सागर गाडगे
१५-१६ वर्षाचं वय आणि कॉलेजचा पहिला दिवस, समोर दिसणारे सर्व नविन चेहरे. पहिल्या दिवशी जाणवणारा एकटेपणा नंतर कधी जाणवलाच नाही. हळूहळू काही जण एकमेकांच्या जवळ येऊ लागले. क्लासमधे कमी आणि कॅन्टीन मधे जास्त वेळ जाऊ लागला. कधी क्रि केट कधी राजकारण तर कधी क्लास मधल्या मुली यासारख्या विषयावर गप्पा रंगू लागल्या. टाळीसाठी एकमेकांचे हात पुढे येऊ लागले. हळूहळू ग्रुपमधे मुलीसुद्धा दाखल झाल्या असे किती तरी रंगाचे तुकडे मिळून एक ग्रुप तयार झाला......लवकरच सर्वजण एकमेकान सोबत अॅडजस्ट झाले. मुलगा मुलगी असा भेदच नाही राहिला. मैत्री आकार घेऊ लागली. कॉलर मागे फेकून बाह्या वर चढवून मित्रांसोबत राहताना धमकही आली आणि धाडसही वाढलं. जसे जसे दिवस सरत गेले तशी तशी सर्वांची व्यक्तिमत्व अधिक फुलत गेली. इतर नात्यापेक्षा हे नातं जरा जवळच वाटू लागलं. प्रत्येकाची वेगळी एक अशी हक्काची जागा निर्माण झाली. कधी गंभीर तर कधी पोटदुखेपर्यंत हसवणाऱ्या गोष्टीत तासंतास कसा निघून जायचा पत्ताच लागायचा नाही.परीक्षा जवळ आली की अभ्यासाच्या प्लॅनिंगपेक्षा परिक्षा संपल्यावर फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग आधी होऊ लागलं. मित्रांसोबत रात्र रात्र जागून पूर्ण केलेल्या असाइनमेण्ट असो किंवा परीक्षेच्या आधी मैत्रिणीने केलेली मदत असो हे सारं लाख मोलाचं ठरू लागलं. एकमेकांवर असणारा अपार विश्वास, कितीही काहीही झालं तरी आपला मित्र आपल्याला धोका देणार नाही हा विश्वास यासाऱ्यानं दोस्ती जास्त घट्ट होत गेली.वाढिदवसाच्या पार्टीत बेधुंद्द होऊन नाचलो सुद्धा, आणि मित्रांच्या दु:खात सहभागी होऊन रडलो सुद्धा. कधी वादही घातले तर कधी दोघात झालेली भांडणं सोडवली सुद्धा. सुखही सोबतच पाहिलं आणि दु:खंही सोबतच भोगलं आम्ही. ती मजा काही वेगळीच होती. जणू जग आपल्या मुठीत आहे. पण नुसता आनंदच नव्हता त्या दिवसात. कष्टही होते, एन्जॉयमेण्टसह अभ्यासाची मेहनतही होतीच. याच काळात प्रत्येक गोष्टीचे अनुभव सुद्धा यायला लागले. चांगल्या वाईट लोकांपासून बरंच काही शिकायला मिळालं. कोणी विचार केला होताकी, याच वयात मिळणाऱ्या अनुभवांवर आपण आपल्या उद्याच्या आयुष्याची पहिली पायरी रचू.पण आता सारं चित्रंच. पालटलय. कॉलेजचे ते दिवस संपलेत आता. करिअर आणि फ्युचरच्या नादात सर्वजण नकळत एकमेकांपासून दुरावले. सर्व पाखरं आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आपआपल्या रस्त्यानं निघून गेली. त्यांच्या आठवणी मात्र मनात कायम राहिल्या. मात्र कधी कधी आठवणीचा आधार पुरेसा नसतो. आता तर स्वच्छ हसता सुद्धा येत नाही. एकटेपणा दिसतो एकमेकांच्या डोळ्यात. असं वाटतं जिथून सुरवात केली त्यापेक्षा पण मागे आलोय. कॉलेज संपल्यावर आम्ही सर्वच जण काही ना काही तरी हरलो होतो. आयुष्याच्या बिझी शेड्यूलमधे जीवभावाचे मित्र हरवलेत कुठे तरी. कॉलेज सुटल्यावर संध्याकाळच्या त्या मंद प्रकाशातल्या सावल्या आजही डोळ्यात तशाच आहेत. खरं तर आज कळतंय्, त्या दिवसांची खरी किंमत, काय कमावलं आणि काय गमावलं?आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं, खरं तर भरपूर काही दिलं या नात्यांनी, आयुष्यभर पुरेल एवढा आनंद दिला, नविन रंग भरले आयुष्यात. कायम मनाजवळ राहतील अशी माणसं दिली. कॉलेज म्हणजे एक दुसरी दुनियाच होती आमच्यासाठी. आयुष्यातले सोनेरी दिवस होते ते. ज्याच्या प्रकाशावर मी आजही जगतोय. पण आता ते दिवस संपलेत. राहिल्या त्या फक्त आठवणी आणि जबादाऱ्या..