- अनादि अनंत
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
कंदील बलोच, सानिया मिर्झा, जेनिफर अॅनिस्टन आणि मी.
काय फरक किंवा साम्य आहे आमच्यात?
आम्ही चौघी बायका आहोत हे साम्य आणि या चौघींपैकी शेवटच्या तिघीजणी अजूनही जिवंत आहेत आणि नजीकच्या भविष्यात त्यांना कोणी मारायला येणार नाही हा सर्वात मोठा फरक आहे. पावटेगिरी (म्हणजे ज्याला हल्लीच्या मॉर्डन भाषेत पाउट करून फोटो काढणं आणि तो फेसबुकवर शेअर करणं) केली म्हणून कोणी माझा गळा दाबणार नाही. आणि गळा दाबून मारलं तरी लोक म्हणणार नाहीत की, बरं झालं नाहीतरी ती समाजावर कलंक होती.
नाही, मलाही नाही वाटत की चित्रविचित्र फोटो आणि सेल्फी काढणाऱ्या नी ते सतत कुठंतरी पोस्टणाऱ्या कुणाचा जाहीर सत्कारबित्कार करावा. मात्र कुणी असं करत असेल तर त्यांना हाण की बदड करावं किंवा थेट गळा दाबून सरळ मारून टाकाव असलं काही कुणाच्या डोक्यात कसं काय येत असेल? कल्पनेच्या पलीकडचं आहे हे..
पण हे सारं आणि अजून बरंच काही जाहीरपणे केलं-बोललं म्हणून पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोचला तिच्या भावानंच मारून टाकलं. बलोच पाकिस्तानची किम कर्दाशिअन होती. स्वत:ला फार थोर समजणं, लोकांनी थट्टा केली तरी ते स्वत:चं कौतुक समजणं आणि स्वत:च्या कोशात, स्वप्रेमात अडकून पडणं ही साधारणत: या नव्या प्रजातीची लक्षणं आहेत. बलोच त्यातलीच एक होती. पण तिच्यासारख्या अशा सेल्फी क्वीन, स्वयंघोषित सेलिब्रिटी आपल्याकडेही दिसतात. पण म्हणून त्यांचा कुणी गळा धरायला जात नाही. फरक इतकाच की बलोच पाकिस्तानची होती. फेसबुकी चाळे हे फक्त फेसबुकपर्यंत मर्यादित असतात, त्यांचं खऱ्या आयुष्यात काही विशेष स्थान नसतं हे तिथं अनेकांना अजून कळायचंय, त्यासाठी अजून काही वर्षे तरी जावी लागतील! (आपल्यालाही कुठे नीट कळलंय म्हणा.)
लोक (म्हणजे पाकिस्तान सोडून इतर देशातले) म्हणतात की गट्स होते कंदीलमध्ये. फेमिनिस्ट होती ती.
पण खरंच ती स्त्रीवादी होती का?
तर तसंही नाही, मला नाही वाटत तसं. तिने आजतागायत कुठल्याही स्त्रीसाठी आवाज उठवला नाही. फक्त फेमस होणं हे जिच्या आयुष्याचं ध्येय होतं ती स्त्रीवादी, स्वतंत्रतावादी वगैरे वगैरे कशी असू शकते? तसं असेल तर आपल्याकडच्या पूनम पांडे, पूजा मिश्रा, संभावना सेठ आणि अगदी राखी सावंतसुद्धा फेमिनिस्ट का असू नयेत?
उत्तर परत तेच, पाकिस्तान ! म्हणतात ना, काय केलं यापेक्षा कुठे केलं आणि कुणी केलं यावर ठरतं काही गोष्टींचं महत्त्व. कंदीलच्या बाबतीत अशी दुर्दैवी गोष्ट घडली आणि तिच्या प्रसिद्धीवेड्या बडबडीलाही स्त्रीवादी विशेषणं चिकटली. मात्र ज्या देशात हिजाब घेऊन शाळेत जाणाऱ्या लहानग्या मलालाला पण डोक्यात गोळी खावी लागते तिथं सेक्सी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करणाऱ्या कंदीलचा गळा आवळला जाणं हे काय सांगतं?
गोष्टींचा असा सापेक्ष विचार केला की वास्तव जास्त छळू लागतं. आणि इथं प्रश्न फक्त घडणाऱ्या गोष्टींचा नाहीये, जे घडतं त्याला आपण कसं रिअॅक्ट करतो, कशी प्रतिक्रिया देतो याचाही आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सानिया मिर्झाला पाकिस्तानची सून म्हणून इकडे भारतीयांनी आणि शॉर्ट स्कर्ट घालते म्हणून तिकडे तिच्या सासरच्यांनी, पाकिस्तानी लोकांनी काय कमी छळलं? आणि परवा एका मुलाखतीत तिनं बाणेदार उत्तर दिलं तर लगेच भारताची शान, स्वतंत्र वृत्तीची बाणेदार स्त्री, स्त्रीमनाचा हुंकार असं म्हणत माध्यमांसह लोकांनी तिचं इतकं कौतुक केलं की तोंडात तीळ भिजला नाही. अगदी महास्टार असली तरी जेनिफर अॅनिस्टन तरी कुठे सुटली या वाचाळांच्या तावडीतून. तिलाही सांगावं लागलंच लोकांना की माझं लग्न, माझं बाळंतपण, माझं आयुष्य हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यात काही नवं घडलंच तर मीच सांगीन तुम्हाला. तोपर्यंत तोंड गप्प ठेवा किंवा चालायला लागा, आय सिम्पली डोण्ट केअर !
आता राहिले मी. मागे दिल्लीला गेले होते. तिथे जंतर मंतरच्या चौकात एक मोठा बिलबोर्ड पाहिला. चालणं, पळणं नंतर दुचाकी चालवणं या वाढीच्या पायऱ्या चढत गेलेली मी. कोणी क्लास लावून वगैरे दुचाकी शिकतं, त्या क्लासची भरपूर पैसे खर्चून जाहिरात करतं आणि त्यातही गाडी चालवा, स्वतंत्र व्हा वगैरे म्हणतं हे परत माझ्या आकलनाच्या पलीकडंच. गाडी चालवता येणं हे तुमच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे हे देशाच्या राजधानीत सांगावं लागतं? पण असेल तसंही. कारण दिल्लीच्या रस्त्यांवर आपल्यासारख्या साग्रसंगीत कट मारणाऱ्या, पेप आणि अॅक्टिवा ८० च्या स्पीडनं चालवणाऱ्या मुली दिसल्या नाही हेही खरं! आपण वाण्याकडे भांड्याचा साबण आणायला जातो तेव्हाही गाडी काढतो आणि त्यात आपलं स्वातंत्र्य वगैरे काही नसतं, फक्त आळस असतो चालण्याचा हे आपल्या मनात येत नाही इतकं ते सहज घडतं.
म्हणजे समानता आणि स्वातंत्र्य आज जे आहे त्याच्याही अजून बरंच पुढे जायचं आहे हे नक्की! पण मग निदान आपल्याला जे मिळालं आहे, जिथे आपण पोचलो आहोत, जे मिळवलं आहे ते क्षणभर आनंदानं स्वीकारलं ना तरी बरं वाटावं! कारण जे आपल्याकडे आहे तेही जगात अनेकींकडे नाही, याची बोच अस्वस्थ करत असताना, आपल्याकडे तुलनेनं बरंच काही बरं आहे, याचा आनंदही मान्य केला तर बरंच वाटेल जिवाला!