हणमंत पाटील
पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवडमध्ये देहू रस्त्यावर तळवडे येथे श्री सिद्धनाथ गॅरेज नावाचं एक गॅरेज आहे. साधं पत्र्याचं गॅरेज. कुठल्याही गॅरेज सारखंच हे गॅरेज. पण या गॅरेजमध्ये गाडय़ा-मोटारी नाही तर थेट हेलिकॉप्टर दिसतात.गॅरेजमध्ये हेलिकॉप्टर? एरव्ही कुणीही विश्वास नसता ठेवला पण या गॅरेजमध्ये असलेले स्वदेशी बनावटीचे हॅलिकॉप्टर पाहण्यासाठी लोक आता गर्दी करू लागलेत. रस्त्यावरून जाणारे-येणारेही क्षणभर थांबतात, हे हेलिकॉप्टर पहायला येतात. देशाच्या संरक्षण विभागात असतात तसे ग्रीन कलरचे हे हेलिकॉप्टर इथं कुठून आले? गॅरेजमध्ये कसे आले? खासगी गॅरेजमध्ये काय करतात? असे प्रश्न मनात येतातच, तर त्यांची उत्तरंही याच गॅरेजमध्ये मिळतात. आणि ती उत्तरं देतो एक साधासा तरुण. कुठल्याही गॅरेजमध्ये काम करणार्या तरुण, कष्टाळू, मेकॅनिकसारखाच तो दिसतो. आपण ते हेलिकॉप्टर पाहत असतो, आपल्या मनातले प्रश्न चेहर्यावर दिसतातच तेव्हा तो तरुण अत्यंत नम्रपणे सांगतो, ‘हे मी बनविलेले हेलिकॉप्टर हाय!’आपण काय ऐकलं यावर आपला क्षणभर विश्वासच बसत नाही; पण गॅरेजमधील गाडय़ांच्या दुरुस्तीचं काम थांबवून आपल्याशी बोलणारा हा साडेपाच फुटाचा पस्तीशीतील तरुण अभिमानाने पण अत्यंत सहज सांगतो की, हे हेलिकॉप्टर मी बनवलंय.आपल्याला वाटतंच की कसं शक्य आहे? गॅरेजमध्ये कुणी हेलिकॉप्टर बनवतं का? हेलिकॉप्टर एकतर संरक्षण विभागाकडे असतात, नाहीतर एखाद्या मोठय़ा उद्योगपतीकडे. ज्यांच्याकडे हेलिपॅडची सुविधा आहे अशा मोठय़ा व्यक्तींकडे हॅलिकॉप्टर असू शकतं, कुणी ते हौशीनं भाडय़ानंही घेऊ शकतं; पण गॅरेजमध्ये हेलिकॉप्टर?मळलेल्या निळ्या कपडय़ातला हा गॅरेजवाला मात्र छातीठोकपणे सांगतो, हे माझंय, मी बनवलंय. देशातील पहिलं स्वदेशी बनावटीचं हॅलिकॉप्टर आहे. तेव्हा उत्सुकता आणखी ताणली जाते. आपल्याला कळत नाही, हा काय प्रकार?
हेलिकॉप्टर उडालं पण धाडस आलं अंगाशी..इथवर त्याची गोष्ट एका रेषेत चालली; पण पुढं असं झालं की, जानेवारी 2013 मध्ये एक दिवस त्यानं हॅलिकॉप्टर उडविण्याची तारीख जाहीर केली. प्रदीप सांगतो, कॅमेरामन अन् व्हिडीओग्राफर यांना बोलावलं होतं. मला हेलिकॉप्टर उडणार असा विश्वास होता. तशी तयारीही झाली; पण ते पायलटप्रमाणे उडावयचं कसं याचं नॉलेज नव्हतं. तरीही धाडस केलं. एक तर हे हेलिकॉप्टर हवेत उडेल, नाहीतर मी आयुष्यातून उडेल, असे ठरवूनच धाडस केलं. गावातील लोक पाहण्यासाठी जमा झाले. मीही पायलटचा सदरा शिवून अंगात घातला. अन् थेट हॅण्डेलमारून मोटार सुरू केली. कसंतरी जमिनीपासून पाचएक फुटावर ते उचललं, पण पुढे कसं न्यायचं याची माहिती नव्हती. त्यामुळे तेथेच ते जोरात आदळलं. मला बेल्ट लावण्याची माहिती नव्हती. त्यामुळे मीही बाहेर फेकला जाऊन, काही साहित्य माझ्या अंगावर पडलं. त्यात हाताला व संपूर्ण अंगाला गंभीर जखमा झाल्या. पण त्याहीपेक्षा हेलिकॉप्टर उडल्याचा जास्त आनंद झाला होता. मला उठता येत नव्हतं त्यामुळे सगळे धावत माझ्याकडे आले, पण मला कॅमेर्यामध्ये माझं हेलिकॉप्टर उडत असल्याचं पाहण्याची इच्छा होती. ते पाहिल्यानंतर दवाखान्यात काहीवेळ मला अॅडमीट करण्यात आलं. त्यानंतर घरच्यांनी व नातेवाइकांनी मला हा हेलिकॉप्टरचा नाद सोडण्याचा आग्रह धरला. त्यासाठी माझ्या लग्नाची घाई सुरू झाली. काही दिवसांत लग्न करण्यात आलं. माझे वेड माहिती असल्याने पृथ्वीराज देशमुख यांनी मला रिमोट कण्ट्रोलचं हेलिकॅाप्टर लग्नात भेट दिले. त्यानंतर काही दिवसाने एक नेव्हीत काम कारणारे पाहुणे मला भेटले. त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी एका वैमानिक मित्राशी बोलून मला सांगितलं की, हॅलिकॉप्टरसाठी गाडीचं इंजिन उपयोगाचं