-रंजन पांढरे
मोहब्बत का कानों मे रस घोलते हैंये उर्दू जूबां हैं जो हम बोलते हैं!मुरारी बापू - आप जो मुझे शेर सुनाते हैं, ये इश्क हैंमै दाद नही दुआ देता हूॅँ! नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमच्या विशाल प्रांगणात जश्न-ए-रेख्ताचा सोहळा रंगला. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. दिल्लीची गुलाबी थंडी आणि सोबत उर्दू भाषेची ऊब असा अद्वितीय मिलाप. देशभरातून या भाषेवर प्रेम करणारे अनेकजण तिथं स्वत:हून पोहचले. त्यातलाच मी एक. त्या गर्दीचा चेहरा तरुण होता. त्यातली ऊर्जा तरुण आणि बेहद रसरशीत होती. त्या वातावरणात जादू अशी की उर्दूची जादू कळावी, नजाकत आपल्यातही उतरावी. देशभरातून आलेल्या माझ्यासारख्या अनेकांचं स्वागत उदरुतली रंगीबेरंगी पोस्टर्स करत होती. झाडांवर लावलेली दरबारची मखरं, पुस्तकं, पेंटिंग्ज, कंदील, पारंपरिक वेशभूषेतील युवक यांनी स्टेडियम न्हाऊन निघालं होतं त्या भाषेत. एरवी भाषेचा उत्सवात तरुण गर्दी नसते म्हणतात इथं मात्र सगळा मामलाच जवान होता. मेहफील खाना, बङम-ए-खयाल, दयार-ए-इजहार, सुखन-झार हे चार मुख्य मंच होते. मेहफील खानामध्ये कव्वाली, मुलाखती, मुशायरे आणि चर्चा आयोजित होत्या. बङम-ए-खयालमध्ये इतिहासावरील गप्पा, फैज, कबीर यांच्या कहाण्या तसेच चित्रपट दाखविण्यात आले. दयार-ए-इजहारमध्ये ‘राम कहानी उर्दूवाली’, खुसरो, नगमे सादर करण्यात आले. सुखन-झारमध्ये आजच्या पिढीतील युवकांना आवडेल असे काही मनोरंजक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. सकाळी 11ला सुरू झालेला सोहळा रात्नी 11 वाजेपर्यंत सलग तीन दिवस सुरू होता. जावेद जाफरीनं हा मंझर बघून खूप सुंदर शेर सांगितला, ‘कौन कहता हैं उर्दू खतरे मे हैं, यहा उर्दू कतरे कतरे में हैं’. जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी त्यांच्या जगण्यातल्या गोष्टी, कैफी आजमी यांच्या कवितांचा अर्थ, महिलांवर लिहिलेल्या गझला, नग्मे सादर केले. जावेद साहेबांनी उत्स्फूर्ततेनं सा-याना जिंकून घेतलं.
खरं तर हा सोहळा पूर्णपणे मोफत असतो आणि यासाठी सुमारे पाच हजार लोक देश-विदेशांतून येतात. आपण कधीही कुठल्याही मंडपात जाऊन बसू शकतो. आपल्या आवडीनुसार आणि उर्दूच्या विविध साहित्यांच्या प्रकारानुसार बसण्याची मुभा असते. वारसी बंधूची कव्वालीने जश्न-ए-रेख्ताला चार चांद लावले. ‘छाप तिलक मोसे नैना मिलैके..’ ऐकताना मंडपातील प्रत्येकजण त्यांच्या आवाजानं तल्लीन झाला होता, तो रोमांच शब्दात लिहिणं कठीण आहे. वसीम बरेलवीचा मुशायरा ऐकणं यासारखा योग नाही आणि मंचही नाही. ‘गमन’ या चित्नपटाचं विशेष स्क्रीनिंग जश्न-ए-रेख्तामध्ये करण्यात आलं. यानिमित्ताने परत एकदा स्मिता पाटील, फारु ख शेख यांचा अद्भुत अभिनय बघण्याची संधी मिळाली. उर्दूमध्ये रामायण ऐकणं यांसारखा दुर्लभ योग नाही आणि विशेषत: आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात याची जाणीव करून देणं खूपच गरजेचं होतं. ‘खुली निशिस्त’ हा कविता सादर करण्याचा एक खुला रंगमंच होता, नवीन लिखाण, सादरकर्ते, युवक आणि त्यांना मिळणारे वावाह, इर्षादचे अभिवादन या मैफलीत सारंच बहारदार होतं.
