-भाग्यश्री मुळे
तामिळनाडूच्या मदुराईतल्या मासी रस्त्यावर विवेक सबपाथी नावाचा तरुण चहा विकतो. त्याचा चहा नेहमीसारखाच आहे; पण कप मात्र वेगळा आहे. या तरुणाने बिस्किटाच्या कपात चहा द्यायचा प्रयोग सुरू केला आहे. चहा प्यायचा आणि कप खाऊन टाकायचा अशी ही भन्नाट आयडिया आहे. दिवसभर चहाप्रेमी त्याच्याकडे चहा प्यायला येतात. कोरोना उद्रेकाच्या काळात त्याने हा पर्यावरण स्नेही, संसर्गाचा धोका कमी करणारा एक पर्याय समोर ठेवला आणि त्याची बरीच चर्चाही झाली. चॉकलेट फ्लेवरच्या या कपात 60 मिली लिटर चहा बसत असून, तो 10 मिनिटं राहू शकतो. दिवसभरात जवळपास 500 कप चहा विकला जात असल्याचं विवेक सांगतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या विवेकला काहीतरी वेगळं करून पहायची इच्छा होती. त्याचे वडील चहाची भुकटी, आयुर्वेदिक तेल विकण्याचा व्यवसाय करतात. शिक्षण संपवून वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केल्यावर त्याला वाटलं की, आपण इथंच चहाचा स्टॉल लावला तर. त्यानं तसं केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच दरम्यान 2019 मध्ये प्लॅस्टिकबंदीची घोषणा झाली. एकदाच वापरून फेकून दिले जाणारे कागदी, प्लॅस्टिकचे कप बंद झाल्याने चहा द्यायला दुसरा काहीतरी पर्याय शोधला पाहिजे हा विचार विवेकच्या मनात आला.
त्यानं विचार केला की, हा पर्याय पर्यावरण स्नेही, कमी किमतीचा, स्वच्छ आणि वापरणार्याच्या सोयीचा असावा. त्याला स्टीलचे कप हा पर्याय होता; पण ते कप सतत धुणं, स्वच्छ करणं या गोष्टी त्याला त्रासदायक वाटल्या. त्यानंतर त्याने कुल्हड म्हणजेच मातीच्या कपात चहा द्यायला सुरुवात केली; पण हा पर्यायदेखील फारसा सोयीचा वाटला नाही. याच दरम्यान त्याला रोहन पनमनी या तरुणाबद्दल समजले. आइस्क्रीम आणि इतर गोष्टींसाठी वापरले जाणारे वेफर बेस कप त्याची कंपनी बनवण्याचा विचार करत होती. प्रायोगिक स्तरावर केलेले हे बिस्कीट कप पाहून विवेक खूप खूश झाला. त्याला असेच काहीतरी नवे आणि लोकांनाही आवडेल असे हवे होते. तत्काळ त्याने चहाच्या दुकानात बिस्किटाचे कप आणून ग्राहकांना त्यातून चहा द्यायला सुरुवात केली. लोकांनाही ते खूप आवडले. रोहन पनमनी या तरु णानेदेखील वेफर या प्रकारात वेफर कप सारखा नवीन प्रयोग करायचे ठरवले. त्याच्या कंपनीने प्रयोग करून अशा कपचे मोठे उत्पादन केले. विवेकलाच ते पहिली मोठी ऑर्डर पूर्ण करून देणार होते. पण नेमका त्याच दरम्यान कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे ऑर्डर पोहोचायला मार्चऐवजी जून उजाडला. प्रवासादरम्यान कप तुटू नये यासाठी कपाचा आकार, भक्कमपणा याची चाचपणी करण्यात आली. लॉकडाऊन जसजसे शिथिल होत गेले तसतशी कपांची डिलिवरी वाढत गेली. आता हळूहळू विवेकच्या दुकानावर बिस्किटाच्या कपातला चहा पिण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. चहा प्यायचा, कप खायचा, आणि खूश व्हायचं असा हा नवा कल्पक व्यवसाय आहे.
(भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)