बालाजी सुतार
कॉलेजच्या निमित्ताने अनुभवलेलं चमकदार शहरी जग अधिकाधिक खेचून घेऊ लागतं. मातीतले गधडे कष्ट आता नकोसे वाटायला लागतात. ना पूर्णवेळ शेती, ना पूर्णवेळ शिक्षण अशा अर्धवट अवस्थेमुळे अनेकांचा शेतीत जीव रमत नाही आणि शिक्षणात चमक दिसत नाही. तरणीताठी पोरे ‘न घर का, न घाट का’ अवस्थेत जातात. त्यांचा जीव गावात रमत नाही, रानातही रमत नाही. दिवसेंदिवस गाव अधिकाधिक अंगावर येत राहतं आणि शिवार खायला उठतं.
----------------------
‘‘आरं शिकले त्ये हुकले, ग्येल्ये की रं वायाùùù
आन् जमल कावं तुमाला आता, ढोरं सांबाळाया?’’
ऐन दुपार असते आणि स्तब्ध शांत वातावरणात ही लकेर उठते. आवाजावरून माणूस ओळखता येतो. हा गडी विशेषत: दारू प्यायल्यावर नेहमीच हे गाणं म्हणत रस्त्याने हिंडत असतो. लोक ऐकतात, हसतात, सोडून देतात.
दैनिक जगण्यात अदखलपात्र असलं तरी हे दुखणं खोलवरचं आहे. व्यथाही तेवढीच खोल. एरवीही ठणकत असतेच, प्यायल्यावर काहीशा जोराने उसळून वर येते एवढंच.
थोडीशी शेतजमीन असते. मातीत राबत पिढय़ान्पिढय़ा सरलेल्या. शेतीला ‘व्यवसाय’ म्हणावं, ‘काळ्या आईची सेवा करणं’ म्हणावं की शहरी भाषेत ‘ती एक जीवनशैली आहे’ असं म्हणावं हे कुणालाच नीट उमजत नाहीये. व्यवसाय म्हणावं तर एवढय़ा आतबट्टय़ाचा दुसरा व्यवसाय नाही. व्यवसायाचे कुठलेच नियम याला लागू होत नाहीत. अमुक इतक्या गुंतवणुकीवर किमान अमुक इतका नफा होईल वगैरे काहीच निश्चित नाही. ‘सेवा’ म्हणावं तर इतकी निष्फळ सेवाही दुसरी नाही. नाही म्हणायला ‘जीवनशैली’ म्हणता येईल. पण एवढय़ा कष्टप्रद दरिद्री जगण्याला ‘जीवनशैली’ वगैरे शब्द शोभतच नाहीत.
काही कुटुंबं असतात, त्यांच्याकडे शेती नसते आणि काही ठोस उद्योगही नसतो. मात्र जगण्याचा आधार शेतीच असते. म्हणजे इतरांच्या शेतात कामाला जाऊन उदरनिर्वाह करणारी कुटुंबं. यातल्या लोकांना तर शिक्षण हा प्रकार कायम दुय्यमच मानावा लागतो. आधी चरितार्थ चालावा इतपत तरी कामाची सोय बघावी लागते. मग बाकीच्या गोष्टी.
एकंदरीतच गोची असते.
यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे पोरांना शिकवणं. पोरगं शिकलं म्हणजे काहीतरी साहेब होईल आणि घराला ऊर्जितावस्था येईल अशी एक अंधुक आशा असते. पोरगं ‘साहेब’च व्हावं असंही काही नाही. ते अगदी चपराशी झालं तरी चालतं. नोकरी म्हणजे काही का होईना स्थिर उत्पन्नाची हमी असते. मग पोरं जमेल तसं रेटून शिकत राहतात. शेता-वावरातली कामं करत शिकत राहतात. ही कामं करावीच लागतात. शेतक:यांच्या कुटुंबात जन्म घेतल्यावर या कामांना पर्याय नसतो. अल्पभूधारक किंवा अजिबातच जमीन नसलेल्या पोरांपुढे तर दुसरा काही मार्गच नसतो. साधारण दहावी- बारावीपर्यंत शिकण्याची गावात सोय असते, त्यामुळे शाळा करून शेतीत किंवा इतर कामांत मदत करणो शक्यही असते. दहावी किंवा बारावीनंतर शिक्षणाचा एक टप्पा संपतो. पुढं शिकण्याची उमेद आहे आणि घराच्या, शेतीच्या रामरगाडय़ातून थोडी सवडही आहे अशी पोरे मग जवळपासच्या शहरात कॉलेजसाठी दाखल होतात.