रेख्ताचं थीम साँग आहे, सर चढ के बोलता हैं, उर्दू जबां का जादू, हिंदोस्ता की मिट्टी के आस्मा का जादू, हिंदोस्ता का जादू सारे जहां का जादू!एक किस्सा सांगतो,तवल्लुफ, तकल्लुफ, तल्लफुज, तवज्जू अशा काही समान उर्दू शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी काही युवक गटात बसले होते आणि यावर प्रचंड डीबेट सुरु होतं की नेमकं कोण बरोबर आहे, कोणाला योग्य अर्थ माहीत आहे, तेवढय़ात मागून साधारण 80 वर्षांचे आजोबा जवळ आले आणि या तरुण चर्चेत सहभागी झाले. त्यांनी त्यातला अर्थ आणि फरक समजावून सांगितला. गटातले सगळे जण खूप खूश झाले, जाताना त्या आजोबांनी सर्वांना मस्त मिठी मारली आणि पुढे निघून गेले. ’
बौद्धिक खुराक, शायराना मिजास होताच पण पोटोबाला हवा तितका आनंद देण्याची सोय पण रेख्तामध्ये परफेक्ट केलेली असते. मन:पूत खा, भरपूर जगा आणि सोबत कॉफ, मैफल सजायला अजून काय लागतं. शिवाय पुस्तक प्रदर्शन होतंच. तो एक खुराक दिल्लीतून बाहेर पडताना नक्की सोबत आणावा लागतो.
शेवटच्या दिवशी सकाळपासूनच सर्वांच्या मनात एक भावना दिसत होती की आजचा दिवस लवकर संपू नये किंवा कधीच संपू नये, त्यामागे एक भावना अशी पण होती की मागील तीन दिवस इतके नवीन लोक भेटलेत, गप्पा झाल्यात, शायरीची आव्हानं दिली, गझलांच्या स्पर्धा झाल्या आणि अचानक यातील काहीच नसणार उद्या. ती भावनाच जश्न-ए-रेख्ताचं खरं यश आहे. कारण शेवटी उर्दू ही भाषेच्या पलीकडे एक भावना आहे, ती शब्दांत एक्स्प्रेस करणं अशक्य आहे. जावेद अख्तर म्हणतात ते अगदी खरं आहे, जबां रिजन्स की होती हैं, रीलीजन्स की नही! म्हणूनच हा सोहळा जात, धर्म, भौगोलिक स्थिती, राजकारण, समाजकारणाच्या, पलीकडे घेऊन जातो आणि आपलं वेगळेपण सिद्ध करतो. तरुण मुलं साहित्यिक कार्यक्रमांना जात नाहीत, भाषणं ऐकत नाहीत, वाचत नाहीत म्हणणार्या सर्वांनी जरूर एकदा रेख्ताला जावं, भाषेवरचं प्रेम आणि ओढ पहावी!
दर्दीची गर्दी
संमेलन म्हटलं की आठवतात ज्येष्ठ लेखक, जड आवाज आणि गंभीर चर्चा, पण यात एक वर्ग दिसत नाही तो म्हणजे तरुणांचा सहभाग. ‘जश्न-ए- रेख्ता’मध्ये तरुणांच प्रमाण मोठय़ा प्रमाणावर दिसतं, त्याची कारणं पण तशीच आहेत. एक तर ते ‘गर्दी’ नाही, तर ‘दर्दी’ आहेत. संपूर्ण संमेलनात कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही, अदब आणि आदर ठेवून वागणं. आपल्या मतावर ठाम राहून नम्रपणे सांगणं, श्रेयाची लढाईदेखील नाही. जेएनयूचा मोठा वर्ग या सोहळ्यात सहभागी असतो. उर्दू भाषेविषयी असलेला आदर आणि प्रेम आणि सोबतच स्वत:ला व्यक्त करण्याचं मोकळं व्यासपीठ उपलब्ध होतं. रोजच्या मानसिक अडचणींना पण अधिक सरस पद्धतीने समोर जाण्याचं कौशल्य यानिमित्त्याने मिळतं. ‘जश्न-ए-रेख्ता’ तरुणांसाठी एक प्रेमाचं आणि हक्काचं व्यासपीठ बनत चाललं आहे.
‘उर्दू खतरे मे हैं.
‘उर्दू खतरे मे हैं..’ अशी खंत अनेकवेळा बोलून दाखवण्यात आली, पण त्यावर कृती झाली नाही. पाच वर्षांपूर्वी संजीव सराफ यांनी या अवस्थेला सुधारण्याचा निर्णय घेतला. देश-विदेशांतील विविध उर्दू कवी, लेखक यांना एकत्र आणायचा निर्धार घेऊन त्यांनी जश्न-ए-रेख्ता ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला वेबसाइटच्या माध्यमातून उर्दूतील साहित्य एकत्न आणलं आणि ते उर्दूप्रेमींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलं. शेकडो लेखकांना एकत्न आणत हे साहित्य डिजिटल रूपात आणण्यात ते यशस्वी झाले. त्याचंच एक रूप म्हणजे हा जश्न!