- निकिता महाजन
टो रिंग सॅण्डल्स किंवा न्यूड सॅण्डल्स असे शब्द वाचले की कुणालाही वाटेल की, हा काहीतरी नवाच प्रकार असणार फॅशनचा.पण तसं काही नाही. फॅशनचं वर्तुळ असतं. फिरून फिरून तेच अनेकदा नवीन नाव घेऊन येतं. तर त्यातलाच हा एक प्रकार टो रिंग सॅण्डल्स. म्हणजे काय तर अंगठा असलेली सॅण्डल.आता यात नवीन काय? तर नवीन असं की नुकतंच कान्सच्या रेड कार्पेटवर अनेकजणी या टो रिंग हाय हिल्स घालून मिरवल्या. आपल्या लग्नात मेगन मर्केल कसे सॅण्डल्स घालणार याविषयी तिकडे ब्रिटिश वर्तमानपत्रांनी रकानेच्या रकाने छापले. मात्र हा मामला तसा जुनाच. मात्र सध्या चर्चेत आहे तो टो रिंग घालण्याच्या नव्या फॅशनमुळे. पायांत बायका जोडवी घालतात ते जुनं झालं आता पायाच्या अंगठ्यात जोडवीकम अंगठी घालण्याची फॅशन आहे. त्यामुळे त्या अंगठ्याभोवतीच्या चपलेलाच सजवून टो रिंगचा आकार दिला जातो आहे, बाकी सॅण्डल तशीच.त्यात आताशा न्यूड सण्डल्सचीही फॅशन आहे. हे न्यूड सॅण्डल या टो रिंगचीच बहीण. कान्समध्ये ऐश्वर्या, सोनम, दीपिका हे सॅण्डल्स घालून मिरवल्या. सिनेमाच्या प्रमोशनला आलियाभटनेही न्यूड सॅण्डल्स वापरलेले दिसतात. त्यामुळे सध्या त्यांचीही फॅशन आहे. म्हणजे काय तर सण्डलसारखी सॅण्डल मात्र पायाभोवती फक्त एक किंवा दोन दोर दिसतात. बाकी पाय उघडे.मुद्दा असा की, आपके पाव बहुत हसीन है असं म्हणण्यासाठी नवनव्या सॅण्डल्सच्या फॅशन येत आहेत..नावावरून त्यात नवीन वाटतं, प्रत्यक्षात नवीन काही असतं का हे ज्यानं त्यानं तपासून घ्यायचं..