गंमत अशी आहे की, जूनच्या मध्यावर ऐन पेरणीच्या वेळीच शाळा-महाविद्यालयेही चालू होतात. पाऊस आलेला असतो-नसतो. बीबियाणो खरेदी करून पेरणीची तयारी करून बसलेल्या लोकांचे डोळे पावसाकडे लागलेले असतात. ज्यांची शेती असते त्यांना पेरणी करून घ्यायची असते. ज्यांची नसते, त्यांना याच काळात मुबलक रोजगार उपलब्ध असतो. बहुतेक पोरांना ऐन सुरु वातीचे दिवस शाळा-महाविद्यालयाला दांडी मारून या कामांत बुडवून घ्यावं लागतं. पुढेही ऐन सेमिस्टर किंवा सहामाही वगैरे परीक्षांच्या दिवसांत शेतामध्ये काढणीच्या किंवा तशाच काही कामांची अगदी टिप्परघाई चालू असते. त्याही वेळी दांडय़ा मारणं क्रमप्राप्तच असतं. या असल्या तुटकतुटक जगण्यात आणि तशाच तुटकतुटक शिक्षण घेण्यात ना घरा-वावरातली कामं धड होतात, ना अभ्यास नीट होतो. या ओढाताणीत काहीजण शिक्षणाचा नाद सोडून देतात. जे त्यातूनही टिकतात, ते कधी एटीकेटी मिळवून, कधी पन्नाससाठ टक्क्यांच्या आसपासचे अधलेमधले मार्क्स मिळवून पदवी-पदव्युत्तर पदवीपर्यंतचं कसंबसं शिक्षण पुरं करतात. खरी लढाई यानंतर सुरू होते.
आता नोकरीचे वेध लागलेले असतात. मातीतले गधडे कष्ट आता नकोसे वाटायला लागतात. पांढरपेशा राहणीमान अधिकाधिक आकृष्ट करून घ्यायला लागतं. शेतीतलं राबणं निव्वळ बिनामोलाचं आहे हे आणि मातीतल्या कष्टांना फूल येणं केवढं अवघड आहे हे पुरेपूर उमगलेलं असतं. ना पूर्णवेळ शेती, ना पूर्णवेळ शिक्षण अशा अर्धवट अवस्थेमुळे आपण शेतीत रमू शकलो नाही आणि शिक्षणातही चमक दाखवू शकलो नाही, या विदारक परिस्थितीचं भान याच काळात यायला लागतं. परिणामी शेतीतल्या कामांबद्दल उत्तरोत्तर तिडीक यायला लागते. कॉलेजच्या निमित्ताने अनुभवलेलं चमकदार शहरी जग अधिकाधिक खेचून घेऊ लागतं. तरणीताठी पोरे ‘न घर का, न घाट का’ अवस्थेत जातात. चिडचिड होते, त्रगा होतो, वैताग येतो. या सगळ्यावर एकच उपाय असतो, कशी का असेना, कोणती का असेना नोकरी मिळवणं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळवण्यासाठी करता येण्यासारखी आणखी एक गोष्ट ग्रामीण भागात असते. डी.एड. किंवा बी.एड. करणं. त्यानंतर गावोगावी पेव फुटलेल्या खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा-कॉलेजांमध्ये शिक्षक, प्राध्यापक किंवा कारकून होता येणं शक्य असतं. मग चालू होतं एक दुष्टचक्र .
या त्या संस्थाचालकांचे उंबरे ङिाजवणं सुरू होतं. पुढे पुढे कंडक्टर, तलाठी, पोलिसांच्याही पदभरतीच्या परीक्षा देणं सुरू होतं. कुणाचा वशिला, कुणाची चिठ्ठीचपाटी मिळेल काय याची चाचपणी चालू होते. वेळप्रसंगी जमीनजुमला विकून, गहाण ठेवून, कुणाला लाच देऊन आपले ‘काम’ व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. यातून काही सुदैवी मुलं इथं तिथं ‘चिकटून’ जातात. उरलेले बधीरपणो दिवस रेटत राहतात. त्यांचा जीव गावात रमत नाही, रानातही रमत नाही. भाकड शिक्षणापायी आजवर आपले दिवस निव्वळ व्यर्थ गेले याची टोकदार जाणीव सलत राहते. दिवसेंदिवस गाव अधिकाधिक अंगावर येत राहतं आणि शिवार खायला उठतं. गावात आपण रुजू शकत नाही आणि मातीत श्रमाला मोल नाही, यातून मनातला सिनिसीझम झपाटय़ानं वाढत जातो. तो अर्थातच वांझ असतो.
मग यातल्याच कुणाचा बाप ऐन दुपारी झोकलेल्या अवस्थेत भर रस्त्यावर लकेर सोडतो, ‘‘ हेùùय, शिकले ते हुकले. ग्येल्ये की रं वायाùùù’’
दुखणं फार अवघड जागेवरचं आहे. इलाज कुणाचाच नाही.
दोष कुणाचा आहे, कुणास ठाऊक !