेची नोकरीची आॅफरही आहे. पण भावानंच सांगितलं, तू क्रिकेट खेळ, प्रॅक्टिस कर. नोकरीच्या मागे लागू नकोस. घर मी सांभाळीन.दीप्ती सांगते, ‘नौकरी तो जिंदगीभर करनी ही है, अब क्रिकेट खेल लूं. भय्या है, तो मैं हूं’ती खेळतेय. सुरेश रैना तिचा फेवरिट. त्याच्यासारखं खेळायचा प्रयत्न करतेय. अरिजित सिंगची गाणी ऐकत ‘फोकस’ करतेय. तिला विचारा, तुझं स्वप्न काय, ती एका वाक्यात सांगते, ‘बहौत साल इंडिया के लिए खेलना है..’एका मुलीनं भारतासाठी खेळायचं स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नापाठी भावानं उभं राहणं, ही खरी बदलत्या भारताची, बदलत्या महिला क्रिकेटची गोष्ट आहे..- जे या खेळाला भातुकली म्हणतात, त्यांना कळलंच नाही मग क्रिकेट..
दीप्ती आणि सुमित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 1:38 PM