फुलांचे बुके तर कुणीही देतं, फळांचा बुके पाहिलाय तुम्ही कधी? आता ही एक नवी कन्सेप्ट मार्केटमध्ये आली आहे. ‘फूट्र बुके’. फळांचे बुके तयार करायचे आणि ते भेट द्यायचे. त्यासाठीचे खास ‘बुटिक’ही आता आपल्याकडे तयार होताहेत.
‘बुटिक’ म्हणजे काय?.
कपड्यांचं असतं तसंच हे फ्रूट बुटिक. तिथं हे फळांचे बुके बनवून मिळतात. अत्यंत वेगळी आणि हटके असलेली ही आयडिया. आपल्या भावनांनाही ‘गोडवा’ देण्याचं, शब्दांशिवाय संवाद साधण्याचं काम करणारे हे फ्रूट बुके.
‘आयडिया’चा पैसा
‘फ्रूट बुके’ची कन्सेप्ट तशी भारतात अगदी नवीन. भारतात सर्वात पहिल्यांदा ती पॉप्युलर करण्याचा प्रयत्न केला, पण ही कन्सेप्ट माझी नाही. एका अमेरिकन कंपनीची ही कन्सेप्ट माझ्या पाहण्यात आली आणि मला ती भिडलीच. त्यावेळी मी दुबईत होतो. एक मल्टिनॅशनल बॅँकेत मार्केटिंग ऑफिसर म्हणून मी काम करत होतो. ‘फूट्र बुके’ची आयडिया मला इतकी पसंत पडली की, आपणच हे भारतात का सुरू करू नये या विचारानं मला पछाडलं. आपल्याकडचे सण-समारंभ, वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक आणि गिफ्टची रुजलेली संकल्पना. भारतात आपलं ‘प्रॉडक्ट’ नक्कीच चालेल याची खात्रीच मला पटली. दुबईतली भल्यामोठय़ा पगाराची नोकरी मी सोडली आणि भारतात परत आलो. माझी ही आयडिया माझा मित्र सुफियान सिद्दीकीनंही उचलून धरली आणि साडेतीन वर्षांपूर्वी २0१0मध्ये भारतातलं पहिलं ‘फ्रूट बुके’ आम्ही मुंबईत सुरू केलं. अर्थात त्यासाठी फार कष्टही घ्यावे लागले. फळं हा एकतर आधीच नाशवंत माल. त्यात आम्ही तो कापून, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये देत असल्यानं त्याचं आयुष्य आणखीच कमी होणार.
‘फळांची परडी सजवून ती विकायची’. वरवर हे सोपं वाटत असलं तरी तसं ते नाही. फळं डिझाईनमध्ये कापण्यासाठी लागणारी उपकरणं भारतात तयार होतच नव्हती. त्यासाठी मी स्वत:च ती तयार करायला सुरुवात केली. फळं हायजीन कशी राहतील यासाठीचं प्रशिक्षण घेण्यासाठी खास अमेरिकेतून ट्रेनर मागवला. फळांवर धुळीचा कणही बसणार नाही अशा ‘हायजीन’ पद्धतीनं सारी प्रक्रिया शिस्तबद्ध केली. एसी रूममध्येच हे सारं काम चालतं, एसी गाडीतूनच त्याची डिलिव्हरी दिली जाते आणि तीही अगोदर ‘ऑर्डर’ घेतल्यानंतरच. शिवाय कस्टमाईज पद्धतीनं आम्ही हा बुके सजवतो. कोणाला त्यावर नाव हवं असतं, कोणाला नंबर, कोणाला हार्ट, तर कोणाला आणखी काही. त्याच्या आवडीप्रमाणे आणि मागणीप्रमाणे ही ऑर्डर आम्ही पुरवतो.
. हे एवढं तरी हवंच.
१) लहान-मोठय़ा शहरांतही ही आयडिया तरुणांना उचलता येईल, पण त्यासाठीचं ट्रेनिंग मात्र घ्यायलाच हवं.
२) ऑनलाइन स्टडी करून, घरी त्याची प्रॅक्टिस करून आणि स्वत:ची क्रिएटिव्हिटी वापरून कोणालाही ही आयडिया विकता येईल आणि स्वयंपूर्ण होता येईल.
३) त्यासाठी आपला भेजा क्रिएटिव्ह हवा आणि नवीन वाटेवर चालण्याची धमकही हवीच.
रेझा काझीरुनी, (संचालक, फ्रूटिलिशिअस)