सत्यजित भटकळ
1) आजच्या काळात, स्वातंत्र्य म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर? तुमची व्याख्या काय स्वातंत्र्याची.
- जन्मलेल्या हरेकाला स्वातंत्र्याची गरज असते, स्वातंत्र्य नसेल तर ते मिळवण्याची इच्छा असते. स्वातंत्र्य मिळालं तरी ते एक आव्हान घेऊन येतं. कारण त्यांची जबाबदारी पेलणंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे स्वातंत्र्य ही एक संधी, जबाबदारी आणि आव्हानही असतं. हे अगदी वयाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना लागू आहे. जगणं रोजच आपल्यापुढे नवी आव्हानं घेऊन येत असतं. सहा महिन्यांपूर्वी कुणी विचार केला असता, की कोरोना नावाचं संकट सगळ्या मानवजातीवर कोसळेल? त्यामुळं स्वातंत्र्य गृहीत धरूनही चालत नाही. अजून एक मला असं वाटतं, की जगताना आपलं पोटेन्शियल पूर्णत: वापरण्याची, वाढवण्याची संधी हरेकाला मिळणं म्हणजे स्वातंत्र्य. आपल्यात अनेक प्रकारच्या शक्यता दडलेल्या असतात. ऊर्जा असते. मनासारखं काम मिळायला हवं असतं. कामातून फक्त पैसे नव्हे तर आनंदही हवा असतो. मनासारखे मित्र-सोबती पाहिजे असतात. हे सगळं मिळालं तरच ते स्वातंत्र्य हरेक क्षणी सेलिब्रेट करता येतं.आपल्या देशात स्वातंत्र्य ही संकल्पना सर्वात सुंदर कुणी मांडली असेल, तर ती रवींद्रनाथ टागोर यांनी. त्यांची कविता, where the mind is without fear and the head is held high.या कवितेत ते आलंय. मला वाटतं, त्यात सर्व गोष्टी आल्यात. भयापासून मुक्त असलं पाहिजे. आणि ते जितकं महत्त्वाचं, तितकंच आपापल्या अरुंद, चिंचोळ्या मनांच्या बेडय़ांपासूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. सत्यमेव जयतेच्या पहिल्या सीझनच्या शेवटी आम्ही या कवितेचं अभिवाचन केलं होतं. मराठीत ज्ञानेश्वरांनीही पसायदान लिहून सर्व मानवांसाठी असंच काहीसं मागितलंय. सर्व प्रकारच्या संकुचितपणातून मोकळं व्हायला ते सांगत होते. मनाने, हृदयाने मोठे व्हा. हा या दोन कवी माणसांचा संदेश कोरोनाच्या काळात तर अजूनच मोलाचा झालाय. एकमेकांना हात देऊनच आपण जगू शकतो.
2) मला समाजासाठी काहीतरी करायचंय, मला मनापासून वाटतं की समाजात काम करावं असं अनेक तरुण म्हणतात; पण समाजासाठी काहीतरी म्हणजे नेमकं काय हे कसं शोधायचं?
- मलाही असे अनेक तरु ण भेटतात. मी त्यांना सांगतो, हरेकाला हे काहीतरी करण्याची संधी रोज उपलब्ध असते. त्यासाठी हरेकाने घरदार सोडून अगदी वाळवंटात, जंगलात जाऊन राहावं असं नसतं. अनेकदा आपल्याला समाजासाठी काहीतरी करताना हे आवश्यक आहे असं वाटतं.पण रोजच्या जगण्यात आपण काहीतरी करू शकतो. उदाहरण सांगायचं तर, अपघातात सापडलेल्या किंवा अगदी रस्त्यावर गाडीवरून पडलेल्या माणसाला हात देऊन उठवणं, त्याच्या उपचारांची सोय करणं. आम्ही सत्यमेव जयतेमध्ये रोड अॅक्सिडेन्ट्सवर एक एपिसोड केला होता. त्यावेळी रिसर्च करताना लक्षात आलेलं, की यात मरणा:या बहुतांश लोकांचे मृत्यू हे प्रिव्हेंटेबल डेथ असतात. म्हणजे तासाभरात हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले असते, तर ही माणसं वाचू शकली असती. पण एकतर पोलिसांची अनाठायी भीती किंवा जखमींचे फक्त व्हिडिओ काढत बसण्याची विकृत सवय या गोष्टी होताना दिसतात. आज जगताना सर्वात जास्त कशाची गरज असेल, तर सहवेदना, करु णा. आपल्या भवतालचं जे छोटंसं वर्तुळ आहे तेवढीही करु णा पुरे. समाजसेवेचं मोठं काम उभारणारीही माणसं आहेत. पण ते हरेकालाच शक्य नसतं. वेळ, संसाधनं, परिस्थिती यांचा मेळ बसत नाही. जिथे आहात तिथल्या लोकांना हात द्या. हेच सोपं सूत्र!
