- अमृत बंग
आजकाल तरुण मुलं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली मतं व्यक्त करतात, हे खऱ्या अर्थानं अभिव्यक्तीचं ‘लोकशाहीकरण’ आहे. तरुण मुलं भरपूर बोलतात आणि सुशिक्षित तरुण मुलंमुली काय लिहितात, याचा काही परिणाम तर नक्कीच समाजावर, व्यवस्थांवर होतो. मात्र ,या व्यक्त होण्याचीही एक मर्यादा आहे, ते म्हणजे केवळ समाज माध्यमात मत व्यक्त केलं म्हणून थांबून चालणार नाही.
ज्या तरुण मुलांना कुठल्याही एका मुद्द्यासाठी ‘ॲक्टिव्हिजम’ करायचा त्यांनी ‘टिप्पणी’च्या पुढे जायचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे मुद्दा काहीही असो, ती गोष्ट बाह्य जगात जिथे खरे प्रश्न, समस्या आहे, जिथं ते घडत असतं तिथपर्यंत जायला हवं.
काहीजण केवळ समाजमाध्यमात मत मांडलं म्हणत थांबून जातात. ते पुरेसं नाही. ज्या प्रश्नाविषयी आपल्याला कळकळ वाटते, तिथं प्रत्यक्ष जायला हवं. तेही जमणार नसेल तर त्याचं जे आपल्याजवळचं रुप आहे, ते तरी समजून घ्यायला हवं.
आणि अजून त्यासह करायची गोष्ट म्हणजे आपण जी टिप्पणी करतो, जो ॲक्टिव्हिजम करतो त्याला तीन गोष्टींची जोड हवी.
ज्ञान, मूल्य, आणि सातत्य.
आपण ट्विटरवर मत मांडतो, आपल्या बाजूच्या मताचे १० लोक, विरोधातल्या मताचे ११ लोक, त्या वादात जो जिंकला, तो जिंकला. हे केवळ ‘मतमोजणी’चं अंकगणित आहे. त्यापलिकडे जायचं तर आपण जे बोलतो, करतो त्याला या तीन गोष्टींची जोड हवीच.
१. ज्ञानाधार.
आपलं मत आहे, तसं इतरांचं मतही आहेच. मग चूक की बरोबर कसं ठरवणार? ते ठरवायचं तर आपल्या मताला ज्ञानाधार असावा. म्हणजे जे मी म्हणतो त्याला अभ्यासाचं बळ हवं . तरच आपल्या ॲक्टिव्हिजमला बळ येतं.
२. मूल्याधार.
आपण जे बोलतो, लिहितो ते केवळ शाब्दिक मत न राहता, ते मी माझ्या जगण्यात उतरवतो का, ते माझ्या जगण्यात स्वीकारतो का, हे महत्त्वाचं आहे. ते तसं नसेल तर लोक म्हणतात, ठीक आहे, ही फक्त बडबड आहे.
तसं होऊ नये.
३. सातत्य
आपल्या ॲक्टिव्हिजमची प्रेरणा काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तात्कालिक राग आला म्हणून केलं मत व्यक्त. संपलं तिथेच असं होऊ नये. आपण जे काम करतो, त्यात सातत्य महत्त्वाचं. नाहीतर केवळ स्टेटमेण्ट मारून अनेकजण मोकळे होतात. तसं होऊ नये. एका विषयातला तरी अभ्यास, त्यासाठी काम, वेगवेगळ्या लोकांसमोर आपला मुद्दा मांडणे, आपल्या विषयात जे नवीन काम होतं आहे ते समजून घेत अपडेट राहणं, हे महत्त्वाचं आहे.
ज्ञान, मूल्य, सातत्य यांसह आपण जी ‘भूमिका’ घेतो, त्याचा आणि आपण ज्यासाठी काम करतो त्याचा जैविक संबंध जोडता आला पाहिजे.
तरुणांच्या ॲक्टिव्हिजमसाठी ते महत्त्वाचं आहे.
(निर्माण, तरुणांसाठीची चळवळ)