-दीपक कुलकर्णी
पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत कुणी गावी जाऊन शेती करण्याचा विचार केला तर त्याला लोक नक्कीच वेडे ठरवतील; पण त्याने ठाम निश्चय केला. अनेकांचा विरोध पत्करून तो गावी परतला. त्याला शेतीच करायची होती. नवनवीन प्रयोगाविषयी माहिती घेत त्यानं आपल्या अडीच एकराच्या शेतीत अंजिराचं पीक घेण्याचं ठरवलं. आता बघता बघता तो अडीच कोटीपर्यंत उलाढाल करतो आहे.
दौंड तालुक्यातील खोर येथील डोंबेवाडीचा हा तरुण. समीर डोंबे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानं चारचौघांसारखा नोकरीचा रस्ता धरला. आठ वर्षांपूर्वी तब्बल ४० हजार महिना मिळवत सुरुवातदेखील जबरदस्त झाली; पण समीरला वाटत होतं की, आपण शेतीच करायला हवी. कुटुंब मित्र यांचा विरोध स्वीकारत त्यानं २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठलं. नवनवीन अभिनव प्रयोगांमार्फत त्यानं अंजिराची शेती फुलवली. उत्पादन करूनच न थांबता वितरण आणि विक्रीतदेखील सहभागी होत व्यवसायाची नवी पद्धत अवलंबली. बाजारपेठेऐवजी थेट विक्रीला प्राधान्य दिलं.
समीर सांगतो, मी पुण्यातील नोकरी सोडली, तेव्हा सारे म्हणाले की, काय खूळ डोक्यात घेऊन बसला आहे. शेतीतून कुणाचं भलं झालं आहे का? शेती करणाऱ्या मुलाला कुणी मुलगी देत नाही, तुझं लग्न कसं होणार? पण मी ठरवलं आपण शेतीत काम करू, तेच आपलं उत्तर. तसं आमच्या शेतीत आजोबांपासून अंजिराची लागवड व्हायची; पण ते बाजारपेठांमध्ये तुटपुंज्या किमतीत विकून मोकळे होत असत. मी हा दृष्टिकोन बदलत अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत अंजिराचे पीक घेत आणि आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना आखली. स्वतःचा ''पवित्रक'' नावाचा एक ब्रॅण्ड रजिस्टर करून घेतला. आकर्षक पॅकिंगसह अंजीर बाजारात विक्रीला आणले. विक्रीसाठी मोठमोठ्या कंपनींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. हळूहळू मग रिलायन्स, बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये आमचे प्रॉडक्ट विक्रीस सुरुवात केली. आम्ही अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणेदेखील सुरू केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तरुण पिढीने जर स्वतःच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग जर आपल्या परंपरागत कृषी व्यवसायासाठी केला तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.’
समीर आता गावच्या इतर शेतकऱ्यांसोबतही मिळून नव्या प्रकल्पाची तयारी करत आहे.
--------------------------------------------------------------
ॲग्रिकल्चरची मुलं आणि स्पर्धा परीक्षांचा चक्रव्यूह
ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या घेऊन पुढे एमपीएससी आणि यूपीएससीच्या चक्रव्यूहात अडकलेले मला अनेक जण दिसतात. वर्षानुवर्षे परीक्षांच्या तयारीसाठी खर्ची करतात. यातून काही जणांना यशदेखील मिळते; पण त्यापैकी मोठ्या संख्येचा तरुण वर्ग हा उमेदीचा काळ गमावून बसतो. ॲग्रिकल्चरची डिग्री घेतलेल्या तरुणांनी शेतीत उत्तम काम करावं. शेतीला स्कोप नाही कसा,जोवर मानव जात जिवंत आहे तोपर्यंत शेती व्यवसायाला भीती नाही. शेतीत स्कोप आहे, फक्त आपण कल्पकपणे काम करायला हवं, असं समीर सांगतो.
(दीपक लोकमत ऑनलाइनमध्ये उप-संपादक म्हणून कार्यरत आहेत.)
kulkarnideepak4888@gmail.com