- मयूर पठाडे
जीममध्ये जाणार्या कोणत्याही तरुणाला विचारा, ‘तू जीममध्ये का जातोस? काय ध्येय आहे तुझं?’
‘फिट दिसण्यासाठी, बॉडीला शेप येण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी, सिक्स पॅकसाठी, इंप्रेशन मारण्यासाठी.’
- अशी अनेक प्रकारची उत्तरं आपल्याला ऐकू येतील.
- पण व्यायामातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायामानं तुमची हाडंही बळकट झाली पाहिजेत.
या गोष्टीकडे बर्याचदा कोणाचंच लक्ष नसतं.
ना व्यायाम करणार्याचं आणि ना त्यांच्या कोचचं.
- घाम गाळत नुसता व्यायाम करीत राहायचा आणि बॉडी तगडी दिसेल याकडेच फक्त लक्ष द्यायचं!
- पण हाडांच्या बळकटीचं काय?
विशेषत: पुरुषांच्या बाबतीत हा प्रo्न मोठय़ा प्रमाणात भेडसावतो.
- मग त्यासाठी काय करता येईल?
काही शास्त्रज्ञांनी यासंदर्भात नुकतंच एक संशोधन केलं.
त्यासाठी अगोदर त्यांनी अभ्यास केला आणि कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे तरुणांची हाडं बळकट होतील हे शोधून काढलं.
त्यासाठी काही तरुणांचे त्यांनी दोन ग्रुप केले आणि त्यांच्यावर काही प्रयोग केले.
काय केलं त्यांनी?
एका गटातील तरुणांना त्यांनी रेझिस्टन्स ट्रेनिंग दिलं; ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेट बेअरिंग एक्सरसाईजचा समावेश होता. म्हणजे वजनं उचलण्याचा सराव त्यात होता. दुसर्या गटातील तरुणांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारायला सांगितल्या.
दोन्ह्ी गटांकडून साधारण एक वर्षभर हा व्यायाम नियमितपणे करवून घेतला गेला.
त्यातून लक्षात आलेली निरिक्षणं शास्त्रज्ञांच्या अभ्यासाशी मिळतीजुळती होती.
आपल्या शरीरातील हाडांमध्ये स्क्लेरॉस्टिन नावंचं एक प्रोटिन तयार होत असतं. प्रोटिन असलं तरी आपल्या शरीरासाठी मात्र ते हानीकारक असतं.
त्याचवेळी ‘आयजीएफ-वन’ नावाचं दुसरं एक हार्मोन (संप्रेरक) आपल्यरा शरीरात तयार होत असतं. हे हार्मोन हाडांच्या वाढीसाठी, बळकटीसाठी फारच उपयुक्त असतं.
या दोन्ह्ी प्रकारचे व्यायाम केल्यानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं, यामुळे जे हानीकारक प्रोटिन्स आहेत, त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो आणि हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेल्या हार्मोन्सची वाढ झपाट्यानं होते.
सर्वसाधारणपणे कोणत्याही जिममध्ये गेल्यानंतर ह्रदयविकार, डायबेटिस, लठ्ठपणा. हे जे लाईफस्टाइल विकार आहेत, ते कमी करण्यसाठी काही विशिष्ट प्रकारचा व्यायाम रोज कमीत कमी तीस मिनिटे तरी केला पाहिजे असं तिथले हेल्थ एक्सपर्ट सुचवतात, पण शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर त्याचं म्हणणं आहे, तेवढय़ाच वेळातील व्यायामामध्ये तुम्हाला जास्त हेल्दी व्हायचं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या उड्याही तुम्ही मारायला हव्यांत. त्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळेल आणि तुम्ही अधिक फिट राहाल.