- राम शिनगारे
परशुराम माने. बीड जिल्ह्यातील आरणवाडी गावचा युवक़ औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात शिक्षण घेतो. स्पर्धा परीक्षांची तयारी खरं तर करतोय. गावात आई-वडील ऊसतोडणीला जायचे. शेती नाही. वय झाल्यामुळे ऊसतोडणीचे काम होत नाही. यामुळं त्यांनी गावच्या स्टॅण्डवर चहा-पाण्याचं हॉटेल टाकलं. यातून आई-वडिलांचं कुटुंब चालतं. याचठिकाणी दुसरेही तीन हॉटेल सुरू आहेत. दुष्काळामुळे गावातील बहुतांश लोक ऊस तोडायला गेल्यामुळे हॉटेलचा व्यवसाय पूर्णपणे बसला. दिवसाकाठी शंभर रुपये मिळणंही कठीण झालंय. यामुळं गावाकडून पैसे येणं बंद झालं. पार्टटाइम जॉब केल्याशिवाय पर्यायच नव्हता. अभ्यासिकेत पार्टटाइम जॉब मिळाला. यातून महिन्याला तीन हजार रुपये मिळत होते. आता सरकार मेगाभरती करणार असल्यामुळे काही दिवसांपासून पार्टटाइम जॉब बंद करून त्यानं अभ्यासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या काळात ट्रक ड्रायव्हर असलेला चुलत भाऊ थोडीफार आर्थिक मदत करतोय, म्हणून भागतंय !****बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पात्रुड हे गाव आहे. या गावातील शंभू आलझेंडे व चंद्रभान आलझेंडे हे दोघे भाऊ औरंगाबादेत शिकतात. त्यांचं अॅडमिशन गावाकडच्या कॉलेजात आहे. घरी साडेचार एकर शेती. यावर्षी शेतात साधी पळाटीही (कापसाच झाडं) दिसली नाही. शंभू बी.एस्सी.ला तर चंद्रभान बारावी सायन्सला आहे. शेतात काहीच आलं नाही. दुसर्याच्या शेतात आई-वडील मोलमजुरी करतील तर कोणाकडंच काम नाही. वडिलांना लग्नात बॅण्ड वाजवता येतो. पण यंदा दुष्काळामुळं लगAांचंही प्रमाण कमी झाल्यामुळं ते ही काम मिळत नाही. यामुळं शंभू दोन हजार आणि चंद्रभान चार हजार रुपये महिन्यावर अभ्यासिकेत पार्टटाइम जॉब करतात. त्यातलेच काही पैसे घरी द्यावे लागतात. स्वतर्चं शिक्षण आणि कुटुंबातला किरकोळ खर्च त्यातून भागतो असं शंभू सांगतो.****समाधान ससाणे. एका अभ्यासिकेचं काम पाहतो. त्याला त्याठिकाणी आठ हजार रुपये मिळतात. यातून तो त्याच्यासह बायकोचं शिक्षण करतो. गावाकडून आर्थिक मदत मिळत नाही. स्पर्धा परीक्षांमधून नोकरी मिळेल. या आशेवर रात्रंदिवस कष्ट करणं सुरू आहे. त्याच गाव जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात बाणेगाव आहे. शेती तीन एकर. आई-वडील मिळेल ती कामे करून कुटुंब चालवतात. हे सांगताना त्याचा चेहरा कष्टी बनतो. काहीतरी होईल या आशेवर सारं चालू आहे असं तो सांगतो. ****अनिता कुदनर. कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल यासाठी ती औरंगाबादेतील एका व्यापारी पतसंस्थेत जॉब करते. ती नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आहे. घरी चार एकर शेती. पूर्वी शेतात ऊस होता. तेव्हा उत्पन्न बरं होतं. सगळ्यांना वाटतं नगर जिल्हा म्हणजे समृद्ध असा आहे. पण तसं नाही. त्या जिल्ह्यातील काही भागच समृद्ध असतील. आमचं गाव दुष्काळाच्या झळा सोसत आहे. शेतात कांदे होते. त्यास भावही मिळाला नाही. मदत मिळावी म्हणून पार्टटाइम जॉब सुरू केला. शिक्षण सुरू ठेवलं आहे.**** मनीषा शिंदे. अभ्यासिकेत पार्टटाइम जॉब करते. जालना जिल्ह्यातील परतूर येथील रहिवासी. वडील शिवणकाम करतात. दोघी बहिणींचं शिक्षण सुरू आहे. नोटाबंदीपासूनच वडिलांच्या व्यवसायाला ग्रहण लागलं होतं त्यात दुष्काळानं अधिक भर पडली. आता व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यावर कुटुंब चालवणं कठीण असताना आम्हाच्या शिक्षणासाठी पैसे कुठून येणार, यामुळं अभ्यासिकेत पार्टटाइम जॉब करून शिक्षण घेते, असं मनीषा सांगते.