- प्रतीक पाटीलसहज सांगावंसं वाटतंय. ३-४ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळी एका कंपनीमध्ये मार्केटिंग करत होतो. रोजच मोटर सायकल वर येणंजाणं असायचं.पण आजचा दिवस विशेष होता. आमचं नवीन एक प्रोडक्ट जळगावला हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये लाँच होणार होतं. खूप मोठा कायक्रम ठेवलेला होता. अर्थातच कंपनीचा जबाबदार प्रतिनिधी असल्याने जबाबदारी माझ्यावर होती. साहेबांनी बजावलं होतं सकाळी लवकर पोहचायचं. पण पुन्हा निद्रादेवीने घोटाळा केला. अजून दहा मिनिटं झोपू म्हणत अर्धा तास उशीर झाला. जसं तसं पटापट उरकलं आणि गाडीला कीक मारली. निघालो. कानात हेडफोन आणि नवीन चित्रपटाची गाणी. गाडी 60-70च्या स्पीडने पळत होती. गाडी जेमतेम बोरनारच्या पुढे पोहोचली असेल. एक म्हातारी भिल्ल समाजाची आजी म्हसावदकडे पायी जात होती. तिला मी ओळखत होतो. ती लहानपणी मला बोर, पेरू, चिंच आवर्जून आणून देत असे. पण तिनं मला ओळखलं नाही. कशी ओळखणार नजर कमजोर झाली होती. हात पाय थकले होते पण आशेने गाडीकडे बघत होती जणू हा माणूस थांबतो की काय. पण मला आधीच उशीर झालेला म्हणून कशाला वेळ वाया घालवायचा तसाच पुढे निघालो. थाड्या अंतरावर जाताच मन बेचैन झालं. वाटलं आपण जे करतोय ते योग्य नाही. गाडी परत माघारी फिरवली त्या आजीला गाडीवर बसवलं. म्हसावदला सोडलं. डोक्यावरच हेल्मेट काढलं. आजीने डोक्यावरु न मायेचा हात फिरवला. कानाजवळ मोडला आणि म्हणाली, देव तून भलं करो.मार्केटिंगच्या हजारो कार्यक्रमांना क्षणात फिका पाडणारा आशीर्वाद तिनं मला दिला. तिच्या डोळ्यात माया होती. जगण्यातला खरा आनंद काय असतो तो तेव्हा कळाला. आणि पुन्हा निघालो त्याच उमेदीने वाऱ्याशी स्पर्धा करायला..
आजीची माया आणि मार्केटिंगचा इव्हेण्ट
By admin | Published: March 14, 2017 4:40 PM