सेलिब्रेशनशी जोडलेलं दारूचं नातं आणि आनंदाचा भ्रम तोडणारे तीन लेख ‘ऑक्सिजन’ने 25 डिसेंबर 2015 रोजी प्रसिद्ध केले होते. ‘निर्माण’ या उपक्रमाशी जोडलेल्या या तिन्ही दोस्तांच्या लेखांना महाराष्ट्रभरातून अनेक प्रतिक्रिया आल्या. मात्र त्याचबरोबर राज्यभरातील तरुण-तरुणींनी ‘निर्माण’कडे पाठवले काही प्रश्न आणि शंकाही. त्या प्रश्नांची उकल व्हावी म्हणून ही काही स्पष्ट उत्तरं.
* मी अजून दारू पीत नाही, परंतु माझे जवळपास सगळेच मित्र दारू पितात. ते मला आग्रह करतात, चिडवतात, भरीस घालण्याचाही प्रयत्न करतात. मी काय करू?
- मित्र दारू पितात म्हणून आपणही प्यायला हवी हा मानसिक दबाव कुठून निर्माण होतो?
असा प्रश्न स्वत:ला विचारा.
ही गर्दीची गुलामी नाही का? गर्दी वागते तसंच वागणं हा मेंढरांचा स्वभाव आहे. त्यातच मेंढराला सुरक्षित वाटतं. कळप जरी दरीकडे जात असेल तरी मेंढरू त्या कळपाच्या सुरक्षिततेच्या मोहापायी दरीत पडतं पण वेगळं वागत नाही.
तसंच हे! हे कसलं व्यक्तिस्वातंत्र्य? ही तर स्वातंत्र्याची भीती आहे. खरी मर्दानगी किंवा व्यक्तिस्वातंत्र्य आहे ते वेगळं वागण्याची हिंमत दाखवण्यात! सर्वच पितात पण मी ‘हटके’ आहे, वेगळा आहे, स्वतंत्र आहे असंही स्वत:ला सांगता येऊ शकतं. तसंही एरवी गर्दीत वेगळे, उठून दिसण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करतातच. मग सगळेच पितात तर मग माझा वेगळा जाहीरनामा- मी पीत नाही, मी पिणार नाही. हेच माझं वेगळेपण. माझं स्वातंत्र्य मी न पिण्यात आहे. ते मी ठासून इतरांना सांगणार, असं स्वत:ला सांगितलं तर आत्मविश्वास वाढेल. त्याउलट या गर्दीला घाबरणं काय सिद्ध करतं? तर आपला डरपोकपणाच!
त्यापेक्षा हे ‘नाही’ म्हणण्याचं धैर्य दाखवता आलं तर पुढे जीवनात अनेक बाबतीत हा ठामपणा दाखवता येईल. यालाच नैतिक धैर्य म्हणतात. हे ज्याच्या अंगी असतं त्याच्या अंगी नेतृत्व येतं. आणि ते इतर कुणी करावं असं म्हणण्यापेक्षा त्याची सुरुवात आपल्यापासून करावी हे उत्तम!
*मी फक्त सोशली ड्रिंक करतो, तसा माझा स्वत:वर कंट्रोल आहे, मी मनात आणलं तर कधीही दारू सोडू शकतो, असं माझे अनेक मित्र ठामपणो सांगतात, ते खरं असतं का?
- संयमित सोशल ड्रिंकिंग हे एक मृगजळ आहे. दिसायला लोभस पण वास्तवात नसणारं! कारण दारूचा पहिला घोट ज्यांनी घेतला त्यातली 25 टक्के माणसं आयुष्यात केव्हा न केव्हा दारूच्या आहारी जातात. कोणती व्यक्ती कधी दारूच्या आहारी जाईल हे सुरुवातीस ओळखता येत नाही. त्यामुळे दारूचं व्यसन किंवा दुष्परिणाम टाळण्याचा सर्वात प्रभावी व सोपा मार्ग म्हणजे कधीही दारू न पिणं. संयमित सोशल ड्रिंकिंग युरोप आणि उत्तर अमेरिका या दोन खंडांच्या संस्कृतीमधेही पूर्ण साध्य झालेलं नाही. म्हणून तर दारूग्रस्तता हा तिथं प्रमुख प्रश्न बनत आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, रशिया, पूर्व युरोप या देशांतील पिणा:यांमध्ये ‘नियंत्रित दारू पिणं’ हे जास्त दुर्मीळ आहे. या देशातील पिणा:यांमधे बेफाट पिणं (बिंज ड्रिंकिंग) हाच प्रकार जास्त आढळतो. म्हणजे धोका अधिकच.
त्यामुळे ‘मी दारू थोडीशीच पिणार, कधीमधीच पिणार’ हा संयम ठेवणं कठीण. कारण ते पेय मग सतत बोलावतं. आठवण येते. आणि मोह सुटत नाही. त्यापेक्षा मोह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या वाटेलाच न जाणं. त्यामुळे सोशल ड्रिंक या शब्दालाही भुलू नकाच.
