- श्रुती साठे
टाइमलेस ब्यूटी समजली जाणारी रेखा आणि ती परिधान करत असलेल्या साड्या यांचं आकर्षण आज किमान तीन दशकं तरी टिकून आहे ! तिची साड्यांची निवड, ब्लाउज, ज्वेलरी, मेकअप हे सगळंच अचूक आणि मोहक असतं.नुकत्याच एका कार्यक्र मात रेखानं परिधान केलेली सोनेरी साडी आणि त्याला साजेसं ब्लाउज, ज्वेलरी लक्षवेधी ठरली. ही प्लेन सोनेरी साडी तिच्या हमखास असणाºया भरजरी सिल्क साड्यांपेक्षा खूपच वेगळी होती. कॉन्ट्रास्ट ब्लाउजच्या जमान्यात साडीच्याच रंगसंगतीचं ब्रोकेड ब्लाउज सुरेख दिसलं. यावेळी तिच्या हातात असलेल्या सोनेरी बटव्यानं तिचा लूक पूर्ण करण्यास मदत केली. साधारण अशा रंगसंगतीचा किंवा लाल, निळ्या वेलवेटवर मोती/मणी काम केलेला एकतरी बटवा आपल्या सगळ्यांकडे हवाच. तो लग्न समारंभात किंवा पार्टीसाठी साडीवर छान खुलून दिसतो.याच कार्यक्र मात दिशा पटणीचा गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेला ड्रेस, बोल्ड लूकही भारी गाजला. वेस्टर्न लूकमध्ये सोनेरी रंगाचा वापर वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये करता येतो. सिक्विन टॉप, किंवा ड्रेस तसंच बेसिक ब्लॅक टॉप किंवा ड्रेसवर गोल्डन जॅकेट ‘पार्टी रेडी’ लूक देतो.एकूण काय, या उन्हाळ्यात सोनेरी रंगाची चांगली चलती आहे. तुमच्याकडे असलेला एखादा गोल्डन टॉप किंवा श्रग आठवणीनं वापरायला विसरू नका! तसेच पूर्ण सोनेरी रंगाची साडी अगदी टू मच वाटली तर निदान प्लेन, ब्रोकेड किंवा गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लाउज नक्की वापरून पहा!
sa.shruti@gmail.com