- ऐश्वर्या चंद्रकांत अंबुलकरअंजनगाव सुर्जी. अमरावती जिल्ह्यातील एक तालुका. म्हणायला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध; पण तरीही सारं जेमतेमच. दहावीपर्यंत उत्तम शिक्षण झालं. त्यानंतर मात्र काहीतरी करण्याची जिद्द ठेवणारा आणि घरच्यांचं पाठबळ असणारा प्रत्येक जण शहराकडे धाव घेतो. साधारणत: मुलं अकरावी बारावीकरता अमरावती किंवा अकोला ही जवळची शहर गाठायची. त्यानंतर ज्याच्या त्याच्या गुणवत्तेप्रमाणे महानगरात दाखल व्हायचं अशी इथली पद्धत.
माझा प्रवास जरासा अपवादच.घरच्यांच्या विरोधाचं पाठिंब्यात आणि नकाराचं होकारात परिवर्तन करून माझी मोठी बहीण अकोल्याला शिकायला गेली. तिची बारावी म्हणून आई तिच्यासोबत अकोल्यात राहायला गेली. आणि त्यामागोमाग मीही गेले. तेव्हा मी आठवीत होते.माझं स्थलांतर तेव्हाच झालं.खरं तर बाबांना, गावाला आणि मैत्रिणींना सोडून नवीन अनोळखी ठिकाणी जाण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. नाइलाज म्हणून मी तिथे गेले. मात्र त्या शहराने मला आपलंसं केलं. घरी न सांगता मैत्रिणीची टू व्हीलर चालवून बघणं, एकटीने बसमधून प्रवास करणं. यासारखे आनंदाचे पहिलेवहिले क्षण मला याच शहराने दिले.अकरावी बारावीसाठी मी अमरावतीच्या बियाणी कॉलेजला प्रवेश घेतला. तो शिक्षणाचा टर्निंग पॉइंट. माझ्यासोबत असणाºया विद्यार्थ्यांची जिद्द, तळमळ, हुशारी, स्मार्टनेस बघून असं वाटलं की आपण किती लहान आहोत, किती मागास आहोत. शहरातल्या नानाविध गोष्टींच्या अस्तित्वाची मला जाणीवही नव्हती. माझ्यासारख्या विहिरीतल्या जिवाला सागराचं दर्शन झालं म्हणा ना!माझ्या आजूबाजूचे सगळेच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या गोष्टी करायचे. मला मात्र यापेक्षा काहीतरी वेगळं पलीकडच करावं असं वाटलं. थोडा अभ्यास केल्यानंतर लॉ करायचं ठरवलं.त्यासाठी पुणं गाठणंच भाग होतं. आयएलएस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि एका वेगळ्या, नवीन आणि सुंदर दुनियेत आल्यासारखं वाटलं. साध्या सिटी बसेससुद्धा मी कधी बघितल्या नव्हत्या. एकही सिग्नल नसलेल्या अंजनगावमधली मी संध्याकाळचं एफसी रोडचं ट्राफिक बघून थक्क व्हायचे. मोठमोठे मॉल्स, आलिशान जागा, बघतच राहावं अशी पर्यटनस्थळ, सगळीकडे नुसता झगमगाट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाट्टेल तसं, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य मला पुण्यानं दिलं. मला सुचेचना काय करावं, काय करू नये. पण मला चांगली माणसं भेटत गेली. काही जिवाला जीव देणारी, दुनियादारीचे अनुभव देणारी, काही कायम साथ देणारी आणि खूप काही शिकवून जाणारी.तीन वर्ष होत आली आता या शहरामध्ये पण अजूनही नावीन्य संपलं नाही. हे अनोळखी शहर मला आपलं वाटू लागलं आहे ते इथल्या माणसांमुळे. आपण शहराला मनापासून आपलं मानलं तर तेही दोन्ही हात पसरून आपलं स्वागत करतं. स्वत:मधे सामावून घेतं. आपण ज्या उद्देशानं, जे मिळवण्यासाठी इथं आलो हे लक्षात मात्र ठेवायचं. त्यानं खंबीर वाटतं. चांगल्या-वाईटाची थोडी समज येते. कुतूहल असतंच; पण त्यात वाहवून जायचं नसतं हेही आपलं आपल्यालाच कळतं.मोठ्या शहराकडे देण्यासाठी अमर्याद गोष्टी असतात. आपल्याला नेमकं काय हवंय ते ओळखायला लागतं. गावातली मुलगी म्हणून गावठी असा टॅग मलाही सुरुवातीला लावण्यात आला; पण असा विचार करणाºया, स्वत:ला सोफिस्टिकेटेड म्हणवून घेणाºया लोकांकडे मी साफ दुर्लक्ष केलं. उलट त्यांच्यातल्या सकारात्मक गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला.लहानपणापासून शहरात आणि गावात वाढलेल्या दोन व्यक्तींमध्ये आणि त्याच्या राहणीमानात फरक असणारच. या फरकाकडे उणीव म्हणून नाही तर प्रगतीची संधी म्हणून बघावं. शिखरावर कायमच जागा असते या म्हणीचा खरं अर्थ मग शहरात कळतो.मला तो पुण्यात कळला.अंजनगाव सुर्जी ते पुणे हे अंतर तसं फार नाही; पण हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे.माझ्यासारखे कित्येक लोक गावातून शहरात येतात. परदेशात जातात. स्वत:ची ओळख निर्माण करतात. ही शहरच त्यांना आपलंसं करतात.आणि तरीही मनात गावची ओढ कायम असते..गावं आपलीच असतात, शहरंही आपली होतात.(अंजनगाव सुर्जी, अमरावती)