उद्या राखी पौर्णिमा. भावाबहिणीच्या नात्यात छळणारे, काचणारे आणि तरीही अपार प्रेमापोटी हवेहवेसे वाटणारे काही सिक्रेट्स.
‘त्या’ नात्यात ताण आहे,
अबोल्याचे जिव्हारी लागावेत असे बाण आहेत,
थोडा संताप, खूप सारी चिडचिड
आणि अव्यक्त अशी धुसफूस आहे!
कारण घरोघरच्या बहिणी बदलल्या आहेत.
आणि भाऊ?
ते बिचारे अजूनही भावाच्या ‘रक्षक’ भूमिकेला कवटाळून राहत
डोळ्यात तेल घालून बहिणींची काळजी घेत सुटलेत!
त्यांना वाटतं, बहिणी नाजूकसाजूक, गरीब बिचा:या,
त्यांना जालीम दुनियेपासून दूर ठेवायला हवं,
जपायला हवं!
पण बहिणी?
त्यांना नको आहेत हे स्वत:भोवतीचे पहारे.
त्या शिकताहेत, स्वत:ची जबाबदारी घेण्याइतपत सक्षम होताहेत.
ंआपल्याला बरंवाईट कळतं,
अगदी ‘खानदान की इज्जत’वाले सवाल
आणि बेरहम दुनियेचे कावेही कळतात.
मग जरा आमच्यावर विश्वास ठेवा,
जरा आम्हाला मोकळं सोडा.
सतत कशाला आमच्यामागे पहारे,
सतत नजर.
मोठेच भाऊ कशाला, लहान भाऊ, चुलत-मावस-मामेभाऊ,
मानलेले भाऊ आणि धाकटे भाऊही कायम
आपल्याला धाकात ठेवण्याचा प्रयत्न का करतात,
त्याचा त्रस होतो,
असं बहिणींचं गा:हाणं आहे.
चिडचिड आहे. संताप आहे.
मात्र तरीही.
या सा:या चिडचिडाटात,
भांडणात, धुसफुशीत
बहिणींचं भावावर,
भावांचं बहिणींवर अपार प्रेम आहे,
हक्क आहे.
एकमेकांसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे.
एकमेकांचे सिक्रेट जपण्याची,
त्यापायी आईबाबांशी पंगा घेण्याची तयारी आहे.
हे सारं आहेच.
मात्र पारंपरिक ढाच्यातले रोल काही पिच्छा सोडत नाहीत.
भावांवरचा जबाबदारीचा भार काही कमी होत नाही.
त्यामुळेच खरंतर बहिणींपेक्षा भावांची दमछाक दुहेरी आहे.
बहिणी तरी कधी स्वतंत्र होतात, कधी जुन्याच टिपीकल रोलमधे शिरतात.
पण भाऊ मात्र कायम जबाबदारीचा भार पेलत
आणि त्यापायी जरा जास्तच कठोर,
थोडा जास्तच भोचक,
जास्तच कडक होतोय.
कधी परिस्थितीमुळे, कधी समाजामुळे
आणि कधी बहिणींना धाक ठेवण्याच्या
पारंपरिक वृत्तीमुळे.
त्यामुळे घराघरांत न दिसणारे अव्यक्त काच आहेत,
त्याच्या जखमा आहेत आणि त्या जखमांवर इमोशनल मलमपट्टी आहे.
त्या मलमपट्टीच्या पोटातल्या वेदनाच
बोलक्या झाल्या आणि त्यातून
खास राखी पौर्णिमेनिमित्त
जिवाभावाच्या नात्याविषयी
बहीणभाऊ मनमोकळं बोलले.
त्या ‘आपल्याच’ गोष्टीतून
आपल्याच नात्याचा
वेध या अंकात.
आपलं प्रेमाचं, हक्काचं
आणि मायेचं नातं अधिक खुलावं,
घट्टमुट्टं व्हावं या शुभेच्छांसह !
- ऑक्सिजन टीम