- हिनाकौसर खान-पिंजार उपवर लेक असेलतर शेतकरी असलेले वडीलशहरातलं नोकरदार स्थळ पाहतात.आणि त्याच घरातल्या तरुण शेती करणाऱ्यामुलाला मात्र कुणी मुलगी देत नाही.गावोगावी अनेक घरांतलं हे चित्र आहे.म्हणून मग लग्न जमेपर्यंत तरीनोकरी द्या अशी गयावया संस्थांकडेअनेक मुलं आणि त्यांचे शेतकरी वडील करताना दिसतात.मध्यस्थ चांगली मुलगी दाखवण्याचे पैसे मागतात.आणि मुली मात्र म्हणतात,नकोच तो शेतकरी नवरा!रोहिदास धुमाळ. एक शेतकरी कार्यकर्ता. गेल्या महिन्यात झालेल्या शेतकरी संपाच्या काळात रोहिदास अनेक तरुण शेतकऱ्यांना भेटत होता. त्यांच्याशी बोलत होता. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की शेतीच्या सध्या चर्चेत असलेल्या गंभीर प्रश्नासह अन्यही काही गंभीर प्रश्नं आहेत. आणि त्यातलीच एक मोठी समस्या म्हणजे तरुण शेतकऱ्यांची लग्नं. आणि लवकर न जुळणाऱ्या या लग्नांची कारणंही शेतीभोवतीच फिरत आहेत. ही गोष्ट रोहिदासने शिक्षण प्रश्नाचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांना सांगितली. आणि त्यांनी ठरवलं की या समस्येचा शिस्तशीर अभ्यास करून तिचं स्वरूप नेमकं काय हे समजून घेऊ. हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर गावातील ४५ गावांची निवड या अभ्यासासाठी केली.
रोहिदास सांगतात, ‘जिरायती आणि बागायती शेती आहे अशा दोन्ही प्रकारच्या गावांत फिरलो. बागायती गावात शेतपाण्याचा प्रश्न इतका कठीण नव्हता, पण मुलांच्या लग्नाची चिंता भरपूर दिसत होती. बागायतीपेक्षाही भयानक परिस्थिती जिरायती भागात. चांगल्या घरातील, शिक्षित, निर्व्यसनी मुलंही बिनलग्नाची दिसत होती. २५ ते २८ वयोगटातील मुलांची संख्या भरपूर. तिशीच्या पुढचीही काही मुलं बिनलग्नाची होती. बागायती शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याकडे १० एकर जमीन आहे. पोरगा एकुलता एक. पण त्याचं लग्न काही जमेना, कारण तो शेती करतो. शेतीतील अनिश्चितता मुलांच्या संसारस्वप्नांनाही सुरुंग लावत आहे. तरुण मुलं अस्वस्थ आहेत!’
या सर्वेक्षणात सहभागी झालेले विनोद हांडे हे शेतकरी. तरुण शेतकरी मुलांचे प्रश्न आहेत तसे मुलींचे आणि त्यांच्या वडिलांचेही काही प्रश्न आहेत असं स्पष्ट करत, मुलींच्या अपेक्षांविषयी हांडे सांगतात, ‘आता काय खेड्यातपण इतका अडाणीपणा राहिलेला नाही. मुलीही किमान बारावीपर्यंत तरी शिकतात. शेतकरी पोरंही भरपूर कष्ट करून आपलं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतात. पण अस्मानी संकटांशी तुम्ही कसं भिडणार? धरणक्षेत्रातल्या गावात चांगली शेती होते पण पठारी भागात तर प्यायच्या पाण्याचेच वांधे. साधारण जानेवारी महिन्यात जर एखादा वधूपिता आपल्या पोरीसाठी स्थळ पाहायला पठारी भागाच्या गावात गेला की तो परत तिकडे फिरकतच नाही. कारण त्याला समोर दिसतोच दुष्काळ. आपली पोरगी दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरतेय ही कल्पनाही त्याला नको वाटते.
बापाचं काळीज पोरीच्या मायेनं नको म्हणतं अशा स्थळांना. स्वत: शेतकरी असूनही मग शेतकरी जावई नको वाटतो. त्यापेक्षा कुठंतरी लहान मोठी नोकरी करून भले मग १०-१२ हजार महिना पगार असेल तरी तो मुलगा बरा वाटतो. शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही तसंच त्यांच्या मुलांनाही भवितव्य नाही असं झालंय. या सगळ्या प्रश्नांचं मूळ शेतीच्या उत्पादनाचा खर्च आणि शेतमालाच्या भावात आहे. पाणी नाही, उत्पादन कमी, आहे त्याला भाव नाही. निदान शेतीला बारमाही पाणी कसं मिळेल यासंदर्भात तरी काही उपाययोजना व्हायला हव्यात. पण ते नाही म्हणून कुणी सोयरिक करत नाही. पूर्वी
खेड्यात साटेलोटे ही पद्धत असायची, त्याचा अवलंब समदु:खी शेतकऱ्यांनी करावा आता..’सर्वेक्षणातील कार्यकर्ते बाबासाहेब कडू. तेही हांडे यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारी निरीक्षणं सांगतात. गावोगावी फिरताना, लोकांशी चर्चा करताना दिसत होतं की, शेतकरी पोरांना खरंतर नैराश्य आलंय. शेतीतल्या जगण्यातून ना पैसाअडका ना संसार उभं राहण्याची खात्री. अशा विचित्र कात्रीत शेतकरी तरु ण मुलं अडकली आहेत. शेतीसाठी गुंतवणूक करा, मजूर लावा, पाण्यासाठी टँकर लावा, वर उत्पादन चांगलं आलं तरी बाजारभाव नाही. या सगळ्या परिस्थितीने शेतकरी तरु ण खंगलाय. मग जिरायती पट्ट्यातली मुलं शेती सोडून आसपासच्या औद्योगिक भागात लहानमोठ्या नोकऱ्यांकडे वळतात. पण नोकऱ्या तरी कुठं आहेत फारश्या. तरी स्थलांतराचं प्रमाण वाढलंय. जिरायती भागातील २० ते ३० टक्के शेती पडीक दिसते. २०१२ च्या दुष्काळानंतर गेल्या ४-५ वर्षांत ही भयंकर परिस्थिती वाढतच आहे. तिशी ओलांडलेली मुलं तर शेतीच्या कामाबाबतही उदासीन झालीत. आईबापांनी शेतीची कामं सांगितली की ते वैतागतात. आपलं स्वत:चं कुटुंब उभं राहणार नाही तर कशाला कामधंदा करा, अशीही काही मुलांची मानसिकता झालेली दिसते.