* मला दारू सोडायची आहे, मी खूप प्रयत्न केला पण सुटतच नाही, मी काय करू?
- पिण्याची सवय आणि दारूची पकड किती पक्की यानुसार आणि इतर परिस्थितीनुसार या समस्येवर उपाय करायला हवेत. अधेमधे पिणा:यांसाठी काही सोपे पर्याय आहेत. व्यसन सोडायचं तर ठोस उपाय करायला हवेत. त्यापैकी हे काही पर्याय.
* ‘मी दारू पिणार नाही’ हा संकल्प करणं.
* दारू पिण्याचे प्रसंगच टाळणं. उदा. पार्टी, दारू पिणा:यांची संगत
* पर्यायी आनंदात मन रमवणं, वेळ छंदासाठी देणं.
* कौटुंबिक कलह टाळणं. ते सोडवणं.
* समुपदेशन घेणं.
* ‘अल्कोहोलिक अनॉनिमस’ जॉईन करणं.
* व्यसनमुक्ती केंद्रात सल्ला व उपचार घेणं.
* व्यसनमुक्तीचा वैद्यकीय उपचार घेणं.
* दारूमुळे अंगात शक्ती येते, उत्साह वाढतो हे खरं आहे का?
- दारूच्या कोणत्याही प्रकारात (बिअर, वाइन, व्हिस्की, देशी) प्रभावी पदार्थ अल्कोहोल हा असतो. बाकी सर्व रंग, चव, गंध व पाणी! अल्कोहोलचा जवळपास शरीरातील सर्वच अवयवांवर प्रभाव पडतो. अॅसिडिटी वाढते, त्वचेतला रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरावर गर्मीचा भास होतो. हृदयगती वाढते. पण सर्वात मुख्य प्रभाव - ज्यासाठी लोक दारू घेतात - तो मेंदूवर होतो. अल्कोहोल हा मेंदूच्या पेशींचा (चेतापेशी) उत्तेजक नसून डिप्रेसंट, त्यांना मंद करणारा पदार्थ आहे. हे वैद्यकशास्त्नातील सत्य आहे. असं असताना दारू घेतल्यावर उत्साही, उत्तेजित वाटणं कसं शक्य आहे.
अल्कोहोल मेंदूपेशींना मंद करतो व त्याद्वारे या संयमशक्तीला, विवेकाला प्रथम मंद व मग बंद करतो. त्यामुळे बंधनातून सुटलेल्या मेंदूला उत्तेजनाचा, उत्साहित झाल्याचा भास होतो. मोकाट वाटते. त्या अनुभवासाठी दारू पुन्हा पुन्हा प्यावीशी वाटते. तो अनुभव म्हणजे ब्रेकविना गाडी वेगाने चालवण्याचा अनुभव. धोकेदायक. घातक. शिवाय मग पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. म्हणून सवय व व्यसन निर्माण करणारा.
* दारू तब्येतीला चांगली असते असं दोस्त म्हणतात, ते खरंय का?
- दारूचा तत्काळ प्रभाव उत्तेजित वाटण्याचा असल्यानं शक्ती आल्याचा भास होतो. तो खरा असेल तर जास्त दारू प्याल्याने माणूस पहिलवान होईल. वस्तुत: जास्त दारू प्याल्याने मेंदूचा ताबा सुटतो, चालताना तोल जातो व शेवटी माणूस बेशुद्ध होतो. दीर्घ काळ दारू प्याल्याने 2क्क् प्रकारचे रोग होतात. स्नायू कमजोर होतात (मायोपॅथी), नसा कमजोर होतात (न्यूरोपॅथी), हृदय कमजोर होते (कार्डियो मायोपॅथी), ब्लड प्रेशर वाढतं. लिव्हरवर सूज व नंतर सिरॉसिस नावाचा असाध्य रोग होतो. दारूमुळे पोटाचे कॅन्सर दहा पटींनी वाढतात. दारुडय़ांचे आयुष्य सरासरी 15 ते 2क् वर्षांनी कमी होते. त्यामुळे दारूमुळे तब्येत सुधारते हे खोटे आहे. उलट दारू प्याल्यामुळे जगात दरवर्षी 33 लक्ष मृत्यू होतात.
* दारूमुळे पुरुषाची लैंगिक शक्ती वाढते म्हणतात, ते खरंय?
- निसर्गाने माणसाला मनात लैंगिक इच्छा दिली व ती पूर्ण करण्याची लैंगिक अवयवांमध्ये उत्तेजना दिली. दारूमुळे मनातली संयमाची बंधने सैल झाल्याने इच्छा मोकाट सुटतात. लैंगिक वासना प्रथम सैरभैर व मग बेफाम होतात. त्यामुळेच दारूच्या नशेत अनेक पुरु ष मुलींशी, स्त्रियांशी गैरवर्तन करतात. पण पुरु षाची लैंगिक संबंध करण्याची जननेंद्रियांची क्षमता मात्र दारू कमी करते. लैंगिक अवयव ढिले पडतात.