3) या करुणोतून तुम्हाला पानी फाउण्डेशनची वाट सापडली असं वाटतं?
- सत्यमेव जयते करताना खरं तर ही वाट सापडली. आम्हाला लक्षात आलं, की लोक केवळ शो बघत नाहीत, तर त्या शोमध्ये सुचवलेल्या गोष्टींवर लोकं काम करत होती. याचा तपशील आमच्या टीममधल्या खूप कमी जणांना माहिती आहे. मग आम्ही विचार केला, की संवादाच्या क्षेत्रत काम करणारे लोक म्हणून आपण अजून एक पाऊल पुढे टाकूयात. आपल्याजवळ जे संवादाचं कौशल्य आहे ते वापरून आपण समाजासाठी काही करू शकतो का? आज निसर्गाचं जे संकट आलेलं आहे, त्याचे पाणी, माती, शेतीच्या क्षेत्रत पडसाद दिसतात. यासंदर्भाने काम केलं तर समाजासाठी काहीतरी विधायक केल्यासारखं होईल, असा आम्ही विचार केला. त्यातून पानी फाउण्डेशनची सुरुवात झाली. ही एक लोकचळवळ आहे. अगदी टिपिकल एनजीओ नाही.या कामात उतरल्यावर आम्हाला जाणवलं, लोकांची निर्मितीक्षमता असीम आहे. ती जागवली, तर लोकच त्यांच्या आयुष्यात बदल घडवतील. आम्ही फक्त त्यांना प्रवृत्त करण्याचं काम केलं. गावातलेही अनेक बेरोजगार तरु णही आमच्यासोबत आले. त्यांच्या आयुष्यातही त्यातून अनेक विधायक बदल झाले. पुढे नोकरीधंदा शोधायला, त्यात जम बसवायला त्यांना या कामातून मिळवलेल्या कौशल्यांची मदत झाली.गावात माणसं अजूनही एकमेकांवर कुठल्याही हेतूविना प्रेम करतात. भरभरून पाहुणचार करतात. खिशातले पैसेच काय, अगदी स्वत:ची जमीनही देतात. लहान-लहान गावं शहरांना खूप काही शिकवू शकतात. मुख्यत: हे, की जिथे निसर्ग समृद्ध राहतो तिथे माणूस समृद्ध होतो. निसर्ग भकास झाला की माणूसही फाटका बनतो. हे सत्य आता सगळ्यांनीच मनावर कोरण्याची गरज आहे.
4) गावोगावी तुम्हाला तरुण मुलं भेटली, तुमच्या कामात सहभागी झाली, शहरी तारुण्यही श्रमदानाला मोठय़ा प्रमाणात आलं, कसं दिसतं तुम्हाला हे तारुण्य.- आजचा तरु ण आमच्या पिढीहून खरोखर खूप चांगला आहे. त्यांच्यापुढची नवी आव्हानं गुणात्मक पद्धतीने वेगळी आहेत. ती आव्हानं ही पिढी कौशल्यानं पेलतानाही दिसते. आपण आजवर निसर्गाला भयानक डिवचलंय. तो कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी कोरोनाच्या रूपात येतोय. नव्या पिढीने निसर्गाबाबत संवेदनशील, प्रेमळ असलं पाहिजे. दुर्दैवाने मागच्या पिढय़ांनी या पिढीसाठी जे जग मागे सोडलंय, ते फार काही चांगलं नाहीय. मात्र या जगाला जरा अधिक राहण्यायोग्य, चांगलं, समृद्ध करणं हे तरुण पिढीच्या हाती आहे.
(प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पानी फाउण्डेशनचे सीईओ)
मुलाखत आणि शब्दांकन-शर्मिष्ठा भोसले