- श्रावणी बॅनर्जी
८0 ची फॅशन पुन्हा फिरून येते आहे, त्यात नवीन काय काय आहे?
फारच घिसंपिटं वाक्यं आहे की, फॅशनचं चक्र फिरतं असतं आणि जे जुनं तेच फिरून फिरून परत येतं.
पण आहे ते खरं. सध्या ऐंशीच्या दशकातल्या अशाच काही फॅशन्स पुन्हा चर्चेत आहेत. आणि अगदी स्ट्रीट फॅशनपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकजणांच्या अंगा-खांद्यावर त्या रुळलेल्या आहेत. आपणही ट्राय करून पहायला हरकत नाही. कारण वस्तू तशा स्वस्त आहेत आणि मस्तही.
१. मोठ्ठाले गॉगल्स
मोठमोठे, डोळ्यांपेक्षा चौपट आकाराचे. सगळं कपाळ झाकणारे गॉगल्स सध्या सर्वत्र मिळतात. आणि ऑक्टोबर हीट जवळ आल्यानं आता गॉगल खरेदीचे दिवसही आहेतच. हे फॅशन पूर्वी सिनेमात वापरले जायचे. आता ते परत आलेत. मिरर गॉगल्स असं काही म्हणतात त्याला!
२. स्लोगनवाले टी-शर्ट्स
मध्यंतरी शर्टावर काहीबाही लिहून मेसेजिंग करण्याचा एक ट्रेण्ड येऊन गेला. अगदी मराठी कविताही झळकल्या शर्ट्सवर. मात्र तशी ही फॅशन जुनीच. आता ती परत आली आहे. आणि आलिया भट ते अनुष्का शर्मा ते सानिया मिर्झा अनेकजणी आता हे स्लोगनवाले शर्ट्स वापरत आहेत.
३. पोलका डॉट्स
गोळ्या गोळ्यांच्या साड्या आपली आई वापरत असे आपण लहान असताना हे अनेकांना आठवत असेल. आता तेच पोलका डॉट्स परत आले आहेत. पंजाबी ड्रेस, शर्ट्स, टी-शर्ट्स या सार्यांवर आता हे छोटे-मोठे रंगीत गोळे परत आलेत.
त्यांना पोलका डॉट्स म्हणतात.
ते दिसतातही छान.
४. लॉँग स्कर्ट्स आणि टॉप्स
स्कर्ट्सची फॅशन तशी जुनीच. आता ऐंशीच्या दशकातली लांबच लांब पायघोळ स्कर्ट्स आणि त्यावर टी-शर्ट स्टाईल, राउंडनेक, राउंडकॉलर, बोटनेक असे टॉप्स अशी सध्या जोरदार स्टाईल आहे.
५. जॅकेट्स
खरं तर जॅकेट्स कधीच कालबाह्य होत नाहीत. पण तरी छोटी आणि मोठी जॅकेट्स आता पुन्हा इन आहेत. मुलं-मुली दोघांसाठीही!