****विनोद काटेकर, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात त्याचं गाव. 5 एकर कोरडवाहू शेती. मोठा भाऊ कंपनीत जॉब करून कुटुंब चालवतो. माझ्या शिक्षणासाठी पैसा कुठून येणार? हा त्याचा प्रश्न होता. यामुळं अभ्यासिकेत पार्टटाइम जॉब करतो आहे. यातून औरंगाबादेत राहणं आणि खाण्याचा प्रश्न मिटला आहे. अभ्यासाला थोडा कमी वेळ मिळतो. पण स्वाभिमानानं काम करून शिकता येतं, त्यातच आनंद आहे, असेही तो सांगतो.****राजरत्न भोजने हा युवक शिक्षणासाठी हॉटेलमध्ये पार्टटाइम जॉब करतो. त्याचं शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागात सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात वरुड गव्हाण हे त्याचं गाव. त्याठिकाणी वडिलांचा शिवणकाम करण्याचा व्यवसाय आहे. दुष्काळाच्या झळांमुळे मागील काही महिन्यांपासून महिन्याकाठी दोन-तीन ड्रेसच शिवण्यास येतात. आई मिळेल तेव्हा दुसर्या शेतात रोजंदारीवर कामाला जाते. यातून कसेतरी कुटुंब चालत. यामुळं हॉटेलात पार्टटाइम जॉब करत असल्याचं राजरत्न सांगतो. महिन्याकाठी सोडतीन हजार रुपये आणि संध्याकाळचं जेवण मिळतं, यातून स्वाभिमानानं शिक्षण पूर्ण होत असल्याचेही तो सांगतो.***बापू वर्हाडे हा युवक एका हॉस्पिटलमध्ये रात्री 9 ते सकाळी 9 या वेळेत पार्टटाइम जॉब करतो. यासाठी त्याला 6 हजार रुपये मिळतात. माजलगाव तालुक्यातील मोटेवाडी या गावाचा रहिवासी. मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात संशोधन करतोय. गावाकडं दीड एकर शेती असून, आई-वडील पैसे पाठवू शकत नाहीत. यावर्षी दुष्काळामुळे 20 ते 25 क्विंटल कापूस ज्या शेतात होत होता, त्याठिकाणी अवघा चार क्विंटल कापूस झाला. यातून बी-बियाणे, खत याचाही खर्च निघाला नाही. असं झाल्यामुळे वडील पैसे पाठवू शकत नाही. गावाकडं जावं तर संशोधन बंद पडेल. यामुळं पार्टटाइम जॉब करून शिक्षण घेणं सुरू असल्याचं बापू सांगतो.***औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील मयूर (नाव त्याच्या विनंतीनुसार बदललं आहे) हा युवक देवगिरी महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्षात शिकत आहे. घरची परिस्थिती बेताचीच. तीन एकर शेती. यावर्षी मक्याचे पीक काही आलंच नाही. आई-वडील, बहीण, एक भाऊ शेतात काम करतात. सध्या त्यांच्याही हाताला काही काम नाही. यामुळे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पॉश एरियातील एका हॉटेलमध्ये वेटरचं पार्टटाइम काम करतो. त्याच्याशी संवाद साधला तेव्हा बोलण्यास तयार नव्हता. त्याला आत्मविश्वास दिला की, तुझं नाव छापणार नाही. तेव्हा बोलला. त्यास भीती होती हॉटेलमालकाची. छापून आलं तर पार्टटाइमची नोकरी जाईल म्हणून. हॉटेलात अतियश उत्तम सेवा देतो. जो कोणी काम सांगेल, त्यास नाही म्हणत नाही. कारण काय तर जॉब जाण्याची भीती. या जॉबमधून त्याला तीन हजार रुपये मिळतात. रात्री 6 ते 11 या वेळेत काम. 11 वाजेनंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नातूनच जेवण मिळतं. पण शिक्षण तर सुटलं नाही यातच तो खूश होता.