दहावी-बारावीच्या परीक्षा आता संपल्या. आता सुटी. आता घरोघर मुलींच्या मागे पालक लकडा लावतील की, हॉबी क्लास लाव, शिवणकामाचा क्लास लाव, टायपिंग शिक, कम्प्युटरचा क्लास लाव, स्वयंपाक शिक..असं बरंच काय काय!या सगळ्यात मुलींना रस असतोच असं नाही.काही मुलींना विचारा की, तुला काय आवडतं?उत्तर हमखास येतं, काही खास नाही तसं, पण टीव्ही पहायला आवडतं. काहीजणी सांगतात, की मला कुकिंग आवडतं. पण चुकून कधी स्वयंपाकघरात जात नाहीत की आईला मदत करत नाही.मग उद्योग काय एकच, फोनवर गप्पा, व्हॉट्सअॅपवर मेसेजिंग, फेसबुक किंवा मग टीव्ही सिरीअल्सचा रतिब आहे. अर्थात सगळ्याच जणी असं वागतात असं नव्हे. काहीजणी खरंच मनापासून बऱ्याच गोष्टी करतात. वेळेचा सदुपयोग करतात.पण ज्या करत नाहीत त्यांच्यासाठी काही खास टिप्स आहेत.कुणी दिलेल्या?तेच महत्वाचं, कारण टिप्स तर काय कुणीही देतं, पण कोण देतं ते जास्त महत्वाचं!आपल्या फेसबुक पेजवर सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजूता दिवेकरने दिलेल्या फक्त तीन टिप्स मुलींसाठी फार महत्वाच्या आहेत.ऋजूता लिहिते की दहावी-बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलींसाठी एक खास नोट..१. पळा. भरपूर चाला आणि खेळाही. कॉफी शॉपमध्ये बसून गप्पा मारायला पुढेही भरपूर वेळ हाताशी असेलच..त्यापेक्षा आता मेहनत करा. हाडं मजबूत करा. मणक्यांना ताकद द्या. आणि दरमहा येणारी पाळी आयुष्यभर वेदनारहीत असेल यासाठी आताच व्यायामाची मदत घ्या.२. कोकम सरबत प्या, पन्हं प्या, बेल सरबत प्या. बाकी पुढे आयुष्यात कधीही कोल्डड्रिंक पिता येईल असा भरपूर वेळ हाताशी असेलच..हे प्याल्यानं हेल्दी बॅक्टेरीयाची वाढ होईल. आतड्यातल्या त्वचेचं पोषण होईल. आणि उत्तम त्वचा लाभेल.३. रोज रात्री १०.३० च्या ठोक्याला झोपायची शिस्त लावा. रात्रभर पार्टी करायला आयुष्यात पुढे भरपूर वेळ हाताशी असेलच..लवकर झोपल्यानं आपल्या हार्मोन्सवर नियंत्रण राहतं. त्यांचं संतुलन व्यवस्थित असतं. आणि मेंदूलाही त्याचं काम शांतपणे करायला वेळ मिळतो, ती शिस्त तो पुढे आयुष्यभर सांभाळतो.
नाशिक, प्रतिनिधी