मुक्ता चैतन्य
भारत सरकारने टिकटॉक आणि पबजीवर बंदी घातली. चायनीज अॅप्स बंद करण्याच्या राजकीय निर्णयात पहिल्या टप्प्यात 59 तर दुसर्या टप्प्यात 118 अॅप्सवर बंदी घालण्यात आली. पबजीसारखा अतिशय अॅडिक्टिव्ह गेम बंद झाल्यावर अनेकांनी हुश्शही केलं. आता लहान आणि तरुण मुलं गेमिंगच्या विळख्यातून बाहेर पडतील असं पालकांसह अनेकांना वाटलंही; पण पबजी बंद होत नाही तोच अक्षय कुमारने फौजी नावाचा जवळपास पबजीसारखाच गेम लॉन्च करत असल्याचं जाहीर केलं. त्याआधी मुकेश अंबानी यांनी भारतातलं डिजिटल भविष्य गेमिंगमध्ये आहे असं वक्तव्य केलं. या सगळ्या पाश्र्वभूमीवर देशाच्या कानाकोपर्यात वाढलेल्या गेमिंग इंडस्ट्रीचा जरा अंदाज घ्यायला हवा.तरुण मुलांचा गेम होतोय का, गेमिंगची चटक लागते त्यानंतर तरुण हात रिकामे होत या खेळांचे व्यसनी होत जातात का?-शोधायला हवं.साधारण बारा वर्षापूर्वी मी पहिल्यांदा व्हिडिओ गेमिंग या प्रकाराचा अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा हातातल्या मोबाइलमध्ये गेमिंगचं जग व्यापलेलं नव्हतं. व्हिडिओ गेमिंग पार्लर्स नावाचं एक मोठं जाळं तेव्हा गल्लीबोळात पसरलेलं दिसायचं. जसं जसं स्मार्टफोन्सचं प्रस्थ वाढलं तसं तसं गेमिंग पार्लर्स कमी कमी होऊ लागले आणि गेमिंग मोबाइलमध्ये येऊन स्थिरावलं. 2019 मध्ये भारतातली गेमिंग इंडस्ट्री वाढून 6500 कोटी रुपयांची झाली होती ती 2022 र्पयत 18,700 कोटींची असेल असा अंदाज त्यावेळी म्हणजे 2019 मध्ये वर्तवण्यात येत होता. त्यानंतर कोरोना आला आणि जगभरातल्या माणसांचा डिजिटल वावर वाढला. गेमिंग इंडस्ट्रीत बूम आलं. त्यामुळे अर्थातच 2019 मध्ये वर्तवण्यात आलेला हा अंदाज आता बदलेल.
मुळात पबजी बंद झाल्यामुळे गेमिंगमध्ये अडकलेले एकदम सगळं सोडून प्रचंड क्रिएटिव्ह, कलात्मक, विधायक काहीतरी करायला लागतील वगैरे आशावाद जर कुणाच्या मनात असेल तर तसं काही होणार नाही हे नक्की. हा नाही तर तो म्हणत असंख्य गेम्स खेळणार्यांसाठी उपलब्ध असतात. सतत नवेनवे गेम्स येत असतात. त्यातून काही तरुण मुलांमध्ये लोकप्रियही होतात. अगदी महानगरांपासून ते खेडेगावार्पयत कुठेही बघा, गेमिंग करणारी तरुण मुलं सहज दिसतात. गेम खेळत असतात, कुठं तरी बसलेलं टोळकंही आपल्याच मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेलं दिसतं. त्यात ग्रामीण-शहरी असाही भेद आता फारसा उरलेला नाही.
भारतात गेमिंग इंडस्ट्री झपाटय़ाने वाढण्याची काही कारणं.1. स्वस्त डेटा, स्मार्टफोनची सहज आणि स्वस्त उपलब्धता आणि तरुणांच्या हाती प्रचंड वेळ या गोष्टी गेमिंग इंडस्ट्रीचा पसारा वेगाने वाढवतात.2. भारत हे तरु ण मार्केट आहे. जवळपास 75 टक्के लोकसंख्या 45 वर्ष वयोगटाच्या आतली आहे आणि त्यातही 18 ते 24 या वयोगटातल्यांची संख्या मोठी आहे, जो गेमिंगचा प्रमुख टार्गेट ग्राहक असतो. 3. भारतात इंटरनेट यूझर्सची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. ती येत्या काळात 65 कोटींर्पयत जाईल अशी शक्यता आहे.4. कालर्पयत स्मार्टफोन हे फोन करण्याचं आणि संपर्काचं माध्यम होतं. गेमिंग, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे दुय्यम किंवा अधिकच्या सुविधा होत्या. ही परिस्थिती हळूहळू बदलताना दिसतेय. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना त्यावर गेमिंग चांगल्या प्रकारे खेळता येईल ना, हे बघूनच खरेदी होते. 5. कालर्पयत गेम्स बहुदा बाहेरच्या देशात बनलेले आणि त्याच पद्धतीचे असायचे; पण आता भारतीय मानसिकतेला लक्षात घेऊन गेम्स बनवायला सुरुवात झालेली आहे. रमी आणि तीन पत्तीसारखे गेम्स त्याचंच उदाहरण आहे. 6) गेमिंगमध्ये पॉर्न आणि स्पोर्ट्स या दोन गोष्टीही मोठय़ा प्रमाणावर उतरल्या आहेत. ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर तरु णाई गेमिंगकडे ओढली जाते. 7) 2010 मध्ये गेम्स तयार करणार्या कंपन्यांची संख्या 35 होती. 2019 मध्ये ती 275 वर गेलेली आहे. दिवसेंदिवस गेमिंग कंपन्यांमधली गुंतवणूक वाढते आहे, याचा अर्थ मार्केटही वाढतंय किंवा ते वाढावं यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 8) अनेक गेम्स मोफत असतात, फुकट ते पौष्टिक त्यामुळे फुकट असलेले गेम्स खेळण्याकडेही वाढता कल आहे. 9) त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंट्स करणार्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे माफक दारातले गेम्स विकत घेणं किंवा गेम्समधल्या गोष्टींसाठी पैसे खर्च करणंही आता हळूहळू सोपं होत जाणार आहे. 10) वास्तवापासून दूर जाण्यासाठी माणसं गेमिंग करतात. अशावेळी बेरोजगारी, आजूबाजूला असलेला बकालपणा, मानसिक ताण जसा वाढत जाणार तसतसं गेमिंगचं प्रमाणही वाढणार, असंही या विषयात काम करणार्या तज्ज्ञांना वाटतं. 11) आपल्याला वाटतंय त्यापेक्षा गेमिंग इंडस्ट्रीचं जाळं खूप जास्त वेगाने पसरत चाललं आहे. फक्त जगाचचं लक्ष भारताच्या या तरुण बाजारपेठेवर आहे असं नाही, भारतात उभ्या राहणार्या गेमिंग कंपन्यांचंही लक्ष आहेच.
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)