नसून, त्यासाठी टरबाइन इंजिन गरजेचं असतं. मग माझ्या डोक्यात टरबाइन इंजिनाचा भुंगा घुसला. तोर्पयत मी हॅलिकॉप्टर उडविल्याच्या बातम्या सर्वदूर पसरल्या होत्या. ही बातमी शासनाच्या बेंगलोर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) र्पयत पोहोचली. मला एकेदिवशी फोन आला. कोणीतरी इंग्रजीत बोलत होते. मला काही कळत नसल्यानं मी त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले. त्यानंतर थोडय़ा वेळाने त्याच नंबरवरून फोन आला. आता मात्र मराठीतून आवाज आला. तुम्ही हेलिकॉप्टरवाले प्रदीप मोहिते आहात का? मी बेंगलोरच्या ‘एचएएल’मधून संजय कुंटे बोलतोय. लवकरच तुम्हाला आम्ही भेटायला येणार आहोत, असं सांगून त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर तालुक्याच्या तहसीलदार साहेबांचा फोन आला की, तुम्हाला कलेक्टर साहेबांचा फोन येईल, तुम्ही तुमची माहिती द्या. त्यांचा फोन झाला की, लगेच कलेक्टर साहेब बोलले. तुम्हाला भेटायला ‘एचएएल’चे अधिकारी येणार आहेत, असं सांगून त्यांनी माझा संपूर्ण पत्ता घेतला. काही दिवसातच ‘एचएएल’ने अमर पिसे नावांचे त्यांचे मराठी इंजिनिअर यांना माझ्याकडे पाठविले. त्यांनी गॅरेजमध्ये येऊन सर्व माहिती घेण्यास सुरुवात केली. पंख्यांचा आकार आणि लांबी कशी ठरविली, असं विचारले. त्यावर मी आतार्पयत 50 ते 60 पंखे बदलल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अनेक उलट-सुलट प्रश्न विचारले; पण उत्तर देण्याऐवजी मी त्यांना केलेले प्रॉक्टिकल दाखवत होतो. तेव्हा त्यांनी मी बनविलेल्या पार्टची नावे कलेक्टिव्ह, सायकलिंक व रडार अशी असल्याचं सांगितलं. शिवाय किती माणसं काम करतात, असं विचारलं. मी एकटाच उद्योग करतो, असं सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी सर्व मॉडेलचे फोटो काढून घेतले. टरबाइन इंजिनचं त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी मला बेंगलोरला ‘एचएएल’च्या पाहणीसाठी बोलवलं. चार दिवस राहण्यासह सर्व जाण्या-येण्याची व्यवस्था त्यांनी केली. मला संपूर्ण कंपनी दाखविली. तिथल्या इंजिनिअरबरोबर मी तोडक्या मोडक्या हिंदीत चर्चा केली. त्यांनी एक कार्यक्रम घेऊन मला ‘ध्रुव अवॉर्ड’ देऊन सन्मान केला. ‘एचएएल’च्या भेटीनंतर मला आणखी विश्वास आला. आता थांबायचे नाही, असं म्हणून गॅरेजमध्ये पुन्हा हॅलिकॉप्टरचं नवीन मॉडेल बनविण्याचा उद्योग सुरू केला. आतार्पयत नऊ वर्षात सात मॉडेल तयार केली आहेत. सातव्या मॉडेलमध्ये सर्व स्वदेशी बनावटीचं साहित्य आहे. त्याचं वजन आता 45 किलो इतके कमी असून, 55 अश्वशक्तीचे इंजिन बसवलं आहे. त्यातील पाच पार्ट्सना पेटण्ट मिळालं आहे. त्यामुळे माझा हेलिकॉप्टर उडविण्याचा विश्वास आणखी वाढला आहे, पण पैशाची चणचण गप्प बसू देत नाही. घरचे वैतागले आहेत. त्यामुळे बायकोला घेऊन दोन महिन्यांपूर्वी पुणं गाठण्याचा निर्णय घेतला. मेहुणा बालाजी पाटील हा पिंपरीतील एका खासगी कंपनीत काम करत आहे. त्याच्या मदतीने देहू-आळंदी रस्त्यावर एक पत्र्याचं गॅरेज भाडय़ानं घेतलं आहे. त्या ठिकाणी चारचाकी गाडय़ांच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं आहे. या ठिकाणी माझं लाडकं हेलिकॉप्टर ठेवलं आहे. त्याच्या प्रेरणेने मी गॅरेजचं काम करीत आहे,’ - असे सांगताना भावुक झालेल्या प्रदीपचे डोळे पाणावले. या मुलाची धडपड ऐकून आपण थक्क होतो. तो त्याची पाच पेटण्ट दाखवत असतो. त्याला त्याच्या प्रत्येक अपयशी पावलांतही यश दिसतं, कारण ते पाऊल त्याला पुढं घेऊन गेलेलं असतं, त्याची ही जिद्द ताकद बनलेली असते आणि आपण पाहत असतो त्या गॅरेजमध्ये एका हेलिकॉप्टरचं स्वप्न.
(लेखक लोकमतच्या पुणे-पिंपरी चिंचवड आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)