- प्रतीक सावंत
वयाच्या फक्त 21व्या वर्षी माझं ‘एक मौका’ हे गाणं रिलिज झालंय.इतरांचा कशाला माझाही अनेकदा यावर विश्वास बसत नाही. मागे वळून बघताना मला माझाच प्रवास अजब वाटतो.प्रतीक हेमंत सावंत. हे नाव एरव्ही कुणाला माहिती नव्हतं; पण आज या नावाला कुठेतरी धारावीच्या बाहेर ओळखलं मिळतंय, याचं समाधानही तितकचं आहे. मी वाढलो, याच मातीत. धारावीच्या कोळीवाडय़ातला जन्म, आई-बाबा आणि लहान भाऊ असं चौकोनी कुटुंब. लहानपणापासूनच जाम मस्तीखोर होतो. खूप मित्र. धम्माल करायचो. लहानपणापासून आई-बाबांनी काही कमी पडू दिलं नाही, म्हणजे परिस्थिती फार चांगली नव्हती; पण त्याची धग बालपणाला बोचणार नाही याची काळजी कायमच आई-बाबा घ्यायचे. बाबांच्याच हट्टामुळे माझं कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण सुरू झालं. वांद्रय़ाच्या सेंट अॅन्समध्ये शालेय शिक्षण झालं. तोर्पयत आयुष्य ‘रुटीन’ होतं, आला दिवस पुढे ढकलत जगत होतो.वांद्रय़ाच्याच चेतना कॉलेजमध्ये कॉमर्सला अॅडमिशन घेतलं, शिक्षण छान सुरू होतं. या सगळ्यात काहीसा संगतीचा बरावाईट परिणामही झाला होता. त्यामुळे तेव्हा मी फारसा ‘गुडबॉय’ नव्हतो. या सगळ्या ‘रुटीन’ आयुष्याला 2012 मध्ये मोठा धक्का बसला, माझी आई अचाकन आम्हाला सोडून गेली..
(फोटो - दत्ता खेडेकर )
त्यानंतर आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. खाड्कन हलवून कुणीतरी जागं केलंय की काय असं वाटून गेलं. त्यावेळी, पहिल्यांदा ही जाणीव झाली की, आता आयुष्य ‘सिरिअस्ली’ घेण्याशिवाय पर्याय नाहीय. पण त्यावेळी मनर्स्थिती साथ देत नव्हती, आईचं नसणं आजही स्वीकारू शकत नाही. तिची सोबत, तिचं बोलणं, तिचं ओरडणं असं सगळं सगळंच माझ्या आजही सोबत आहे. पण आता खर्या अर्थाने ‘उभं’ राहण्याची वेळ आलीय, हे जाणवलं. तो काळ अत्यंत चॅलेंजिंग होता. त्या काळातलं नेमक वाटणं आजही कुणासमोर मांडू शकत नाही. खूप नैराश्यात होतो. पुढची वाट दाखविण्यासाठी कुणीही नव्हतं. बाबा आम्हाला खूप धीर द्यायचा प्रयत्न करायचे. पण मी आतून तुटत होतो.बाबा कलानगर येथे एका खासगी कार्यालयात डॉक्युमेंटेशनचं काम करतात. आमची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. त्यामुळे बारावीनंतर चेतना कॉलेज सोडून सायनच्या गुरुनानक कॉलेजमध्ये बीएमएम शिकायला गेलो, तिथे शिकताना छोटी छोटी कामंही करू लागलो. त्यावेळी मला गाणी ऐकण्याची खूप आवड होती, मात्र मनर्स्थिती बरी नसायची. मग 2016 साली हळुहळु लिहायची सवय लागली, कविता लिहू लागलो. अगदी मराठी, इंग्रजी आणि हिंदी सगळ्याच भाषेत व्यक्त होऊ लागलो. परदेशातील रॅप संगीत ऐकत असल्यामुळे रॅप लिहायला लागलो, ते मित्रांना वाचून दाखवायचो. ‘एमिनम’ या रॅपरच ‘नॉट अफ्रेड’ हे गाणं मला कायम खूप इन्स्पिरेशन द्यायचं. आजही ते सतत ऐकतो. मग रॅपविषयी इंटरनेटवर अधिक सर्चिग केलं आणि त्याविषयी अधिक जाणून घेतलं आणि ही आवड लागली. तेव्हापासून सतत रॅप लिहायला सुरुवात केली, आणि लिहिताना जाणवलं की आयुष्यात अनुभवलेलंच उतरतंय शब्दात. त्यातून एक मेसेज द्यावा हा माझा आग्रह असायचा, आणि ते जमायचं. कारण आईपासून दुरावलो गेल्यामुळे मनात खूप साचलेलं होतं.