धर्माबाद. महाराष्ट्राच्या सीमेवरचं एक तालुक्याचं ठिकाण. नांदेड जिल्ह्यातलं. हे स्टेशन सोडलं की आपण थेट पोहचतो तेलंगणात. तिथला मी. तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे शाळा दहावीपर्यंत. तसं हायस्कूल-कॉलेज पण आहे. पण मी गावात बारावीपर्यंतच शिकलो. वाढलो. आम्ही चार भावंडं. सगळ्यात मोठी बहीण. तिनं मोठ्या कष्टानं एम.एस्सी. गावातच पूर्ण केलं. मग इथेच इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत, खासगी शिकवणीचे क्लास घेत तिनं तिचं करिअर घडवलं. ती आता प्राध्यापकआहे.
दुसरा मी. लहानपणापासूनच सिन्सिअर असल्यानं ‘त्याला बाहेर शिकायला पाठवा’ असं सगळ्यांनी आईवडिलांना सुचवलं. आईबाबा दहावीच शिकलेले. पण त्यांना मोठी हौस होती आम्हाला उत्तम शिक्षण देण्याची..
इंजिनिअरिंग करावं असं वाटत होतं. पण काही आर्थिक अडचणीमुळे राहून गेलं. मग बीसीएसाठी नांदेडला प्रवेश मिळवला आणि २००८ मध्ये पहिल्यांदा घर सोडलं. मग काय रूम पाहा, सोबत कोण असेल, कसे असतील मुलं याचं टेन्शन.
आता आपण घर सोडून आलोय या नव्या शहरात. इथे कोणी नाही आपलं. घर सोडून एकटं राहायचं. रोज बाहेरचं खायचं. प्रश्नांनी डोक्यात कल्लोळ माजला होता. झालं पण सगळं ठीक हळूहळू. रूम मिळाली. सामान टाकलं. मी आणि बाबा बाहेर जेवलो अन् ते निघाले. मला तर रडू आलं. पण तिथूनच सुरू झाला माझ्या शहरी जीवनाचा प्रवास.
नांदेड तसं जिल्ह्याचं ठिकाण. पण मोठ्या शहरांसारखं तेवढं हायफाय नव्हतं. पण माझ्या गावापेक्षा तर दहापटीने मोठं.
बीसीएच्या तीन वर्षांत बरेच मित्र मिळाले. नवनवीन शिकायला मिळालं. ज्ञानाबरोबर इथलं जीवनमान व दुनियादारी समजली. या तीन वर्षांत जेव्हा जेव्हा घरी गेलो तेव्हा तेव्हा जाणवायचं आपला गाव, इथली माणसं खूप मागे आहेत. कसंतरी वाटायचं. पण एक गोष्ट खूप आनंद द्यायची- ती म्हणजे ‘जेवण’. घरी गेल्यावर आधी जेवायचो. बाहेरचं ते विचित्र खाऊन पोटाची तर वाटच लागायची. पण विशेष म्हणजे घरच्या माणसांना भेटलेला आनंद जेवताना अजून जास्त व्हायचा.
बाहेर राहिल्यावर आपल्याला घरी पण मान मिळतो. लाड होतात. कौतुक होतं. जाताना चिवडा, लाडू भरून मिळायचे. घरी असताना कोणी रागवायचं नाही. उठ कधीपण, झोप कितीपण, जे मनात येईल ते खा. हे सर्व मिळायचं.
२०११ मध्ये मी बीसीए पास होऊन पदवीधर झालो. आता चिंता एमसीएची आणि नोकरी मिळवण्याची. परिस्थिती तेवढी ठीक नसल्यामुळे मी लगेच नोकरी करण्याचं ठरवलं. पण उच्च शिक्षण बाजूला राहील म्हणून शैक्षणिक कर्ज काढून एमसीए करण्याचंही ठरवलं. प्रवेश परीक्षामधून अहमदनगर इथे प्रवेश मिळाला. आता तर नांदेड पण सोडलं आणि नगरला आलो. घर सोडल्यानंतर पहिल्यांदा वाटलं तसं वाटायचं पण आता तेवढी तीव्रता नसायची. सवय झाली होती सगळ्या गोष्टींची अन् सुधार पण झाला होताच ना माझ्यात..
एमसीएला एकदम फ्री वातावरण. मुलं-मुली एकमेकांशी सहज बोलायचे जे आम्ही नांदेडला पाहिलं नव्हतं. मग काय ग्रुप्स बनत गेले. हॉस्टेलमध्ये पण ग्रुप्स. कॉलेज ग्रुप्स, पार्टी, ट्रिप्स, कॅण्टीन कट्टा हे सर्व या तीन वर्षांत एन्जॉय केलं. फक्त घरी जाणं फार कमी झालं. एकतर दूर आलो होतो मी. शिक्षण, जॉब आणि कर्ज याची चिंता पण होती मनात.
दिवसामागून दिवस जात होते. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकत गेलो. खूप प्रकारची माणसं मिळाली.. चांगली-वाईट.
..पण खरं सांगू प्रत्येकाने मला नवा अनुभव दिला. काहीतरी नक्कीच शिकवलं.
मी आधीपासूनच शिस्त पाळणारा. पण आता कपडे धुणं, प्रेस करणं, रूम नीट ठेवणं हे सर्व शिकलो होतो. आधी तर फक्त चहा करता यायचा. पण आता पोहे, भात पण करायला जमलं
झालं शेवटी एमसीए. एकदम चांगला अभ्यास केल्यामुळे डाटाबेस जो की मला फार आवडायचा त्यावर जॉब मिळाला. पगार जास्त नव्हता पण नोकरी लागली पास होण्याआधी याचा फार आनंद वाटायचा.
आधी ओढा, नंतर तलाव, नदी व आता तर थेट महासागरात आलो होतो म्हणजेच पुण्यात. आता मी एकदम धीट झालेला होतो. सगळ्याच गोष्टीतून गेलेलो असल्यामुळे नवीन पर्वासाठी तयार होतो मी. पण खरी दुनियादारी शिकलो अन् शिकतोय ते मी इथूनच. चांगल्यापेक्षा वाईट अनुभव इथे जास्त आले. पण या सर्व अनुभवातून मी विकसित होत गेलो. आता तर मी कंपनी पण स्वीच करतोय..
हे सर्व जमलं ते फक्त घरातून बाहेर पडल्यामुळेच..!!
बराच एक्सपोझर असतो शहरात. मग आपण आपल्या स्वत:च्या मनाला विचारून ठरवायचं, बिघडायचं की सुधारायचं ते.
मी सुधारलो. आता घराला पूर्ण बदलायचं ठरवलं. छोट्या बहिणीला पण मला इथे पुण्यात शिकायला घेऊन यायचं आहे. माझे अनुभव तिला मदत करतीलच. खरंच, लाइफ टीचेस यू एव्हरीथिंग..
- रेणुकादास मुक्कावार
मु. पो. धर्माबाद, जि. नांदेड