- इंदुमती गणेश
मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे नुसती धम्माल, देखाव्याचे नियोजन, तालमी, मांडव उभारणी, विद्युत रोशणाई, मिरवणुकांचे वेगळेपण, हटके स्टाईलने बाप्पांचे आगमन आणि विसर्जन... मोठ्या आवाजीचे साऊंड सिस्टिम आणि त्यावर बेभान होऊन नाचणारी तरुणाई असेच चित्र डोळ्यांसमोर येते.. पण यंदा कोल्हापुरातच काय कोणत्याही शहरात हे चित्र नसेल. कारण, याची जागा घेतली आहे ती विधायक उपक्रमांनी. मंडळातली पोरं नुसती टगी असतात अशा काजळी चढलेल्या मानसिकतेलाही आपला चष्मा बदलायला लावणारी ही तरुणाई गणेशोत्सवाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत व कोरोनाकाळात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी पुढे आली आहे. महापूर, कोरोना, पुन्हा महापूर, पुन्हा कोरोना.. या चक्रात आलेली नकारात्मकता झटकत वर्गणी, शो, दिखावा, धांगडधिंगा, मंडळांमधील ईर्षा, भपकेबाजपणा सगळ्याला मूठमाती देत फक्त मदत आणि आरोग्यदायी समाजाचा वसा घेऊन ही मंडळी गणेशोत्सव साजरा करत आहेत.
गणेशोत्सव म्हणजे मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी मॅनेजमेंट गुरू.. एरवी घरात स्वत: प्यायलेला चहाचा कपही विसळून न ठेवणारी, घरकामात मदत करायला टाळाटाळ करणारी पोरं इथं मात्र स्वत:ला झोकून देऊन रात्रंदिवस काम करत असतात, बरं हे करण्यासाठी त्यांना कुणी सांगितलेलं असतं का? - तर नाही. स्वयंस्फूर्तीने गल्लीबोळातली मुलं एकत्र येतात आणि दोन महिने आधीच उत्सवाच्या तयारीला लागतात. यंदा किती रुपये वर्गणी घ्यायची, हे ठरवण्यापासून बैठका चालतात. वर्गणी गोळा करणारी स्वतंत्र टीम, एका गटाकडे खड्डे मारणे, मांडव उभारणीची जबाबदारी, दुसऱ्याकडे गणपतीबाप्पांचे गेल्यावर्षीचे सजावटीचे साहित्य काढून स्वच्छ करून ठेवणे, खराब झाले असतील तर नवीन खरेदी, पूजेअर्चेसाठीचे साहित्य घेण्याचे काम, तिकडे तिसरा गट बाप्पांच्या मूर्तीच्या आगमनाच्या तयारीत गुंग.. ट्रॉली ठरवायची, त्याची सजावट, कुणी मिरवणुकीची वेगळी संकल्पना मांडतो.... एकाच पातळीवर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी आनंदाने पेलण्याची आणि ते निभावून देण्याची उर्मी देतो त्या गणपती बाप्पासाठी वाट्टेल ती कामे करण्यासाठी ही मंडळी पुढे असतात... त्यातून व्यवहार ज्ञानाचा गमभन तर कळतोच, पण इथे वर्षानुवर्षे केलेले जाणारे बजेट मॅनेजमेंट, मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन कळते. शिस्त, वक्तशीरपणा, श्रद्धा, संयम, मानसिक शांतता आणि जिवाला जीव देणारे मित्रही या मांडवात मिळतात...
कोणत्याही शहरातले चित्र याहून वेगळे नसते. पण, गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचा कायापालट झाला आहे. जीवनदायिनी पंचगंगेसह कोल्हापूरला समृद्ध ठेवणाऱ्या नद्यांना न भूतो असा महापूर २०१९ मध्ये आला, त्यांनी आपल्या कवेत हजारो प्राणी, घरं, तरारली शेती, पैन-पै जमा करून उभारलेला संसार घेतला. ऐन गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीची ही परिस्थिती ... भावा, आपला गणेशोत्सव यावेळी पूरग्रस्तांसाठी म्हणत डोक्याला हात लावून बसलेल्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांचा संसार नव्याने उभारण्यासाठी हीच (काही जणांच्या भाषेतली टगे) मंडळी पुढे आली. विस्थापितांसाठी तयार जेवणापासून पेस्ट-ब्रश, सॅनिटरी पॅड, कपडे, चादरी, सतरंज्या, सहा महिने पुरेल एवढे धान्य प्रापंचिक साहित्यांपासून ते घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत उभारली गेली...बरं कोणाकडूनही वर्गणी न घेता मागील वर्षीच्या शिल्लक रकमेतून हे काम झाले... लाखो लोकांना दिलासा मिळाला...
२०२० मध्ये कोरोनाचं थैमान सुरू झालं...ते अजूनही संपलेले नाही.. या काळात आपला जीव धोक्यात घालून लॉकडाऊनमध्ये ज्याच्या घरात चूल पेटली नाही अशा हजारो लोकांच्या उपाशी पोटात अन्नाचा घास गेला तो या तरुणाईच्या पुढाकाराने. मागच्या वर्षी सगळेच भीतीच्या छायेखाली होते, कोल्हापुरात तर कोरोनाचा उच्चांक होता, तेव्हा गणेशोत्सव बाजूला ठेवून जिल्हा-पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून या तरुणाईने लढा दिला.
यावर्षी पुन्हा महापूर आला, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी निर्बंध कायम आहेत. लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे, पूरग्रस्तांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही..या परिस्थितीत मंडळातर्फे आर्थिक परिस्थिती नसलेल्या पूरग्रस्तांना मोफत गणेशमूर्ती, आपल्या भागातील नागरिकांचे लसीकरण, आरोग्य शिबिर, ६ मिनिटे वॉक टेस्ट, डॉक्टर, आरोग्य-सफाई कर्मचारी, पोलीस अशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार, मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्डचे वाटप असे उपक्रम मंडळांच्या वतीने राबवण्यात येणार आहेत.
रस्त्यावरचे मांडव टाळून यंदा तालमीत बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. कलकल ग्रुपकडून गरजूंना मोफत गणेशमूर्ती, लोकांना मोफत जेवण देणाऱ्या उत्तरेश्वर थाळीच्या कार्यकर्त्यांनी गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे, राजारामपुरीतील विवेकानंद मित्रमंडळ आरोग्यदूत म्हणून काम करणार आहे, लेटेस्ट तरुण मंडळातर्फे कोरोनबाधित व पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. स्वातंत्र्यलढ्याची चळवळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. नंतर त्याला हुल्लडबाजीचे स्वरूप आले, पण परिस्थिती सगळ्यांनाच शहाणं बनवते असं म्हणतात ते काही खोटं नाही. गेल्या तीन वर्षांपासून एकामागोमाग एक येत असलेल्या आपत्तीने तरुणाईच्या संवेदनशील मनाला साद घातली हे बाकी खरं. एरवी साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात बेफाम तरुणाईना नाचताना बघण्याची वेळ गणपती बाप्पांवर येते, यंदा मात्र कोरोनाग्रस्तांना उपचार, क्वारंटाईन लोकांना मदत पोहोच करणे, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना आधार, आरोग्य शिबिर, आपल्या भागातील नागरिकांना मदत करणारी ही तरुणाई बघताना छोट्या मांडवात निवांत बसलेल्या गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य फुलले असेल..
(वरिष्ठ बातमीदार, कोल्हापूर)
कॅप्शन- गरजूंना मदत करण्यासाठी आघाडीवर असलेले गणेश मंडळांचे तरुण कार्यकर्ते.