बाबांना रॅप समजायचं नाही. त्यामुळे ते म्हणत, ही अशी बडबड काय करत बसतोस. त्यापेक्षा काहीतरी गाणं तरी नीट शिक. त्यांना रॅप समजायला वेळ लागेल, हे मी स्वीकारलं होतं. त्यांच्याशी या विषयावर बोलत मात्र होतो. माझा भाऊ वैभव, तो माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे, तो कायम रॅप ऐकून घ्यायचा, प्रोत्साहन द्यायचा. मग मी कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, असंच एकदा एसएनडीटी कॉलेजमध्ये कार्यक्रमात सहभागी झालेलो असताना ‘धारावी प्रोजेक्ट’चे विद्यार्थीही त्यात सहभागी झाले होते. माझ्या परफॉर्मन्सनंतर त्यांनी खूप कौतुक केलं. धारावीत ‘आफ्टर स्कूल ऑफ हिप-हॉप’मध्ये तू ये असं त्यांनी मला सुचवलं. मग त्याच दिवशी संध्याकाळी मी धारावीत आलो, आणि इथे माझ्या ‘रॅप’च्या आवडीला दिशा मिळाली.धारावीतल्या वंचित मुला-मुलींना एकत्र करून आफ्टर स्कूल ऑफ हिप-हॉपमध्ये वेगवेगळ्या कला शिकवल्या जातात. आठवडाभर दीड तास असणार्या या शिकवणीत. धारावी प्रोजेक्टमध्ये धारावीतील अनेक मुलं-मुली आवजरून येतात. त्यामुळे भरकटणार्या धारावीतल्या बालपणाला दिशा मिळाल्याचं समाधान मिळतं. सकाळी शाळा, कॉलेज, अगदी ऑफिसला जाऊनही धारावीतली तरुण पोर-पोरी येथे गोळा होतात, आणि इथल्या कला आत्मसात करतात. विशेष म्हणजे हा प्रोजेक्ट प्रसिद्ध संगीतकार-गायक ए.आर. रहमान यांची संकल्पना. अन्य काही एक्स्पर्टसोबत हा उपक्रम राबविला जातो. युनिव्हर्सल म्युझिक इंडियानेही या उपक्रमाला पाठबळ दिलं आहे. 2014 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आतार्पयत 75हून अधिक तरुण मुला-मुली रॅप, बिट-बॉक्सिंग, हिप-हॉप, स्ट्रीट ग्राफिटी, बि-बॉयिंग शिकले आहेत एम.सी. हीम हे इंटरनॅशनल लेव्हलचे आर्टिस्ट, ते गेले आठ महिने मला शिकवत आहेत. शिवाय सध्या मी एका फायनान्स फर्ममध्ये नोकरी करतोय. थोडी धावपळ होते; पण तारेवरची कसरत करून दोन्ही सांभाळावं लागतं.खरं सांगतो, भविष्यात मोठा ‘रॅपर’ व्हायचं स्वप्न नाही. माझी कुणाशीही स्पर्धाही नाही.पण एकच वाटतं मी लिहिलेल्या रॅपमधून तरुणांचं मन व्यक्त व्हावं, त्यांना काहीतरी मेसेज मिळावा. संगीतात खूप ताकद आहे. त्या म्युझिकनं कुणाचं तरी आयुष्य बदलून जावं, एवढीच माझी इच्छा आहे.माझ्या रॅपला ती ताकद मिळावी, याहून जास्त काय हवं !
***
नाकं मुरडू नका.
‘‘आपल्याकडे नुसतं धारावी म्हटलं की नाक मुरडणारी अनेक माणसं भेटतात. मात्र या धारावीतही ‘सोनं’ लपलेलं आहे , हे तर समजून घ्या! इथंही गुणी आहेत तरुण मुलं. धारावी केवळ झोपडपट्टी म्हणून जग ओळखतं, हेच मला पटत नाही. त्याहून मोठी आहे इथं जगण्याची जिद्द आणि गुणांची खाण!’’
..पोरी म्हणजे रॅप नव्हे!
‘‘आपल्याकडे असलेलं रॅप कल्चर वेगळं आहे. केवळ मूव्हीमधल्या ज्या शब्दांवर ताल धरला जातो ते म्हणजे रॅप नव्हे. जगभरात रॅप संस्कृतीच्या माध्यमातून समस्या, प्रश्न मांडले जातात. त्यासाठीचं व्यासपीठ म्हणजे रॅप संगीत आहे. आपल्याकडे बॉलिवूडमध्ये दिसणारं ग्लॅमर, झगमगाट म्हणजे रॅप हीच व्याख्या बनते आहे. त्यापलीकडे खूप मोठी आहे ही कला. आता सोशल मीडिया खूप विस्तारलाय, त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, त्यातून रॅपही सर्वदूर पोहचेल !’
मुलाखत आणि शब्दांकन - स्नेहा मोरे