- निशांत महाजन
झोपेत चालण्याचा आजार असतो, हे काही आपल्याला नवीन नाही; पण झोपेत मोबाइलवर मेसेज पाठवण्याचा आजार कुणाला होऊ शकतो का? त्या आजाराला म्हणतात ‘स्लीप टेक्सटिंग!’ म्हणजे झोपेत कुणाला तरी मेसेज पाठवणं, मेसेजला उत्तरं देणं, प्रसंगी आपण कुणाला काय मेसेज केला हे आठवणं आणि कधीकधी तर आपण रात्री-बेरात्री मेसेज केले हेही न आठवणं या सार्या प्रकाराला म्हणतात स्लीप टेक्सटिंग. तरुण मुलामुलींमध्ये या नव्या आजाराचं प्रमाण मोठं असलं तरी हा आजार तरुणांपुरताच मर्यादित नाही तर कार्पोरेट जगात काम करणा-या अनेकांना रात्री 2 किंवा 3 वाजता मेसेज पाठवण्याचा आजार झालेला दिसतो. आणि आपल्याला हा आजार आहे हेदेखील ते मान्य करत नाहीत.
मात्र जगभर सर्व जातीभेद ओलांडून हा आजार फोफावत असल्याचं झोप अभ्यासकांचं म्हणणं आहे. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज हेल्थ या जर्नलने अलीकडेच एक अभ्यास प्रसिद्ध केला. त्यांनी फक्त कॉलेजात जाणा-या मुलांचा अभ्यास केला तर त्यात असं दिसतंय की, 4 पैकी 1 तरुण झोपेत मेसेज पाठवतात. आणि आपण असं काही करतो हे त्यांच्या गावीही नाही.
या सा-या प्रकाराला हे अभ्यासक नाइट लाइफ बिहेव्हिअर असं म्हणतात. त्या रात्रीच्या वर्तनात हे लोक मोबाइल पाहतात, सोशल मीडिया मेसेज तपासतात आणि प्रसंगी कुणाला काही कामाचे वा बिनकामाचे मेसेजही पाठवतात. अनेकदा असे मेसेज पाठवणं धोकादायक आहे. प्रसंगी लाजिरवाणंही होतं. वाट्टेल ते लिहिणं, शिवीगाळ, मनातलं ओकणं आणि व्याकरण, अपेक्षित नसलेले शब्द वापरणं हे सारं या झोपेत मेसेज पाठवणं प्रकारात घडतं.हे का घडतं, असं शोधलं तर असं दिसतं की जवळपास 93 टक्के तरुण आपला मोबाइल उशाशीच घेऊन झोपतात. ( हा आकडा जगभरात मोबाइल वापरणा-या सर्वांसाठी खरा आहे असंही अभ्यासक सांगतात.) किमान दिवसाला 10 तास मोबाइल अनेकांच्या शब्दश: हातात असतो. विशेष म्हणजे रात्री 2 वाजता किंवा 3 वाजता, काहींना मध्यरात्रीही जाग येते आणि त्यावेळी ते सोशल मीडिया मेसेज तपासतात. प्रसंगी चर्चेत भाग घेतात. प्रसंगी पोस्ट करतात, मेसेज करतात. आणि मग पुन्हा झोपतात. जे लोक झोपेत मेसेज पाठवतात त्यापैकी 72 टक्के लोकांना हे आठवतही नाही की आपण रात्री असा काही मेसेज केला होता.
ते स्वत: तो मेसेज नाकारतात. पण यंत्र खोटं बोलत नाहीत, त्यामुळे रात्री-बेरात्री केलेल्या मेसेजचं रेकॉर्ड तयार होतंच. त्यामुळे त्यापायी जी काय शोभा होते, नाती खराब होतात, करिअरवर परिणाम व्हायचा तो होतोच.
त्याहून वाईट परिणाम आणखी एका गोष्टीवर होतो. ती म्हणजे, झोप. अनेकांना निद्राविकार होतात. त्यांचं मनस्वास्थ्य बिघडतं. मूड जातात. काहींना नैराश्यही येतं. पचन संस्थेवर जागरणाचा परिणाम होतो. आणि पुढचा दिवस उदास, रटाळ जातो.अभ्यासक सांगतात की, झोपेत हात पोहोचणार नाही, उठून जावंसं वाटणार नाही इतपत लांब तरी मोबाइल ठेवा. कारण हा नवा आजार तुम्हाला घेरेल तेव्हा त्यातून बाहेर पडणं अधिक अवघड आहे.