- कलीम अजीम
ई-सिगारेटवर आपल्याकडे आता बंदी आहे. हा निर्णय गेल्याच आठवडय़ात आला. मात्र तत्पूर्वी जगभरात या प्रश्नाचे काय चित्र आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. जगभरात तंबाखूजन्य पदार्थामुळे होणार्या मृत्यूची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. प्रत्येक वर्षी तब्बल 40 लाख लोकं या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत. एकीकडे ही चिंता सतावत असताना दुसरीकडे ई-सिगारेटमुळे नवे आजार उद्भवत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. परिणामी अनेक देशांनी या सिगारेटवर बंदी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात आता आपल्याही देशात बंदी घालण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ई-सिगारेटविषयी चिंता व्यक्त केली आहे.अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या काही दिवसांत ई-सिगारेट विक्री व वापरण्यास बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेतील तरुणांमध्ये मोठय़ा प्रमाणात फुप्फुसांच्या विकारामध्ये वाढ झाल्याचे दिसले. या विकारातून झालेल्या अनेक मृत्यूचे कारण ई-सिगारेट असू शकतं, असाही संशय वर्तवला जात आहे.अमेरिकेच्या आरोग्य पथकाने तब्बल 33 राज्यांत तपासणी राबवली. वय वर्षे 10च्या पुढे केलेल्या या तपासणीत तब्बल 450 तरुणांना फुप्फुसांचा विकार झाल्याचे निदान झालं आहे. हे विकार ई-सिगारेटमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही आकडेवारी पाहता अमेरिकेत ई-सिगारेट बंदीच्या हालचालींनी वेग धरला आहे.काय आहे ई-सिगारेट?इलेक्ट्रॉनिक सिगारेट किंवा ई-सिगारेट एक बॅटरीवर चालणारं उपकरण आहे. ज्याला धूम्रपानाचा पर्याय म्हणून विकसित करण्यात आले आहे. सर्वप्रथम 2003 साली चीनच्या एका कंपनीने हे सिगारेट मार्केटमध्ये आणले. 2005-2006 पासून त्याची देश-विदेशात विक्री सुरू झाली. ती सिगार, सिगारेट किंवा अन्य धूम्रपानासाठी पर्याय म्हणून वापरली जाते. हे उपकरण एका छोटय़ा पुंगळी किंवा पाइपसारखे असते. काहीअंशी हे बॅटरीसारखे किंवा मूळ सिगारेटसारखे वेगवेगळ्या डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. यात तंबाखूच्या जागी निकोटीन, ग्लिसरीन किंवा ग्लाइसोल इत्यादी लिक्विड वापरले जाते. हे उपकरण तोंडात टाकून सुरू केले की त्यातून प्रेशरने वाफ निघते. ई-सिगारेट ओढण्याला वेपिंग म्हणतात.या वेपिंगचे आज मार्केटमध्ये अनेक फ्लेव्हर उपलब्ध आहेत. त्यात मँगो, क्र ीम, मिंट, मेन्थॉल, कँडी, फ्रूट आणि अल्कोहोल हे प्रमुख आहेत. कंपन्याचं म्हणणं आहे की ई-सिगारेट ही धूम्रपानाचं व्यसन रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. कृत्रिम धुरातून सिगारेट ओढण्याचं व्यसन हळूहळू कमी होऊन कालांतराने ते नष्ट होते, असा दावा या कंपन्या करतात. मात्र आरोग्य तज्ज्ञाचं म्हणणं आहे की, या ई-सिगारेटमध्ये निकोटीन वापरलं असल्याने पूर्वीचा धोका इथेही कायम आहे. कंपन्या 5 टक्के म्हणत असल्या तरी, त्याचं प्रमाण अधिक असतं असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. दुसरं म्हणजे विविध फ्लेव्हरमुळे धूम्रपानाचं व्यसन कमी होत नसून ते वाढते, असा निष्कर्ष संशोधक व हेल्थ एक्स्पर्ट काढतात.पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) या संस्थेने गेल्या वर्षी एक रिपोर्ट सादर केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, ई-सिगारेटमुळे इंग्लंडमध्ये दरवर्षी तब्बल 20 हजार लोकं धूम्रपान सोडत आहेत. पीएचईने अशी शिफारस केली होती की, डॉक्टरांनी पेशंटना ई-सिगारेट वापरण्याच्या सूचना कराव्यात. इतकंच नाही तर हॉस्पिटलमध्ये ई-सिगारेट विक्रीला ठेवण्याचा सल्लाही संस्थेनं दिला होता. सामाजिक कार्यकत्र्यानी मात्र ई-सिगारेटला विरोध दर्शविला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा सिगारेट ओढण्यास बंदीची मागणी केली होती. त्यांचं म्हणणं होतं की, यामुळे लोकं सिगारेट ओढण्यास उत्तेजित होतील.हेल्थ एक्स्पर्टचं म्हणणं आहे की, ज्यावेळी लोकं तंबाखूजन्य सिगारेट ओढतात, त्यावेळी त्यांच्या पोटात धुराचे सात हजार घटक जातात. ज्यातील 70 घटक कॅन्सरला जन्म घालणारे असतात. त्यामुळे ई-सिगारेट कमी धोक्याच्या आहेत. या संदर्भात अनेकांची मते वेगवेगळी आहेत. पण नव्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की ई-सिगारेट आरोग्यास धोकादायक आहेत. संशोधकांचं म्हणणं आहे की, ई-सिगारेटमध्ये मद्याएवढे निकोटीन असतं. त्यामुळे त्यावर तत्काळ बंदी आणली गेली पाहिजे. डब्ल्यूएचओनेदेखील जास्त काळ ही सिगारेट वापरल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो, असा निष्कर्ष मांडला होता.न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या 13 वर्षाच्या मुलाला, बैरनलादेखील ई-सिगारेटचं व्यसन जडलं आहे. ट्रम्प त्याचे हे व्यसन सोडू पाहत आहेत; पण मुलाला ती सोडवत नाही. त्यामुळे ट्रम्प आक्र मक झालेले आहेत. कुठल्याही कारणाने का होईना ट्रम्प यांचा निर्णय इतर देशातही बंदीची सुरुवात करू शकतो. अमेरिका व ब्रिटन ई-सिगारेट कंज्यूम करणारे सर्वात मोठे देश मानले जातात. अलीकडे ब्रिटनमध्येही त्यावर बंदीची चर्चा सुरू झाली आहे. तिथे लहान मुलांना या सिगारेटच्या विक्र ीला बंदी घालण्यात आली आहे.भारतात नुकतीच ई-सिगारेटच्या विक्री व वापरावर बंदी टाकण्यात आली आहे. निर्णयाचं उल्लंघन केल्यास 1 लाखाचा दंड होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, बिहार, केरळ, कर्नाटक, मिझोराम, काश्मीर आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यांत ई-सिगारेटला बंदी होती. आता देशभरात असेल.