‘यंदाच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली प्रवेशाची संख्या पाहिली तरी बराच उलगडा होईल’ - दिलीप पोखरकरांनी गावाकडच्या आणखी एका वास्तवाकडे बोट दाखवलं. काही गावांत यंदाच्या वर्षी पहिलीत अगदी तुरळक मुलांचा प्रवेश झाला आहे. पिंपळगावात तर एकही मूल पहिली प्रवेशाला आलं नाही. याचं मुख्य कारण गावात त्या वयाची मुलंच नाहीत. गावात याविषयी चर्चा केली तर कळलं साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी ज्या तरुणांची लग्न होणं अपेक्षित होतं ती अद्यापही झालेली नाहीत. लग्न नाहीत त्यामुळे अपत्य नाही आणि मग शाळेत मुलं नाहीत हे आगळं चित्र दिसू लागलंय. शेतकरी मुलांचा हा प्रश्न गंभीर होण्यात मुख्य कारण काय ठरलं तर २०१२ चा दुष्काळ. हा दुष्काळ शेतकऱ्यांसाठी सर्वार्थाने कर्दनकाळ बनला आहे.
अभ्यासक हेरंब कुलकर्णी सांगतात, ‘गावकऱ्यांशी संवाद साधल्यावर लक्षात आलं की, गेल्या ४-५ वर्षांत ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. सर्व जातींतील मुलांच्या लग्नाला विलंब होत असल्यानं आता शेतकरी हीच एक जात असल्याचं लक्षात आलं. दुष्काळ, सतत भाव पडण्याची प्रक्रि या, वाढलेला उत्पादन खर्च यातून शेती करून पोट भरणं अधिक कठीण झालंय. परिणामी शेतकरी बाप आपल्या मुलीला शेती करणाऱ्या कुटुंबात द्यायचं नाही, या निष्कर्षावर आले आहेत. माहेरी बघितलेलं शेतीचं भयावह वास्तव, त्यात करावे लागणारे जनावरासारखे कष्ट यामुळे मुलीही लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक नाहीत. पूर्वी मुली वडिलांच्या निर्णयात होकार भरत; पण आता तसं होत नाही. मुलीही आपला निर्णय घरच्यांना सांगू लागल्या आहेत. एकूणच मुलींची संख्या कमी झाल्यानं मुलींना मागणी वाढली. गेल्या काही वर्षांत गावोगावी झालेले ज्युनिअर कॉलेज, बालविवाह थांबविण्याची झालेली चळवळ व जागृती यामुळे मुली आता किमान बारावीपर्यंत शिकत आहेत. त्यातून अधिक चांगल्या जीवनाची आकांक्षा, शहरी महिलांशी होणारी तुलना, चांगल्या जीवनशैलीची आस त्यांनाही आहे. म्हणूनच खेड्यात राहण्यापेक्षा मुलीही शहरातल्या नोकरदार मुलांचा प्राधान्यानं विचार करू लागल्या आहेत.’कुलकर्णी सांगतात तो मुद्दा या अभ्यासातही समोर आला आहेच. मुली शेती करणाऱ्या आपल्या कुटुंबाचे हाल पाहत असतातच. लग्न ही एक संधी वाटते काही मुलींना आयुष्य बदलण्याची. त्यावेळी तरी आयुष्य सुसह्य होईल, पाण्यासाठी वणवण न करता, मन न मारता जगता येईल इतपत गोष्टी मुली तपासून पाहतात. खेड्यापाड्यात मुलगा आणि मुलगी उपवर असतील तर मुलीसाठी स्थळ शोधताना वडीलही आताशा शेतकरी नाही तर शक्यतो नोकरदार मुलगा शोधण्याचा प्रयत्न करतात. आपले हाल झाले तसे मुलीचे नको व्हायला ही त्यांची भाबडी अपेक्षा असते. आणि दुसरीकडे घरातल्या शेती करणाऱ्या मुलाला नोकरी मिळत नाही, हा प्रश्न असतोच. शेती करणारी अनेक मुलं पदवीधर आहेत. पण शहरात नोकऱ्या नाही म्हणून किंवा शेतीच बरी म्हणून ते गावी राहतात. मग शेतीत उत्पादन नाही म्हणून अन्य शेतीशी निगडित व्यवसाय करतात. मात्र तरी समस्या सुटत नाही. शेतीच करतो, गावातच राहतो म्हणून लग्न काही केल्या ठरत नाही.