माझं अभ्यासात लक्षच लागायचं नाही. मी करायचो नाही असं नाही, पण मला जमायचं नाही, का जमायचं नाही, हे काही कळायचंही नाही.
मुळात अभ्यास कसा करायचा? हेच माझ्या लक्षात येत नसे. प्रत्येक गोष्टीमागे एक विशिष्ट तत्त्व असतं, ते काय आहे? नेमक्या गोष्टी घडतात कशा, आपण अभ्यास कसा करायचा, कसा लक्षात ठेवायचा, हेच मला कळायचं नाही.
त्यामुळे मी असंच म्हणतो की, मी अभ्यास करायचोच नाही असं नाही करायचो, पण जमायचं नाही. त्यात माझं चित्त एकाजागी लागत नसे, मी फार काळ लक्ष एकवटू शकायचो नाही.
पण मला ‘कुकिंग’ आवडायचं. स्वयंपाक करायला मनापासून आवडायचं. माङया आई-बाबांनीच मग मला एकदा विचारलं की, ‘तुला कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुला शेफ बनायला आवडेल का?’
मी तयारच होतो. शाळेत न जाता मी दहावीची परीक्षा बाहेरून दिली. सत्तर टक्केच्या आसपास मार्क पडतील अशी आशा होती. पण मिळाले फक्त 58 टक्के!
अकरावीला नेहमीच्या शाखांना प्रवेश न घेता मुंबईत रहेजा कॉलेजात फिल्म अॅण्ड टीव्ही डिप्लोमाला प्रवेश घेतला. पुढे फूड मीडियात काम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असं वाटलं होतं. पण तिथला अभ्यासही सोपा नव्हता. मी दहावीर्पयत मराठी माध्यमात शिकलो होतो.
नंतर इंग्रजी माध्यम. त्याचा सराव व्हायला वेळ लागला. थोडं अवघड वाटत होतं पण जमलं. कारण मूळ विषय माङया आवडीचा होता. पुढे मी अंधेरीच्या कॉलेजात प्रवेश घेतला. कुकिंगशी संबंधित तो अभ्यासक्रम होता. लंडनच्या एका कॉलेजशी संलग्न असलेली ही डिग्री.
तिथं मला एक फरक जाणवला, इतके दिवस जे शिकवतात ते मी आवडून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आता मला जे आवडतं ते मी मनापासून शिकत होतो. मनापासून स्वयंपाक या कलेत रमत होतो.
एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही मी काम केलं तिथं मला बेस्ट शेफचा अवॉर्ड मिळाला, मास्टरशेफच्या टीममध्येही मी काम केलं.
दहावीनंतर इथवरचा माझा हा प्रवास, त्या प्रवासात मी माङया आवडीचं शिकलो म्हणून मला आत्मविश्वास मिळाला. अजूनही कधी कधी दहावीचं मार्कशिट पाहिल्यावर वाईट वाटतं. अजून जास्त मिळाले असते तर मला आनंदच वाटला असता. पण हेदेखील मला पटतं की, फक्त मार्कावर काही अवलंबून नसतं.
ज्याला काहीतरी वेगळं करायचं, वेगळी वाट शोधायची, त्याला त्याचा विषय आवडला पाहिजे, नुसत्या मार्काचा तिथं काही उपयोग नसतो.
आता माझं ग्रॅज्युएशन संपलं. पुढच्या शिक्षणासाठी मी कॅनडाला जायचा विचार करतो आहे. मला एवढंच कळतं की, जो विषय आपल्याला आवडतो त्या विषयात, त्या उद्योगात पूर्ण घुसता आलं पाहिजे. आपली पूर्ण ताकद लावून तिथं काम केलं पाहिजे. त्यामुळे मी तर एकच मानतो की, जे काही आवडतं ते बिनधास्त करायचं आणि बेस्ट करायचं.
सध्या मी तरी त्याच दिशेनं प्रवास करतो आहे!
- दीक् मधू अरविंद