- प्रज्ञा शिदोरेगेल्या आठवड्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘फेसबुक’वर एक खळबळजनक बातमी आली. फेसबुक, ज्यावर आपण आपली सर्व माहिती, आपलं खासगी आयुष्य अगदी खुलं करतो, अशी आपली खरं तर जी गोपनीय असायला पाहिजे, ती कोणालातरी विकतो आहे! माहितीचा अशा पद्धतीने दुरु पयोग झाला याबद्दल झुक्याभाऊंनी जाहीररीत्या माफी मागितली आहे. आहो, पण ती माफी मागितली ती आता. त्याचे शेअर्सचे भाव पडायला लागल्यावर. आत्तापर्यंत, म्हणजे गेली १४ वर्षं आपला डेटा सुरीक्षत नव्हता तर!खरं तर पहिल्यांदा ‘अरब-स्प्रिंग’च्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या प्रभावाबद्दल चर्चा सुरु झाली. त्यानंतर आॅक्युपाय वॉलस्ट्रीट, मग भारतातलं अण्णा हजारे यांचं काळ्यापैशा विरु द्धचं आंदोलन यामध्ये या समाजमाध्यमांचा वाढलेला प्रभाव दिसून आला आणि त्याचा अभ्यासही झाला. मग जगभरातल्या निवडणुका, खासकरून भारतातल्या २०१४ आणि अमेरिकेतल्या २०१६ च्या निवडणुकीमध्ये तर या समाजमाध्यमांच्या ताकदीची खात्री पटली.दूरगामी नसले तरीही पटकन परिणाम ही माध्यमे देऊ शकतात हे निश्चित झालं.२०१० साली, म्हणजे फेसबुक हे एक फिनॉमिना व्हायच्या आधी डेव्हिड क्रि कपॅट्रिक याने ‘द फेसबुक इफेक्ट’ नावाचं पुस्तक लिहिलं. डेव्हिड बरीच वर्षं प्रख्यात फोर्ब्ज मासिकामध्ये ‘तंत्रज्ञान’ या विषयाचा पाठपुरावा करणारा एक अभ्यासू पत्रकार म्हणून सर्वपरिचित होता. डेव्हिडने या पुस्तकामध्ये त्याने फेसबुक या कंपनीबद्दल, तिच्या उदयाच्या गोष्टीबद्दल खूप छान लिहिलं आहे; पण या पुस्तकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फेसबुक आणि अशाच इतर समाजमाध्यमांमुळे मानवावर कसा कसा परिणाम होतो, यावर केलेलं भाष्य.८ वर्षांपूर्वी जेव्हा हे प्रकाशित झालं तेव्हा या परिणामांबद्दल आपल्याला एवढं काही वाटलंही नसेल. मी जेव्हा हे पुस्तक २०१२ साली वाचलं, तेव्हा मला तर ही अतिशयोक्ती आणि अतिरंजक वाटलं होतं. पण आता आपण हे सगळेच परिमाण स्वत: अनुभवतो आहोत! या पुस्तकामध्ये आपलं समाजजीवन कसं बदलेल, त्याचा आपल्या मैत्रीवर, नात्यांवर, राजकारणावर कसा परिणाम होईल हे सर्व त्याने सविस्तर मांडले आहे. ते पुस्तक वाचा. तुम्हाला जर पुस्तक वाचायचा कंटाळा असेल, तर तुम्ही डेव्हिडचं त्याने ‘गुगल’या कंपनीमध्ये केलेलं भाषणही ऐकू शकता.त्यासाठी ही लिंकhttps://www.youtube.com/watch?v=pF_b4SzTUbQ
pradnya.shidore@gmail.com