- आॅक्सिजन टीम
तिला पाऊस आवडायचा... तुफान कोसळणारा पाउस. कडकडणाऱ्या विजा, ढगांचा गडगडाट आणि कौलावरुन धावणाऱ्या पाण्याच्या रेषा... ती खुष असायची. पण तिच्याच बाकावर बसणाऱ्या तिच्या मैत्रिणीला मात्र पावसाची जाम भीती वाटायची. पाऊस म्हटला की ती उदास व्हायची. हरभरे भरडणारी म्हातारी दात विचकत आपल्याकडे पाहतेय, असं तिला वाटायचं. एकाच वयाच्या दोघी पण एकीचा आनंद दुसरीचा भयंगड होता. त्या दोघी मोठ्या झाल्या, कॉलेजात जायला लागल्या. त्यांच्याप्रमाणे त्यांची मैत्रीही वाढली. कॉलेजचा शेवटचा दिवस उजाडला.. आता कदाचित या वळणावर त्यांच्या वाटा वेगळ्या होणार होत्या. इतक्या वर्षाची सोबत, भविष्यात काही मिनिटांची भेट म्हणून सामोरी येणार होती. तसेही दोघींकडेही शब्द नव्हते. घरी जायची वेळ आली तसं ‘तिनं’ पाऊसवेड्या मैत्रिणीच्या हातात एक हिरव्या रंगाचं पाकीट दिलं. त्यात होतं एक पत्र.. त्यात लिहिलं होतं.. ‘मला पाऊस आवडत नाही. त्यात भिजायला आवडत नाही. पाऊस पडायला लाग्ला की मला खूप उदास वाटतं हे खरं.. मला तसं का वाटतं हे तू कधी विचारलं नाही, मीही सांगितलं नाही. तसं काही सांगण्यासारखं कारणही माझ्याकडे नाही. ज्या गोष्टीनं तुला आनंद होतो, तिच्यामुळेच मला त्रास का होतो, हे कोडं मला कधीच उलगडलं नाही. आजही नाही. पण एक गोष्ट मला नीट कळलीय. ती तुला सांगायची म्हणून हे पत्र. उद्या आयुष्याच्या प्रवासात तुला हवेहवेसे पावसाळेच फक्त येणार नाहीत. सगळीकडे हिरवगार- आबादीआबाद असेल असं नाही. कदाचित वैराण वैशाखवणवाही असेल, गोठवणारी थंडीही असेल. पण.? तुझ्या मनातला हिरवा कोपरा कायम जागा ठेव. त्यातला आनंद स्वत:पाशीच न ठेवता सगळ्यांना वाट. तुझा आनंद मला कधीच कळला नाही असं तुला वाटतं. पण तसं नाही.. आता या पावसाळ्यात तू नसशील; पण तुला आनंद होत असेल या भावनेनेच मला आनंद होईल.. आनंद होण्यासाठी पाऊसच पडायला पाहिजे असं काही नाही.