- मन की बात
सगळंच, कधीकधी चुकतं जातं.
काय होतंय नक्की कळत नाही,
आपलंच आपल्याला कोडं उलगडत नाही.
मनाच्या तळघरात काहीतरी
खुपत असतं.
आतल्या आत सलणा:या काटय़ासारखं
सारखं सलत असतं.
हातात घेऊन उकरावा तो काटा
तर अजून आत काहीतरी रुततं.
आत आत फसतं.
नेमकं फसतंय काय, रुततंय काय
आणि सलतंय काय, हेच कळत नाही.
मन तेवढं उदास उदास.
काय होतंय नक्की कळत नाही.
**
असं होतं अनेकदा.
आपलं कोडं आपल्यालाच उलगडत नाही,
आपण नसतो कुणावर उदास,
रागही नसतो आलेला कुणाचा,
ना कुणावर कसला संशय,
ना कसला हेवा,
ना दुस्वास.
आपलं भांडणही नसतं आपल्याशी.
पण करमत नाही जणू आपल्याला,
आपल्यासोबतच.
आणि मग आपलं असं एकेकटं असणं,
आपलं आपल्यालाच छळतं.
इतकं सलतं की
नको वाटावी आपलीच सोबत.
***
अशावेळी कुणाशी नि काय बोलणार?
जे आपल्यालाच कळलं नाही,
ते इतरांना कसं सांगणार?
म्हणून मग डोळे बंद करून बसावं गप्प.
सांगावं स्वत:लाच,
स्वत:च्या मनालाच.
की असं अशक्त होऊन,
हिरमुसून, रुसून बसून
कसं कोडं सुटेल!
एकदा मोकळा वारा पिऊन येऊ,
चार पावलं भटकून येऊन.
आणि हसून घेऊ पोटभर.
***
उदासीचे आपले ‘डोर’ आपणच
कापून टाकावेत आपल्यासाठी.
आणि मग कदाचित,
आपली उत्तरं आपल्याला गवसतील
आणि करमेल स्वत:लाच स्वत:सोबत.
स्वत:साठी!
**
( टॅलिन नावाच्या एका ब्राङिालियन तरुण मुलीच्या मनातली ही घालमेल. तिच्या ब्लॉगवरून, तिच्या सौजन्यानं, संपादित अनुवादासह)