काही विचार केलाय? मुंबई, ओंकार करंबेळकर ‘चांगली नोकरी मिळवायचीय? मग जा इंजिनिअरिंगकडे!’ - गेल्या दशकभरामध्ये नोकरी मिळवण्यासाठी सोपा मार्ग किंवा खात्रीशीर मार्ग म्हणूनच इंजिनिअरिंगकडे पाहिले जात होते. साहजिकच मेडिकल शाखेपाठोपाठ या शाखेला विज्ञान शाखेचे विद्यार्थीही पसंती देत होते. मात्र त्यामागे आपल्या आवडीनिवडीचा कोणताही विचार विद्यार्थी करत नसल्याचे आताच्या स्थितीवरुन स्पष्ट होत आहे. मेडिकलला प्रवेश मिळाला नाही म्हणून इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा हे काही तरुणांचे मुख्य कारण होते तर काही तरुण आपले सर्व मित्र या शाखेत शिकणार आहेत म्हणून आपणही तिकडे जायचं असा सरळ, सरधोपट निर्णय घेत होते. वास्तविक दहावी-बारावीनंतर काय शिकायचं हा निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत असतो, पण आपल्या विचारांचा, आवडीचा कल लक्षात न घेता बेधडक निर्णय घेऊन बरीचशी मुले अयोग्य निर्णय घेतात.याबरोबरच बहुतांश मुले आणि त्यांचे पालक केवळ मार्कांच्या आधारावर शिक्षणाचा निर्णय घेतात. अमूक इतके मार्क्स पडले की मेडिकलला जायचं, त्यापेक्षा थोडे कमी पडले तर अभियांत्रिकी, त्यातही जमलं नाही तर मग दुसरं काहितरी करायचं असा सरळसोट विचार केला जातो. अशाप्रकारे घेतले जाणारे निर्णयच मुलांसाठी धोकादायक ठरतात. पहिल्या वर्षातच बारावी पास झाल्याचा आणि सुटीचा आनंद विरून जातो. बहुतांश मुलांना आपला निर्णय चुकल्याची जाणीव होते मात्र ते अशा स्थितीत काहीच करु शकत नसतात. इतका खर्च करुन प्रवेश मिळवायचा, फी भरायची, काही वेळेस डोनेशनही द्यावे लागलेले असते, मग हा कोर्स कसा सोडायचा असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येऊ लागतो. घरच्या लोकांच्या अपेक्षा, परीक्षेचा ताण, न आवडणारा अभ्यासक्रम आणि नापास होण्याची भीती अशी अनेकांगी चिंता सतत सतावू लागते, पण आता हे स्वीकारलंय म्हटल्यावर मागे फिरता येणार नाही असा विचार करत मुलं सेमिस्टर ढकलत राहतात. मग सुरु होते ‘केटी’चे चक्र. केटी साचून मग ‘इयर डाऊन’ होते. इंजिनियरिंगच्या मुलांच्याच भाषेत सांगायचे तर ‘वायडी’चे ग्रहण लागते. या चक्रात दुर्देवाने मुले सापडतात आणि त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा महत्वाचा कालावधी वाया जातो. हे सगळं टाळण्यासाठी दहावी, बारावीचे शिक्षण सुरु असतानाच आपला कल नक्की कोणत्या दिशेला आहे याचा विचार सुरु करायला हवा किंवा बुद्धयांक चाचणीचीही मदत घ्यायला हवी. डॉक्टर्स, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट्स आणि शिक्षकांची यामध्ये मदत होऊ शकते. इंजिनिअरिंग किंवा कोणताही अभ्यासक्रम शिकण्यापूर्वी त्यामध्ये नक्की काय आहे, आपण तो पुरा करू शकू का, त्यामध्ये आपल्याला खरंच गती आहे का याचा विचार करायला हवा. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाही मार्क अपेक्षेप्रमाणे पडले नाहीत तर खचून न जाता, न लाजता दुसऱ्यांची मदत घेतली पाहिजे. आपल्या वर्गातील विद्यार्थी, सीनिअर्स, शिक्षक, पालक, समुदेशक यांच्याकडे अडचणी मांडायला हव्यात. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. एखादा अभ्यासक्रम निवडण्यात आपला निर्णय चुकला याचा अर्थ आपण कोणतेच काम करु शकत नाही असा होत नाही.
इंजिनिअरिंगला जाताय? - पण कशासाठी?
By admin | Published: April 06, 2017 7:32 PM