*****या आणि अनेक कथा सांगता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकणार्या दुष्काळी भागातल्या मुलांचं हे वर्तमान आहे. या कहाण्या आणि मनात काहीतरी भविष्यात बरं घडेल ही आशा एवढय़ावरच ते दुष्काळाचे चटके सोसत, पोळत शिकत आहेत. मराठवाडय़ासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. मागील काही वर्षापासून सतत पडत असलेल्या दुष्काळापेक्षा यावर्षी परिस्थिती नाजुक बनलेली आहे. खरीप हंगामच पऊस नसल्यामुळे वाया गेला. रब्बीची शक्यताच धूसर बनली. या दुष्टचक्रांचा परिणाम गावगाडय़ावर झालेला असून, त्याच्या झळा सर्वत्र बसत आहेत. गावातून मोठ मोठी स्वप्न घेऊन औरंगाबादसारख्या शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलांना कठिण परिस्थितीतून जावे लागत आहे. गावाकडून येणारी आर्थिक रसद पूर्णपणे थांबली आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येणारा प्रत्येक दिवस कामाविना घालवावा लागत आहे. यात आई-वडिलासह कुटुंब जगवणं कठीण झालं असाताना शहरात शिकणार्या मुलास पैसे कोठून पुरवायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.गावाकडून पैसे मिळत नाहीत. आतार्पयत दोन-चार र्वष अभ्यास करून शिक्षण घेतलं. आता ते सोडून जायचं तर कोणत्या तोंडाने गावात जावं, असा प्रश्न शेकडो विद्याथ्र्यापुढे आहे. यातून अनेकांनी मार्ग काढण्यासाठी शहरात राहणं आणि खाणं यापुरते पैसे कमावण्यासाठी पार्टटाइम जॉब करण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. पार्टटाइम जॉबमधून दोन ते तीन हजार रुपये महिन्याकाठी मिळतात. त्यातून शिक्षण सुरू ठेवतात. किमान स्पर्धेच्या जगात आपलं अस्तित्व टिकवून आहेत. पार्टटाइम जॉब करणारी मुलं यापूर्वीही होती. मात्र यावर्षी त्यात मोठी वाढ झाली आहे. घरपोच जेवण पुरविणार्या सेवा, एटीएम मशीनवर सुरक्षा रक्षक, हॉटेल-बारमधील वेटरकी, हॉस्पिटल, अभ्यासिकेतील नियोजन अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पार्टटाइम जॉब करणारी मुले आढळून येतात. यात सर्वाधिक प्राधान्य हॉटेल आणि बारमधील कामांना आहे. त्याठिकाणी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेर्पयत काम करावे लागते. शेवटी हॉटेलात शिल्लक राहिलेलं अन्न खावून निघता येतं. यात एकवेळचा जेवणाचा प्रश्न मिटतो. कामही पाच तासच करावं लागतं. पुन्हा दिवसभर अभ्यासासाठी वेळ मिळतो. याचा परिणाम हॉटेलात पार्टटाइम काम मागणारी मुलं मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांना कमीत कमी दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये महिन्याकाठी दिले जातात. याचा परिणाम ज्या हॉटेलमध्ये पूर्वी 5 वेटर असायचे त्याठिकाणी 10 जण असल्याचे दिसतात. ही मुलं मिळालेलं काम कायम राहव यासाठी हॉटेलातील ग्राहकांना सेवा देताना अतिशय प्रेमळ, तत्पर सेवा देतानाही दिसून येतात. याशिवाय इतरही ठिकाणी मुलं पार्टटाइम करतात. ही परिस्थिती येत्या महिना दोन महिन्यात अधिक विदारक होईल अशीही आता चर्चा आहे. कारण आर्थिक परिस्थितीचे चटके आता हळूहळू बसू लागले आहेत. बीड, जालना, उस्माबाद, लातूर, बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागाच्या गावातील लोक ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकात गेलेले आहेत. ही लोकं परतण्यास येत्या महिन्याअखेर सुरुवात होईल. तेव्हा दुष्काळाची समस्या अधिक उग्र रूप धारण करेल, असं ही मुलं सांगतात.या मुलांच्या जिद्दीचं कौतुक करायचं की दुष्काळानं त्यांना कुठल्या गर्तेत ढकलून दिलं आहे यानं अस्वस्थ व्हायचं, हा प्रश्न छळतोय. त्याचं उत्तर कुठं शोधायचं..
(लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत वार्ताहर आहेत.)